सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
१. आध्यात्मिक त्रास वाढल्यावर नामजपाचे घंटे वाढवणे आणि नामजप भावपूर्ण होण्यासाठी सलग न करता थोड्या थोड्या वेळाने अर्धा – एक घंटा करणे
श्री. अग्निवल्लभ : मागच्या २ आठवड्यांमध्ये मला होणारा आध्यात्मिक त्रास वाढला होता.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मग नामजपादी उपाय वाढवतोस कि नाही ? दिवसातून किती घंटे नामजप करतोस ?
श्री. अग्नीवल्लभ : मला ४ घंटे नामजपादी उपाय करायला सांगितले आहेत. मी सलग ४ घंटे नामजप करतो; पण माझ्याकडून नामजप भावपूर्ण होत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : सलग नामजप करणे पुष्कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा. आपल्यात काहीच स्वभावदोष नसतील, मनात काहीच विचार येत नसतील, तर मग सलग ४ घंटेच काय १० घंटेही ध्यान लावून बसता येते.
२. साधकांना ज्या प्रकारे नामजप करून लाभ होतो, त्यांनी तो तसाच चालू ठेवणे
एक साधिका : मलाही ६ घंटे नामजप करायला सांगितला आहे. मी पहाटे ४ वाजता गजर लावून उठते आणि ४ ते ६.३० पर्यंत सलग नामजप करते. त्यामुळे सकाळीच अडीच घंटे न्यासासह नामजप होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पण एकाग्रतेने होतो का ?
एक साधिका : हो. पहाटे नामजप केला, तरच ६ घंटे नामजप पूर्ण होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : त्याने लाभ होतो आहेना ?, तर मग चालू ठेवा. ज्यांना ज्या पद्धतीने नामजप केल्यावर लाभ होतो, त्यांनी तेच चालू ठेवायचे.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |