साधिकेला एखादी वस्तू किंवा पदार्थ यांचे दर्शन अथवा स्मरण झाल्यास त्याच्याशी संबंधित गंध येऊन सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक तत्त्वाची अनुभूती येणे

सौ. सुजाता कुलकर्णी

‘सनातन संस्थेत सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगा’च्या अंतर्गत एखादा जीव साधना करू लागला की, त्या जिवाला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सांगितलेल्या आध्यात्मिक सिद्धांतानुसार अनेक अनुभूती येऊ लागतात. साधारण वर्ष २०१६-२०१७ मध्ये मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ग्रंथ-संकलन सेवा करत होते. त्या वेळी लिखाणात ‘एका साधिकेला गुलाबपुष्पांचा सुगंध आला’, याविषयीची अनुभूती होती आणि मी त्या अनुभूतीचे संकलन करत होते. संकलन करतांना मला प्रसन्न वाटत होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला की, ‘या साधिकेला गुलाबपुष्पांचा सुगंध कसा आला असेल ?’ आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या मनात असा विचार आला आणि तत्क्षणी मलाही गुलाबपुष्पांचा मंद सुगंध आला अन् मला पुष्कळ आनंद झाला.

वर्ष २०२३ मध्ये ५ – ६ वेळा मला अशाच प्रकारची अनुभूती आली. एखाद्या गोष्टीचे चित्र पाहिले, स्मरण झाले किंवा लिखाणात उल्लेख आढळला, तरी त्याच्याशी संबंधित अशा सूक्ष्म आणि मंद सुगंधाची देवाने मला अनुभूती दिली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्याची शक्ती एकत्र असते’, असे आध्यात्मिक तत्त्व सांगितले आहे. मला येणारा सुगंध ही त्या तत्त्वाचीच अनुभूती आहे. हे आध्यात्मिक तत्त्व सांगणारे आणि त्या तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती देणारे परब्रह्मस्वरूप गुरुदेव धन्य आहेत. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सुजाता कुलकर्णी, फोंडा, गोवा. (१२.३.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक