सेवाभावी वृत्तीचे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा असलेले म्हार्दाेळ, गोवा येथील श्री. विश्वास (अप्पा) लोटलीकर (वय ६९ वर्षे) यांचा साधनाप्रवास

१९.३.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात ‘श्री. विश्वास लोटलीकर यांनी त्यांच्या साधनाप्रवासात अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा’ याविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहू. (भाग ३)

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/775275.html

श्री. विश्वास लोटलीकर

७. सनातन संस्थेला समाजामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व मिळू लागणे

७ अ. पोलीस ठाण्यातील केबिनमध्ये ठेवलेली छत्री हरवणे आणि त्यांना योग्य शब्दांत जाणीव करून दिल्यावर ती मिळणे : गणेशोत्सव काळात आम्ही गणेश मोहीम राबवली. ‘आदर्श गणपति कसा असावा ?’ याविषयी गणपति मंदिरात बैठक होती. त्यांनी आम्हाला विनामूल्य सभागृह दिले होते. त्या वेळी महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना निमंत्रण दिले. त्यांच्या कार्यालयामधून उतरून खाली आलो. नंतर ‘आम्ही तिथे छत्री विसरलो’, हे लक्षात आले; म्हणून आम्ही पुन्हा त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो. तेव्हा तिथे छत्री नव्हती. आम्ही त्यांना सांगितले, तर ते चिडून म्हणाले, ‘‘कुणी घेतली का, ते पहातो.’’ त्या वेळी माझ्या तोंडून प.पू. गुरुदेवांनी बोलून घेतले की, ‘सर, छत्री गेल्याचे दुःख नाही; पण वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयामध्ये चोरी होते, हे जरा अधिकच झाले.’’ त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिपायाला बोलावले आणि त्याला ते रागावले. तेव्हा त्यांनी शिपायाला क्षमा मागायला सांगितले.

त्यानंतर ते सनातन संस्थेच्या साधकांना गणपति विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये सेवा देऊ लागले. काही दिवसांनी पोलीस ठाण्यात रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यामध्ये सनातन संस्थेच्या साधकांनी भाग घेतला. तेव्हा जिल्हा पोलीस प्रमुखांकडून माझा सत्कार झाला. अशा प्रकारे सनातन संस्थेला समाजामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिनिधित्व मिळायला लागले.

रक्तदानाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल श्री. विश्वास लोटलीकर (डावीकडे) यांचा सत्कार करतांना राजकीय नेते अनंत तरे आणि अन्य मान्यवर

७ आ. महापौरांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी कल्याण महानगरपालिकेच्या महापौरांनी ‘पास’ देण्यास सांगणे आणि कार्यक्रम झाल्यावर त्यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार करणे : काही दिवसांनी आम्हाला कल्याण महानगरपालिकेचे वृत्त मिळू लागले; परंतु तेथेही सनातन प्रभातला थोडे घाबरूनच रहायचे. तेथील महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या निवडणुका झाल्या आणि महापौरांचा शपथविधी होता. सर्व पत्रकारांना ‘पास’ देऊन प्रवेश दिला होता; परंतु आम्हाला ‘पास’ दिले नव्हते. त्यासाठी ‘आम्ही २ पत्रकार त्यांच्या प्रवेशद्वारासमोर बसून निदर्शने करणार आहोत’, असे सांगितले. ही गोष्ट महापौरांना समजली. महापौर श्री. शाहू सावंत यांची आणि माझी पूर्वीची ओळखही होती. त्यांनी त्यांच्या माणसांना सांगितले, ‘‘त्यांना ‘पास’ द्या आणि त्यांच्यातील लोटलीकर यांना ‘मी इकडे बोलावले आहे’, असे सांगा अन् समवेतच घेऊन या.’’ मी त्यांच्या समवेत गेलो, तर त्यांनी मला आपल्या बाजूच्या आसंदीवर बसवले अन् त्यांचा कार्यक्रम झाल्यावर त्यांनी मला शाल-श्रीफळ देऊन माझा सत्कार कला. यालाच म्हणतात गुरुकृपा !’

८. आलेल्या अनुभूती

८ अ. गुरुकृपेने प्राण वाचणे

८ अ १. तिसर्‍या माळ्यावर कापडी फलक बांधतांना अकस्मात् पाय सरकून उद्वाहनसाठी ठेवलेल्या जागेतून खाली पडणे आणि त्या वेळी हवेतील फुग्याप्रमाणे हळूहळू खाली येणे अन् गुरुदेवांनी संकटातून वाचवणे : ‘एकदा अंबरनाथला प.पू. गुरुदेवांचे जाहीर प्रवचन होते. तेव्हा आम्ही कापडी फलक (बॅनर्स) बांधण्याची सेवा करत होतो. त्या वेळी एका इमारतीमध्ये तिसर्‍या मजल्यावर कापडी फलक बांधतांना अकस्मात् माझा पाय सरकून मी उद्वाहनसाठी ठेवलेली जागा असते, तेथून खाली पडलो. मला एक सेकंद असे वाटले, ‘आता सारे संपले’; परंतु माझा नामजप चालू होता. मी खाली जातांना असे वाटत होते की, हवेचा फुगा जसा तरंगतो, तसा मी हळूहळू आणि अलगद खाली येत आहे. समवेतचा साधक घाबरला; परंतु ‘देव तारी, त्याला कोण मारी.’ माझे परात्पर गुरु डॉक्टर माझ्या रक्षणासाठी तेथे उभे होते. त्यांनी मला ‘मी तुझा रक्षणकर्ता आहे’, ही अनुभूती दिली.

८ अ २. चालक नसलेली बस साधकांवर येत असतांना बांबू ‘टायर’च्या खाली घातल्याने साधकांचे प्राण वाचणे : एकदा प.पू. गुरुदेवांचे ठाणे येथे जाहीर प्रवचन होते. त्यामुळे तेथे पटांगणाची साफसफाई चालू होती. त्या वेळी एक बस लग्नाचे वर्‍हाड घेऊन तेथे आली. सर्व वर्‍हाड उतरून निघून गेले. नंतर चालकही निघाला. नंतर अकस्मात् ती बस चालू होऊन मागे येऊ लागली. तेव्हा तिथे साधक सेवा करत होते. ते पाहून काही साधक ओरडू लागले; पण बस थांबतच नव्हती. तेव्हा मी धावत जाऊन एक बांबू ‘टायर’च्या खाली लावला अन् ती ‘बस जागेवरच थांबली.’ केवळ गुरूंच्या कृपेनेच ती बस थांबली आणि गुरुदेवांनी आपल्या प्राणप्रिय साधकांचे प्राण वाचवले.

८ अ ३. चारचाकी गाडीने मुंबईकडे येतांना अकस्मात् गाडी ७ ते ८ फूट खोल दरीत पडणे आणि कुणालाही काही दुखापत न होणे : माझे आई-वडील गावी रहायचे. त्यांना मुंबईला आणण्यासाठी मी गावी गेलो. त्यांना ‘बस’ने आणणे कठीण होते; म्हणून मी चारचाकी गाडी (‘ट्रॅक्स’) आरक्षित केली. आई-वडील, मी आणि माझे कुटुंब मुंबईकडे येण्यास निघालो. रात्रीचा प्रवास होता. आम्ही सर्व जण झोपलो होतो. सकाळी गाडी डोंबिवलीच्या दिशेने येतांना एकदम मोठा आवाज झाला. सर्व जण जागे झाले. आमची गाडी ७ ते ८ फूट खोल दरीत पडली होती. चालकाला (ड्रायव्हरला) विचारले, तर तो म्हणाला, ‘‘डंपरवाला अंगावर आला; म्हणून गाडी खाली गेली’’; पण काय चमत्कार ! आम्हाला कुणालाही साधे खरचटलेही नव्हते. गाडीचे सर्व दरवाजे बंद (लॉक) झाले होते. गाडीची थोडीशी हानी झाली होती; पण ही सर्व देवाची किमया !’’ गुरुकृपा काय असते, हे आम्ही सर्वांनी अनुभवले होते. (क्रमशः)

– श्री. विश्वास लोटलीकर, म्हार्दाेळ, फोंडा, गोवा. (२६.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक