काबुल – अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हवाई आक्रमणाला तालिबानने प्रत्युत्तर दिले आहे. तालिबानी सैन्याने ड्युरंड रेषेजवळील पाकिस्तानी सैन्यदलाच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, अफगाणिस्तानचे संरक्षणदल कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे.
आतंकवाद्यांच्या कारवाया वाढल्यामुळे तालिबान आणि पाकिस्तानी सीमा सुरक्षा दल यांच्यामध्ये चकमक झाली होती. यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि पक्तिका प्रांतात हवाई आक्रमण केले होते. या आक्रमणात ८ जण ठार झाले.
तालिबानची पाकिस्तानला धमकी !
तालिबानने या आक्रमणाचा तीव्र निषेध केला होता. अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, अशी चेतावणी तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद याने पाकिस्तानला दिली होती.
आम्ही आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई केली ! – पाकिस्तान
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही अफगाणिस्तानमध्ये आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाया केल्या आहेत. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि ‘हाफिज गुल बहादूर गट’ पाकिस्तानमध्ये अनेक आतंकवादी आक्रमणांसाठी उत्तरदायी आहेत. नुकतेच उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली येथे एका सुरक्षा चौकीवर आक्रमण करण्यात आले होते. त्यामध्ये ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.