पुणे – ‘मल्टीलेव्हल मार्केटिंग’ योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्या विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने त्याची ३८ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यासह ‘ईडी’ने पुणे, मुंबई आणि कर्णावती येथे धाडी टाकून बँकेतील २३ कोटी रुपयांची रक्कमही गोठवली आहे. खुटे याने ‘काना कॅपिटल’च्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप अन्वेषण यंत्रणेने केला आहे. विनोद खुटे फसवणूक करून दुबईला पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. खुटे याच्या आस्थापनाने मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार केले आहेत, तसेच हवालाद्वारेही त्याने परदेशात पैसे पाठवले. खुटे याने ‘धनश्री मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी’ स्थापन करून गुंतवणूकदारांना चांगल्या व्याजाचे आमीष दाखवून त्यांची फसवणूक केली. पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.