Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट सशस्त्र क्रांतीचा इतिहास आहे !

चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते रणदीप हुडा यांनी दिली माहिती !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते रणदीप हुडा

मुंबई – काँग्रेसचा इतिहास उगाळण्यासाठी मी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट काढलेला नाही. सावरकरांची परिस्थिती आणि त्यांची विचारसरणी कोणत्या परिस्थितीत विकसित होत गेली, हे स्पष्टपणे दाखवण्यासाठी मी हा चित्रपट बनवला आहे. मी सशस्त्र क्रांतीचा इतिहास सांगणारा चित्रपट बनवला आहे. सशस्त्र क्रांती गांधीजींच्या विचारसरणीच्या विरुद्ध होती आणि मला वाटते की, आपण गांधीजी आणि काँग्रेस यांना वेगळे केले पाहिजे, असे मत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते रणदीप हुडा यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले.

सौजन्य : ABP MAJHA

इतिहासात क्रांतीकारकांविषयी अत्यंत संक्षिप्त माहिती !

अभिनेते हुडा म्हणाले की, जेव्हा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट माझ्याकडे आला, तेव्हा मला वाटले की, मला इतिहास ठाऊक आहे; पण जेव्हा मी तो पुन्हा वाचायला आरंभ केला, तेव्हा इतिहासाच्या संपूर्ण पुस्तकात सशस्त्र क्रांतीवर एकच परिच्छेद लिहिलेला होता. वासुदेव बळवंत फडके, टिळक, चापेकर बंधू, खुदीराम बोस, अनंत कान्हरे, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद, नेताजी बोस, गदर पक्षात सहभागी असलेली मंडळी, श्यामजी वर्मा, मॅडम कामा असे सहस्रो लोक सशस्त्र क्रांतीवर विश्‍वास ठेवणारे असतांना हे लोक आपल्या इतिहासात इतके महत्त्वाचे का नाहीत ? त्यांच्यावर काहीही लिहिलेले नव्हते.

(सौजन्य : Zee Music Company)

Swatantrya Veer Savarkar – Official Trailer | 22nd March | Randeep Hooda, Ankita Lokhande, Amit Sial 

इंदिरा गांधी यांनी म्हटले होते, ‘सावरकर शूर स्वातंत्र्यसैनिक होते आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे योगदान मोठे आहे !’

सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हटले जात आहे. याविषयी हुडा यांना विचारले असता रणदीप हुडा म्हणाले, ‘‘मला याचा पुष्कळ त्रास होतो. मी एका मुलाखतीत म्हटल्याप्रमाणे असे कुणी सावरकरांना म्हटल्यावर मला थप्पड मारल्यासारखी वाटते. ‘सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील वीर नव्हते ?’ असे तुम्ही कसे म्हणता ? त्यांच्या (राहुल गांधी यांच्या) आजी (इंदिरा गांधी) यांनी सावरकरजींच्या मृत्यूनंतर मत मांडतांना म्हटले होते ‘ते (सावरकर) एक अतिशय शूर स्वातंत्र्यसैनिक होते आणि स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना घडवत राहील.’ इंदिरा गांधी यांनी सावरकरांवर टपाल तिकीटही काढले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आजीपेक्षा अधिक ठाऊक आहे का ?

रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात सावरकरांना दाखवण्यात आले नव्हते !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित करण्यात आल्यानंतर त्यामधून म. गांधी यांचा अवमान करण्यात आला आहे, अशी टीका होऊ लागली आहे. यावर हुडा यांनी म्हटले की, मी गांधीजींचा अपमान करत आहे, असे नाही; पण हा सावरकरांबद्दलचा चित्रपट आहे, मला त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी गांधी यांच्यावर निर्माण केलेल्या चित्रपटात सावरकर नव्हते. मी अतिशय काळजीपूर्वक विचार करून चित्रपट बनवला आहे. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना एखाद्या व्यक्तीबद्दलच्या काही गोष्टी चांगल्या वाटल्या होत्या, तर त्यांच्या काही गोष्टी एकमेकांपासून खूप वेगळ्या होत्या. भगतसिंह गांधीजींपेक्षा वेगळे होते, गांधीजी सुभाषचंद्र बोस यांच्यापेक्षा वेगळे होते, सुभाषजी इतरांपेक्षा वेगळे होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच मतभेद होते; पण त्यांच्यात काही गोष्टी समान होत्या.

वीर सावरकर आणि इतर क्रांतीकारक यांवर आणखी चित्रपटांची निर्मिती होईल ! – रणजीत सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे अध्यक्ष श्री. रणजीत सावरकर यांनी रणदीप हुडा यांचे चित्रपटावरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने माझी रणदीप यांच्याशी अनेकदा चर्चा झाली होती. त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केले आहे. त्यांनी या भूमिकेसाठी ३० किलो वजन न्यून केले.

सौजन्य : ANI Bharat

ऐतिहासिक घटनांचे जतन करण्यासाठी चित्रपट महत्त्वाचे आहेत. तरुणांना इतिहास कळावा, यासाठी वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अधिक चित्रपटांची निर्मिती करायला हवी. चित्रपट हे एक असे माध्यम आहे, ज्याद्वारे इतिहास नव्या पिढीसमोर मांडता येऊ शकतो. मला आशा आहे की वीर सावरकर आणि इतर क्रांतीकारक यांवर आणखी चित्रपटांची निर्मिती होईल.