काँग्रेसमध्ये नेहरू घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिले जाते ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मुंबई – जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून केवळ स्वत:च्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केले जाते, त्याला घराणेशाहीचे राजकारण म्हणतात. मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील; पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहीत आहे. काँग्रेसमध्ये नेहरू यांच्या घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिले जाते, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘काँग्रेस न होती तो क्या होता ?’ या प्रियम गांधी-मोदी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले,‘‘भाजपने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला, तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचे असेल, तर त्यांनी अवश्य यावे; पण स्वतःच्या शक्तीवर यावे. राजकारणाला स्वतःचा हक्क समजून येऊ नये. घराणेशाहीच्या राजकारणाचे कंबरडे मोडण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. केवळ पुढार्‍याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून यापुढे कुणीही राजकारणात दिसणार नाही. ज्याच्यात क्षमता आहे, तो स्वतःच्या हिमतीवर पुढे जाईल. अशा प्रकारच्या राजकारणाच्या दिशेने आम्ही चाललो आहोत.’’