जळगाव येथे गोरक्षक संजय शर्मा यांचे पोलिसांच्या अन्याय्य वागणुकीच्या निषेधार्थ शिवतीर्थ येथे उपोषण !

(प्रतिकात्मक चित्र)

जळगाव – जिल्ह्यातील बोदवड शहरात अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह बंद करावे, गोतस्करी बंद करावी, या तसेच अन्य मागण्यांसाठी धुळे येथील गोरक्षक श्री. संजय शर्मा यांचे गेल्या ८ दिवसांपासून उपोषण चालू आहे.

बोदवड पोलीस १६ मार्चला श्री. संजय शर्मा यांना आरोग्य पडताळणीच्या नावाखाली जळगाव येथे बळजोरीने घेऊन गेले आणि त्यानंतर बोदवड येथे परत न सोडता जळगाव येथील रुग्णालयातच सोडून निघून गेले. पोलिसांनी मूळ ठिकाणी न सोडता जळगाव येथे सोडल्याने श्री. संजय शर्मा यांनी १७ मार्चला सकाळपासून शिवतीर्थावर उपोषण चालू केले. यानंतर लोकसभेच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत जळगाव पोलिसांनी श्री. संजय शर्मा यांना कह्यात घेतले आहे.

पोलीस प्रशासनाची दडपशाही !

या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना श्री. संजय शर्मा म्हणाले, ‘‘११ मार्चपासून बोदवड येथे गोतस्करीच्या विरोधात, तसेच ‘गोरक्षकांना अमानुष वागणूक देणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना निलंबित करावे’, या मागणीसाठी उपोषण चालू केले होते. पोलिसांनी १६ मार्चला १०० पोलीस आणून बळजोरीने उपोषण बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आमचा तंबू काढला आणि शारीरिक पडताळणी करण्याच्या नावाखाली बळजोरीने रुग्णवाहिकेतून जळगाव येथील रुग्णालयात घेऊन गेले. तेथे आधुनिक वैद्यांनी पडताळणी केल्यावर माझे आरोग्य चांगले असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात मी जळगाव येथील शिवतीर्थावर उपोषण चालू केले. प्रशासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात स्थानिक ठिकाणी गोरक्षकांनी आंदोलन करून या आंदोलनास पाठिंबा द्यावा.’’

संपादकीय भूमिका :

  • गोरक्षकांचे आंदोलन बंद करण्याची दडपशाही करणार्‍या पोलिसांनी हाच जोर गोतस्करांना पकडण्यासाठी लावला असता, तर गोरक्षकांवर आंदोलने करण्याची वेळ आली नसती !
  • गोरक्षकांची तळमळ आणि संघर्ष समजून न घेता अनधिकृत पशूवधगृहांवर कारवाई करण्याऐवजी गोरक्षकांनाच त्रास देणारे प्रशासन पापाचे भागीदार होईल, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?