Bangladeshi Robber Injured : देहलीत पोलिसांशी झालेल्‍या चकमकीत बांगलादेशी दरोडेखोर घायाळ !

बंदुकीच्‍या धाकावर लुटले होते ३ कोटी रुपये

 

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – बांगलादेशी डाकू मेहराज देहली हा पोलिसांशी झालेल्‍या चकमकीत घायाळ झाला. देहली पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. हा बांगलादेशी दरोडेखोर अनेक गुन्‍ह्यांत पोलिसांना हवा होता. गेल्‍या वर्षी त्‍याने देहलीत मोठा दरोडा घातला होता. त्‍याच्‍यासमवेत आणखी एक गुन्‍हेगार शाहिद यालाही अटक करण्‍यात आली आहे.

१५ मार्च २०२४ या दिवशी धुलसिरस भागात दरोडेखोर आणि देहली पोलीस यांच्‍यात चकमक झाली. या दरोडेखोरांना पकडण्‍यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांना पहाताच त्‍यांनी गोळीबार चालू केला. याला प्रत्‍युत्तर म्‍हणून पोलिसांनीही गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्‍या गोळीबारात बांगलादेशी गुन्‍हेगार मेहराज उपाख्‍य मेराज याच्‍या पायाला गोळी लागली, असे पोलिसांनी सांगितले. मेहराजने झाडलेली गोळी पोलीस निरीक्षक अक्षयला लागली, असे पोलिसांनी सांगितले.

मेहराज हा बांगलादेशचा रहिवासी असून त्‍याच्‍याविरुद्ध ५ गुन्‍हे नोंद आहेत. गेल्‍या वर्षी त्‍याने देहलीतील अशोक विहारमध्‍ये एका व्‍यापार्‍याच्‍या घरावर दरोडा घातला होता. बंदुकीच्‍या धाकावर त्‍याने ३ कोटी रुपये लुटले होते. पोलिसांनी त्‍याच्‍याविरुद्ध अशोक नगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवला होता. पोलिसांनी त्‍याच्‍यावर २ लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते.

संपादकीय भूमिका

‘सीएए कायदा झाल्‍यामुळे आता पाकिस्‍तानमधील हिंदू भारतात येतील आणि त्‍यामुळे भारतात चोर्‍या-मार्‍या होतील, दंगली होतील, बेरोजगारी वाढेल’, असे आरोप करणारे देहलचे हिंदुद्वेषी मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल आता बांगलादेशी घुसखोरांविषयी आणि त्‍यांच्‍या या गंभीर कृत्‍यांविषयी चकार शब्‍दही काढत नाहीत, हे लक्षात घ्‍या !