काँग्रेसच्या कुठल्याच सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? यामागील वास्तविक सत्य !

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या रणदीप हुड्डा यांच्या चित्रपटाच्या ‘ट्रेलर’मधील (चित्रपटाचे छोटे विज्ञापन) मथळ्यातील वाक्याने अनेकांचा पोटशूळ उठला आहे. तो पोटशूळ उठण्याचे कारण काँग्रेस प्रेमापेक्षा सिनेमाच्या ‘ट्रेलर’ला मिळणारा भरभरून प्रतिसाद हे आहे. ‘विश्वभरात आपल्यासारखा महान कुणी नाही, अशी समजूत असणार्‍या महाभागाने ‘अहिंसक आंदोलन करणारे काळ्यापाण्यावर कसे जातील ? हेही याला कळत नाही का ?’, अशा अर्थी काही लिहिले आहे. त्या अहिंसक आंदोलनाची ‘हिंसक’ बाजू येथे देत आहे.

१. जवाहरलाल नेहरू यांना कारावासात देण्यात येणारी पंचतारांकित वागणूक !

मंजिरी मराठे

मोहनदास गांधींनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची घोषणा केली. ८ ऑगस्ट १९४२ च्या रात्रीच गांधी, नेहरूंसह अनेक नेत्यांना अटक झाली. गांधींना आगाखान पॅलेसमध्ये, तर नेहरूंना ठेवण्यात आले अहमदनगर किल्ल्यात ! पहिल्याच दिवशी जेवायला थाळा मिळाल्यावर नेहरू भडकले. तेव्हा जेलर म्हणाला, ‘‘क्षमा करा. आजचा दिवस कळ काढा.’’ दुसर्‍याच दिवशी ‘डिनर प्लेट्स’ (जेवणाच्या ताटल्या) आल्या. त्यांना भारतीय भोजन नाही, तर युरोपियन भोजनच आवडते; म्हणून कारागृहात त्यांच्यासाठी खास ‘शेफ’ (आचारी) तैनात करण्यात आला. नेहरूंना वाटले, ‘कारागृहात गुलाबाची बाग फुलवली पाहिजे.’ मग रोपे मागवण्यात आली आणि स्वतः मातीत हातही न घालता, नेहरूंनी आपल्या सहकार्‍यांकडून ते काम करवून घेतले’, असे मौलाना आझाद यांनीच लिहिले आहे. नेहरूंसाठी तिथे बंदीवानांकडून खास बॅडमिंटन कोर्टही (मैदान) बनवून घेण्यात आले होते. त्यांना तिथे अनेकांकडून पुस्तके, मध, इलेक्ट्रिक रेझर (दाढी करण्यासाठीचे उपकरण), त्यांची आवडती ‘५५५ सिगार’ अशा असंख्य गोष्टी त्यांना भेट म्हणून मिळत होत्या. कारावासातील या ‘सन्माननीय पाहुण्यांसाठी’ सुचेता कृपलानी यांनी ‘ग्रामोफोन’ (पूर्वीच्या काळी ध्वनीचकत्यांसाठी वापरण्यात येणारे उपकरण) आणि काही ठराविक ‘रेकॉर्ड्स’ (ध्वनीचकत्या) पाठवल्या होत्या, ‘माझ्यासाठी तो दिवस विशेष होता’, असे नेहरूंनीच म्हटले आहे.

कारावासातील नेहरूंची खोली

प्रतिवर्षी नेहरूंचे वाढदिवस साजरे होत होते. त्यांना हारतुरे अर्पण केले जात होते. फुलांनी त्यांचे जेवणाचे टेबल सजवले जात होते आणि बरेच काही घडत होते…. कारावासातील नेहरूंच्या अडचणी तर फारच विशेष होत्या. त्यांचा ‘सिगारेट होल्डर’ तुटला; म्हणून नवा मागवण्यात आला. तो लहान होता; म्हणून मग परत मागवण्यात आला. मधाची बाटली बॅगेतच फुटली. त्यामुळे सर्व सामान चिकट झाले वगैरे वगैरे. नेहरूंना जेव्हा जेव्हा कारावासात ठेवण्यात आले ते नेहमीच थंड हवेच्या ठिकाणी ! उन्हाळा चालू झाला की, त्यांना दुसरीकडे नेण्यात येत असे.

२. मोहनदास गांधी, त्यांच्या पत्नी आणि सरोजिनी नायडू यांना कारावासात देण्यात आलेल्या सुविधा

त्या वेळी गांधी आगाखान पॅलेसमध्येच होते. त्यांच्यासह त्यांची पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे स्वीय साहाय्यक महादेवभाई देसाई हेही होते. गांधींच्या जेलरने त्यांच्या ७४ व्या वाढदिवसाला त्यांना बकरीच्या दुधाचे आईस्क्रीम खायला दिले. फुलमाळा दिल्या, भेट म्हणून ७४ रुपयेही दिले. गांधींच्या तिथीनुसार येणार्‍या ७५ व्या वाढदिवसाला त्याने ७५ रुपये भेट दिले. सहबंदी सरोजिनी नायडू यांच्या वाढदिवसानिमित्तसुद्धा जेलरने त्यांना बकरीच्या दुधाचे आईस्क्रीम खायला दिले. गांधींचा नेहमीचा पौष्टिक खुराक, म्हणजे बकरीचे दूध, खजूर, फळे हे सगळेही त्यांना व्यवस्थित मिळत होते. या कारावासातील त्यांचा आणि कुटुंबाचा सर्व व्यय शासन करत होते.

३. स्वतः सुखनैव कारावास भोगणार्‍या गांधींनी अनुयायांची साधी चौकशीही न करणे !

ब्रिटीशनिष्ठ गांधी, नेहरू असा सुखाचा कारावास भोगत असतांना गांधींच्या शब्दाखातर रस्त्यावर उतरलेल्या सत्याग्रहींची काय स्थिती होती ? नेत्यांविना असलेले वर्ष १९४२ चे आंदोलन अहिंसक राहिले नाही, ते हिंसकच बनले. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अनेक ठिकाणी सत्याग्रहींवर विमानातून बंदुकीने मारा करण्यात आला. त्यात सहस्रो मरण पावले, म्हणजेच गांधी, नेहरूंसारखे नेते कारावासात होते; पण मजेत ! भरडले गेले ते सामान्य सत्याग्रही.

‘करेंगे या मरेंगे’, ही घोषणा देणार्‍या गांधींनी ती स्वत: कधीच आचरणात आणली नाही. त्यांच्या देखत त्यांच्या अनुयायाला मारहाण झाली; पण गांधी गप्प बसले. ‘मला वेगळी गाडी नको, मला सगळ्यांसह ‘व्हॅन’ने (गाडीने) जायचे आहे’, असे ते फक्त म्हणाले; पण ‘गाडीत बसा’ म्हटल्यावर वेगळ्या गाडीत बसले. बरेच दिवस विशेष सुविधा उपभोगल्यावर ‘मला आता यापुढे विशेष सुविधा नकोत; पण माझ्या शारीरिक गरजांसाठी मला माझे विशेष खाद्य मात्र दिले जावे’, असे गांधी यांनी लिहिले आहे. ‘पटेलांसारख्या नेत्यांनाही आगाखान पॅलेसमध्ये पाठवा, आम्हा नेत्यांना एकत्र तरी राहू द्या’, असे म्हणणार्‍या गांधींना स्वतःचे अनुयायी काय परिस्थितीत आहेत ? ते मात्र विचारवेसे वाटले नाही. असे हे आपले राष्ट्रपिता महात्माजी !

४. गांधी, नेहरू आणि बाबाराव सावरकर यांना ब्रिटिशांनी दिलेल्या वागणुकीतील तफावत !

कारावासातही गांधीजींसह त्यांच्या पत्नी होती; पण ब्रिटिशांनी बाबाराव सावरकर यांच्या पत्नीला ८ वर्षे भेटू दिले नाही आणि पतीच्या भेटीसाठी झुरत त्या माऊलींनी देह ठेवला. त्यांच्या निधनाची बातमी बाबारावांना कळवायची तसदीही ब्रिटिशांनी घेतली नाही; पण कमला नेहरूंवर युरोपमध्ये उपचार चालू असतांना त्यांना भेटण्यासाठी नेहरूंना ५ वेळा ‘पॅरोल’वर (संचित रजेवर) सोडण्यात आले. सप्टेंबर १९३५ मध्ये साडेपाच मासांची शिक्षा उरलेली असतांना नेहरूंना ब्रिटिशांनी अचानक सोडले. त्याच संध्याकाळी ते विमानाने युरोपला गेले आणि कमला नेहरूंच्या निधनापर्यंत (वर्ष १९३६ पर्यंत) ते जर्मनीतच राहिले. हे फळ होते गांधी, नेहरूंच्या ब्रिटीशनिष्ठेचे…!

त्यामुळे सावरकरद्वेष्ट्यांनी आधी गांधी, नेहरू पूर्ण वाचावेत आणि मगच आरोप करावेत अन् स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटही बघावा, सगळा संभ्रम दूर होईल.

– मंजिरी मराठे, कोषाध्यक्ष, स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक
(साभार: मंजिरी मराठे यांच्या फेसबुकवरून)