आज १४.३.२०२४ या दिवशी राघवेंद्र माणगावकर यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…
नागेशी (फोंडा, गोवा) येथील राघवेंद्र माणगावकर (वय ६७ वर्षे) यांचे ३.३.२०२४ या दिवशी पहाटे निधन झाले. १४.३.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे पुत्र श्री. वैभव माणगावकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
अ. ‘बाबांना शारीरिक त्रास होत असतांनाही ते आईला सेवेसाठी पाठवत असत.
आ. ते सतत नामजप करत असत. त्यांना सांगितलेले नामजपादी उपाय ते पूर्ण करत असत.
इ. साधकांशी किंवा आमच्याशी बोलतांना प.पू. गुरुदेवांचा उल्लेख आला, तर बाबांच्या डोळ्यांतून भावाश्रू येत असत.
२. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
२ अ. निधनाच्या आदल्या दिवशी एका वेगळ्याच लोकात असल्याचे जाणवणे : निधनाच्या आदल्या दिवशी, म्हणजे २.३.२०२४ या दिवशी बाबांना बरे वाटत नव्हते; म्हणून ते झोपले होते. त्यांना जेवायला उठवले, तरी ते उठत नव्हते. आईने त्यांना आग्रहाने उठवल्यावर ते आईला म्हणाले, ‘‘मी कोणत्या तरी वेगळ्या लोकात आहे. ‘मी कुठे आहे ?’, हे मला कळत नाही. ‘मी मातीचे एक घर बांधत आहे’, असे मला स्वप्नात दिसले.’’
२ आ. रुग्णालयात भरती केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी बाबांसाठी नामजपादी उपाय करण्यास सांगणे : रुग्णालयात बाबांवर उपचार चालू असतांना पहाटे ४ च्या सुमारास श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भ्रमणभाष केला आणि त्यांनी आम्हाला बाबांच्या सर्व चक्रांवर सूक्ष्मातून विभूती लावायला सांगितली, तसेच नामजप करायला सांगितला. त्यानंतर आम्ही बाबांना ‘नामजप करताय ना ?’, असे विचारल्यावर त्यांनी मान हालवून होकार दिला.
३. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
३ अ. निधनानंतर संशोधनाच्या दृष्टीने बाबांची नखे आणि केस काढत असतांना त्यांना ते समजत असल्याचे त्यांनी आईला सूक्ष्मातून सांगणे : पहाटे ४.३० वाजता बाबांचे रुग्णालयात निधन झाले. बाबांना रुग्णालयातून घरी आणल्यानंतर साधक आध्यात्मिक संशोधनासाठी बाबांची नखे आणि केस काढत होते. दुसर्या दिवशी पहाटे आईला जाणवले, ‘बाबा तिच्या जवळ सूक्ष्मातून येऊन सांगत आहेत की, ‘माझी नखे आणि केस काढत आहेत’, हे त्या वेळी मला समजत होते.’
३ आ. घरातील वातावरणात दाब आणि भीती जाणवत नव्हती.
३ इ. त्यांच्या दोन्ही पायांचे तळवे पिवळे झाले होते.
३ ई. पू. संदीपदादांनी (सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांनी) सांगितले, ‘‘बाबांचा देह चैतन्यमय झाला आहे. ते गुरुदेवांशी एकरूप झाले आहेत.’’
३ उ. त्यांना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जात असतांना सर्व साधक भावपूर्ण नामजप करत होते. विधी चालू असतांना वातावरण शांत वाटत होते आणि थंड वारा वहात होता.
३ ऊ. त्यांना अग्नी दिल्यानंतर ज्वाळांचा रंग पिवळा आणि निळा दिसत होता.
३ ए. अस्थींना सुगंध येत असल्याचे जाणवणे : ३.३.२०२४ या दिवशी त्यांच्यावर अग्नीसंस्कार करण्यात आले आणि दुसर्या दिवशी, म्हणजे ४.३.२०२४ या दिवशी अस्थीविसर्जन करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी विधी संपवून अस्थीविसर्जनासाठी खांडेपार येथे जात असतांना ‘अस्थींना सुगंध येत आहे’, असे मला जाणवले.
४. निधनानंतर आलेल्या अनुभूती
अ. घरी आलेल्या नातेवाइकांना घरातील वातावरण दुःखद वाटत नव्हते. त्यांनाही आनंद जाणवत होता. ‘एखादे शुभ कार्य होणार आहे’, असे त्यांना वाटत होते.
आ. बाबा गेल्यानंतर तिसर्या दिवशी आईच्या स्वप्नात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आल्या होत्या. त्यांनी सांगितले, ‘काही काळजी करू नका. काकांना आता पुढची गती प्राप्त झाली आहे.’
इ. ८.३.२०२४ या दिवशी पहाटे आई नामजप करत होती. त्या वेळी तिला बाबा पांढर्या कपड्यांमध्ये दिसले. त्यांनी तिला सांगितले, ‘माझा केवळ स्थूलदेहच गेला आहे. मी सूक्ष्म देहाने तुझ्या समवेतच आहे.’
ई. ८.३.२०२४ या दिवशी एक साधक आम्हाला भेटायला आले होते. त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘मला स्वप्नात बाबा सेवा करतांना दिसले. ते मला म्हणाले की, मी आता पुढच्या प्रवासासाठी निघालो.’’
उ. ९.३.२०२४ या दिवशी आई नामजपाला बसली होती. तेव्हा बाबा तिच्याशी सूक्ष्मातून बोलत असल्याचे तिला जाणवले. त्या वेळी ते तिला म्हणाले, ‘तू स्थुलातून सेवा कर आणि मी सूक्ष्मातून सेवा करतो.’
ऊ. ‘ते गेले आहेत’, असे अजूनही वाटत नाही. ‘ते इथेच बाहेर गेले आहेत आणि परत येणार आहेत. ते गुरुदेवांच्या चरणी समर्पित झाले आहेत’, असे मला वाटते.’
नातेवाइकांनी सांगितलेली माणगावकरकाका यांची गुणवैशिष्ट्ये
‘बाबांच्या अंत्यविधीला आलेल्या नातेवाइकांनी सांगितले, ‘‘बाबांसारखा देवमाणूस होणे शक्य नाही. ते प्रत्येक वेळी इतरांचा विचार करत असत. ते काटकसरी आणि मितभाषी होते. त्यांनी कधीही कोणाचे मन दुखावले नाही.’’
– श्री. वैभव माणगावकर ((कै.) राघवेंद्र माणगावकर यांचे पुत्र), नागेशी, फोंडा, गोवा. (१०.३.२०२४)
|