पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वी असाच विळखा पंजाबलाही पडला होता. अनेक घरांतील तरुण यात उद्ध्वस्त झाले. या ‘उडता पंजाब’च्या प्रकरणाची भयावहता दर्शवणारा एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. चिमूटभर अमली पदार्थाची नशा सर्वकाही विसरायला लावते. नशेची ‘किक’ लागली की, ना अभ्यासाची चिंता रहाते, ना घरच्यांचे भय आणि ना भविष्याची काळजी. त्यामळे तरुणांमध्ये या नशेचा प्रचार झपाट्याने होतो. गेल्या काही वर्षांत सांस्कृतिक पुणे शहरात ‘डिस्को बार’ आणि ‘पब’ यांची संख्या कमालीची वाढली आहे. या पबमध्ये तरुणांना अमली पदार्थ पुरवणार्या टोळ्याही कार्यरत असतात. एकदा व्यसन लागले किंवा वेळेत अमली पदार्थ न मिळाल्यास या नशेखोरांचा जीव कासावीस होतो. अमली पदार्थ मिळवण्यासाठी ही मंडळी मग कोणत्याही थराला जातात, पालकांशी खोटे बोलतात, घरी चोर्या करतात, यांपैकी काहीच करायला जमले नाही, तर इतरांना लुटायलाही ही मंडळी मागेपुढे पहात नाहीत. हे पदार्थ मेंदूवर भयंकर परिणाम करतात. नशेची हुक्की आली की, नशा करणारे वेडेपिसे होतात. त्या वेळी त्यांना दुसरे काहीच सुचत नाही. त्या वेळी अमली पदार्थ देण्याच्या मोबदल्यात कुणाच्या घरी दरोडा घालण्यास सांगितले, तरी ही मंडळी मागे-पुढे पहात नाहीत. त्यामुळे अमली पदार्थाच्या मोबदल्यात या तरुणांकडून तस्करी, अपहरण, हत्या यांसारखे भयंकर गुन्हे करून घेणार्या टोळ्याही समाजात कार्यरत असतात. मुलींना या नशेची सवय लावून त्यांना ती देण्यासाठी फसवणे, त्यांचे लैंगिक शोषण करणे अशा गोष्टीही केल्या जातात.
गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्या काही हिंदी चित्रपट आणि ‘ओटीटी प्लॅटफॉर्म्स’वरील वेब सिरीजमधून खलनायकाला पडद्यावर अमली पदार्थांचे सेवन करतांना दाखवण्यात आले आहे. अमली पदार्थाचे सेवन केल्यावर काही क्षणातच त्या खलनायकात एक विलक्षण शक्ती निर्माण होते आणि त्या शक्तीच्या बळावर तो भयंकर विध्वंस करू लागतो अशा प्रकारचे त्यातील चित्रण म्हणजे अमली पदार्थांचे एक प्रकारचे विज्ञापनच म्हणावे लागेल ! ‘अधिक बळ मिळवायचे असेल, तर व्यायामादि शक्तीची उपासना करण्याची आवश्यकता नाही, केवळ चिमूटभर अमली पदार्थ आपल्याला अपरिमित शक्ती बहाल करू शकते’, हा संदेश अशा प्रकारच्या दृश्यांमधून जातो. बलात्कार, खून यांसारखे गुन्हेही नशा करून होतात, असे लक्षात आले. तरुणांना नशेपासून रोखण्यासाठी पालकांचा पुढाकार हवा. तरुण मुले-मुली बाहेर काय करतात, याकडे पालकांचे बारकाईने लक्ष हवे. त्यांच्याशी सुसंवाद असण्यासमवेतच त्यांच्यावर उपासनेचे संस्कार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई