गुरुकार्याचा ध्यास असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक !

पू. (सौ.) मनीषा पाठक यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांनी साधकांना साधनेविषयी केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे. ११.३.२०२४ या दिवशी यातील काही सूत्रे आपण पाहिली. आज अंतिम भाग पाहू.(भाग ६)

पू. (सौ.) मनीषा पाठक

२५. श्री. अभिजित कुलकर्णी, मिनिआपोलीस, अमेरिका.

२५ अ. पू. मनीषाताई म्हणजे साधकांचा आधारस्तंभ ! : ‘पू. मनीषाताईंबद्दल एका शब्दात सांगायचे झाले, तर पू. मनीषाताई म्हणजे ‘आधार !’ साधना, सेवा यांतील, तसेच व्यावहारिक, कार्यालयीन आणि कौटुंबिक अडचणी यांविषयी पू. ताईंकडून मला सातत्याने मार्गदर्शन मिळत असे. त्यामुळे ‘सकारात्मक राहून साधना आणि सेवा करावी’, असे मला वाटत असे.

२५ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची जाणीव करून देणे : मी पुणे जिल्ह्यात सेवा करत असतांना माझ्याकडून अनेक वेळा चुका झाल्या. त्या वेळी मला सेवेचा ताण येत असे. माझ्याकडून निष्कर्ष काढले जायचे. तेव्हा पू. ताईंनी माझ्यातील प्रबळ स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंची मला जाणीव करून दिली.

२५ इ. पू. मनीषाताईंशी बोलल्यावर सेवेचा ताण दूर होणे : सेवेविषयी एखादे सूत्र जिल्ह्यात व्यापक स्तरावर राबवायचे असेल, तर मला ताण येत असे. त्या वेळी पू. मनीषाताईंशी बोलल्यावर मला आलेला ताण काही क्षणांतच दूर होत असे. ते सूत्र नेमकेपणाने आणि सहजतेने पूर्ण होत असे. पू. ताई मला योग्य दृष्टीकोन देऊन प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करत असत.

२५ ई. प.पू. गुरुदेवांचे पुणे जिल्ह्यातील सगुण रूप म्हणजे पू. मनीषाताई !’

२६. सौ. गौरी अभिजित कुलकर्णी, मिनिआपोलीस, अमेरिका.

२६ अ. साधिकेला सर्वतोपरी साहाय्य करणे

१. ‘मी नोकरीनिमित्त पुणे येथे आल्यावर माझी पू. मनीषाताईंशी ओळख झाली. पू. ताईंना पहिल्यांदा भेटल्यावर मला त्यांच्या बोलण्यात सहजता, मोकळेपणा आणि प्रेमभाव जाणवला. मला पुण्यात रहाण्यासाठी घरही त्यांनीच दाखवले होते. त्यानंतर माझा सेवेनिमित्त पू. ताईंशी संपर्क होत असे. माझी पू. ताईंशी जवळीक झाली. माझ्या विवाहानंतर मी आणि यजमान (श्री. अभिजित कुलकर्णी) सिंहगड रस्ता (पुणे) येथे रहात होतो. तेव्हा पू. ताईंकडे सिंहगड रस्ता येथील अध्यात्मप्रसाराची सेवा होती. त्यामुळे तिथेही मला पू. ताईंचा सहवास लाभला. माझ्या गरोदरपणाच्या काळात माझे यजमान विदेशात होते. तेव्हा मला पू. ताईंचा आधार होता. त्यांनीच मला चांगल्या आधुनिक वैद्यांविषयी सांगितले.

२. सध्या आम्ही अमेरिकेत रहात असूनही पू. ताईंचे आम्हाला साधनेत साहाय्य होत आहे. पू. ताई व्यस्त असूनही रात्री वेळ काढून त्या आमच्याशी बोलतात. ‘विदेशातही आमची साधना व्यवस्थित चालू रहावी’, अशी त्यांची तळमळ असते. त्यांच्या बोलण्यातून जाणवणारे प्रेम खरेच अनमोल आहे.

‘हे गुरुदेवा, ‘पू. मनीषाताईंप्रमाणे आमच्यातही साधनेची तीव्र तळमळ, गुरुचरणांचा ध्यास, गुरुचरणी भाव आणि दृढ श्रद्धा निर्माण होऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३)

संतपदी विराजमान जाहल्या पू. मनीषाताई ।

त्रासांवर मात करूनी ।
तळमळीने अन् निष्ठेने साधना करूनी ।
प्रीतीचा अखंड वर्षाव करूनी ।
त्या अंतरी अखंड भावस्थिती अनुभवती ।। १ ।।

गुरुचरणी दृढ श्रद्धा ज्यांच्या ठायी ।
प्रत्येक साधकाचा त्या आधार होती ।
पुणे जिल्ह्याच्या आध्यात्मिक आई ।
आज संतपदी विराजमान जाहल्या ।। २ ।।

बालकाप्रमाणे निरागस पू. मनीषाताई ।
आनंद अन् उत्साह यांचा झरा पू. मनीषाताई ।
सकारात्मकतेची खाण पू. मनीषाताई ।
निरपेक्ष प्रेमाची खूण पू. मनीषाताई ।। ३ ।।

तीव्र तळमळीची प्रतिकृती पू. मनीषाताई ।
गुरुसेवेचा ध्यास असणार्‍या पू. मनीषाताई ।
कठोरपणे प्रक्रिया (टीप) राबवणार्‍या पू. मनीषाताई ।
तीव्र प्रारब्धावर गुरुकृपेने मात करणार्‍या पू. मनीषाताई ।। ४ ।।

साधकांचा आधार पू. मनीषाताई ।
साधकांना वात्सल्यभावे घडवणार्‍या पू. मनीषाताई ।
सदैव इतरांसाठी झिजणार्‍या पू. मनीषाताई ।
रात्रंदिवस साधकांना साहाय्य करणार्‍या पू. मनीषाताई ।। ५ ।।

अखंड साधनारत असती पू. मनीषाताई ।
दृढ श्रद्धा अंतरी असलेल्या पू. मनीषाताई ।
सदा भावभक्तीत रंगलेल्या पू. मनीषाताई ।
अखंड अनुसंधानात रमलेल्या पू. मनीषाताई ।। ६ ।।

टीप – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’

– सौ. गौरी अभिजित कुलकर्णी, मिनिआपोलीस, अमेरिका. (१६.३.२०२३) ॐ

मनीषामावशी जाहली पूज्य मनीषामावशी ।

कु. ईश्वरी कुलकर्णी

‘पू. मनीषामावशी (पू. (सौ.) मनीषा महेश पाठक) संत झाल्याचे ऐकून मला पुष्कळ आनंद झाला. मला तिच्या समवेत रहायला आवडते. मी आईसह पुण्यातील सेवाकेंद्रात जाते. तेव्हा पू. मनीषामावशीला भेटल्यावर मला साधनेचे प्रयत्न करावेसे वाटतात. पू. मावशीला भेटल्यावर माझ्यावरील वाईट शक्तीचे आवरण दूर होते. मला पुष्कळ दिवसांपासून वाटत होते, ‘मनीषामावशी लवकर संतपदी विराजमान होईल’ आणि तो दिवस आला. मला पुष्कळ आनंद झाला.

आहे देवाच्या अनुसंधानात माझी मनीषामावशी ।
म्हणून ती जाहली पूज्य मनीषामावशी ।। १ ।।

परम पूज्यांची शिष्या आहे ती ।
म्हणून जाहली पूज्य मनीषामावशी ।। २ ।।

सेवा अन् साधना करते पुष्कळ ती ।
म्हणून जाहली पूज्य मनीषामावशी ।। ३ ।।

साधकांना साहाय्य करते ती ।
म्हणून ती जाहली पूज्य मनीषामावशी ।। ४ ।।

– कु. ईश्वरी अभिजित कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय १० वर्षे), मिनिआपोलीस, अमेरिका. (१६.३.२०२३) ॐ

२७. सौ. पूनम प्रकाश होमकर, सिंहगड रस्ता, पुणे.

२७ अ. प्रतिकूल प्रसंगातून साधिकेच्या मुलाला बाहेर काढणे : ‘५.७.२०२१ या दिवशी माझ्या मुलीचे निधन झाले. पू. मनीषाताईंनी माझा मुलगा श्री. सौरभ याला भाऊ मानले आणि त्याला त्या प्रसंगातून बाहेर काढले. या अविस्मरणीय भावभेटीसाठी पू. मनीषाताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

२८. सौ. अस्मिता जनार्दन आवटी, सिंहगड रस्ता, पुणे.

२८ अ. पू. (सौ.) मनीषाताईंच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती !

१. प्रत्येक वेळी सत्संगाला जातांना मला पुष्कळ अडचणी येतात, तसेच आध्यात्मिक त्रास होतो; परंतु या सोहळ्याला जातांना मला कोणतीही अडचण आली नाही किंवा त्रास झाला नाही.

२. सोहळ्याच्या ठिकाणी मला थंड आणि चैतन्यमय लहरी जाणवत होत्या.

३. ‘माझा देह, मन आणि बुद्धी यांवरील काळे आवरण नष्ट होऊन माझा देह फुलाप्रमाणे हलका झाला आहे,’ असे मला वाटत होते.’

२९. सौ. अनुराधा विनीत पाटील, पुणे

२९ अ. ‘पू. मनीषाताईंमधील गुणांमुळे त्या संत आहेत’, असे पूर्वीपासूनच वाटणे : श्री गुरुकृपेने आम्ही (मी, यजमान श्री. विनीत पाटील आणि मुलगी चि. मोक्षदा पाटील) पुणे येथे वर्ष २०२२ मध्ये पूर्णवेळ साधना करण्यास आल्यापासून आम्हाला पू. मनीषाताईंचा सहवास आणि मार्गदर्शन मिळत आहे. पू. ताईंमधील ‘व्यष्टी साधनेची तळमळ, नेतृत्वगुण, सतर्कता, साधकांना तत्त्वनिष्ठतेने आणि प्रेमाने घडवणे, प्रत्येक सूत्र श्री गुरुदेवांशी जोडणे, सतत गुरुस्मरण करणे, भाव’, हे सर्व मला जवळून अनुभवता आले. हे पाहून मला सतत वाटायचे, ‘असे संतच करू शकतात. पू. ताई संतच आहेत.’ त्यानंतर मनीषाताईंना संत म्हणून घोषित करण्यात आले.

३०. कु. सुकृता पांडुरंग कांडलकर (वय १३ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.

३० अ. प्रेमभाव : ‘मी जेव्हा पू. ताईंकडे जाते, तेव्हा पू. ताई माझ्याशी प्रेमाने बोलतात. पू. ताई मला म्हणतात, ‘‘तू माझ्यासाठी माझी मुलगी कु. प्रार्थना हिच्यासारखीच आहेस.’’ तेव्हा मला छान वाटते आणि पू. ताईमधील प्रेमभाव मला शिकायला मिळतो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून चांगले प्रयत्न झाल्यास पू. ताई मला खाऊ देतात.

३० आ. अनुभूती : पू. ताईंनी मला एक बटवा भेट म्हणून दिला होता. आता त्या बटव्याला छान सुगंध येत आहे.’

३१. सौ. अश्विनी अशोक ब्रह्मे (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६५ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.

३१ अ. आईप्रमाणे प्रेमाने मार्गदर्शन करून साधकांना घडवणे : ‘पू. मनीषाताई मला ‘काटकसरीने कसे रहायचे ? घराचा आश्रम कसा करायचा ? घरात साधकत्वाने कसे वागायचे ? क्षमायाचना केल्यावर अहं न्यून कसा होतो ? सतत नमते घेतल्याने आपण साधनेत पुढे कसे जातो ? गुरुदेवांप्रती भाव कसा ठेवायचा ?’, अशी अनेक सूत्रे आईप्रमाणे प्रेमाने आणि मनापासून सांगतात.’

३२. सौ. संगीता विलास जागडे (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ४८ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.

३२ अ. साधिकेला भावपूर्ण सेवा करण्यास शिकवणे : ‘काही साधक उपचारांसाठी पुणे येथे आले होते. त्या वेळी ‘त्यांचा अल्पाहार आणि महाप्रसाद यांचे नियोजन भावपूर्ण अन् परिपूर्ण कसे करायचे ?’, हे पू. मनीषाताईंकडून मला शिकायला मिळाले.

३३. सौ. मंगला अरविंद सहस्रबुद्धे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६९ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.

३३ अ. प्रेमभाव : ‘२० वर्षांपूर्वी प.पू. गुरुमाऊलींच्या कृपेने माझी पू. मनीषाताई यांच्याशी ओळख झाली. त्या वेळी पू. ताई सिंहगड रस्ता येथे अध्यात्मप्रसाराची सेवा करत होत्या. आम्ही दोघींनी अनेक सेवा एकत्रितपणे केल्या आहेत. पू. ताईंमध्ये अपार प्रेमभाव आहे. त्यांना पहाताक्षणीच ती आम्हा उभयतांची (पू. अरविंद आणि सौ. मंगला सहस्रबुद्धे यांची) मानसकन्या झाली. पू. ताईंनी आम्हा उभयतांवर मुलीप्रमाणे प्रेम केले. पू. मनीषाताईंचे प्रेम, म्हणजे आध्यात्मिक स्तरावरची प्रीती आहे.

३३ आ. साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करून घडवणे : २० वर्षांच्या कालावधीत आम्हा उभयतांना पू. मनीषाताईंनी घडवले आहे. ‘स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांचे पैलू दूर कसे करायचे ? गुरुदेवांना अपेक्षित असा प्रेमभाव कसा वाढवायचा ? प.पू. गुरुदेवांप्रती श्रद्धा अन् भावभक्ती कशी वाढवायची ? सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण कशी करायची ?’, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन पू. ताईंनी आम्हाला केले.

३३ इ. साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे : पू. मनीषाताईंनी मला अनेक वेळा सत्संगांच्या माध्यमातून माझ्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून दिली आहे. माझ्यातील स्वभावदोषांमुळे मी कुटुंबातील प्रसंगांमध्ये अनेक मास अडकून रहात असे. त्या त्या वेळी पू. मनीषाताईंनी मला त्यातून बाहेर काढले. आम्हा उभयतांची आध्यात्मिक उन्नती होण्यात पू. ताईंचा सिंहाचा वाटा आहे.

३३ ई. ‘कितीही प्रतिकूल परिस्थिती आली, तरी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांवरची श्रद्धा ढळू द्यायची नाही’, हे सूत्र पू. मनीषाताई स्वतः जगल्या आहेत.

३३ उ. ‘साधकांनी कार्यापेक्षा स्वतःतील साधकत्वाकडे लक्ष द्यायला हवे’, यावर त्यांचा कटाक्ष आहे.

३३ ऊ. पू. मनीषाताईंच्या सहवासात आल्यावर अनेक साधकांची आध्यात्मिक उन्नती झाली आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३) ॐ

पू. मनीषाताई, म्हणजे जणू साधकांची समष्टी आई । 

गुरुकृपेने आज पुण्यनगरी भारावली ।
आजच्या मंगलदिनी आनंदवार्ता आली ।। १ ।।

निसर्गही आनंदला पाऊस शिंपत ।
आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवत ।। २ ।।

सद्गुरुमाऊलीच्या चेहर्‍यावरील गोड हास्य ।
गुरुकृपेने उलगडले आज रहस्य ।। ३ ।।

प्रेमभाव, भक्तीभाव अन् दृढ श्रद्धा तिच्या अंतरी ।
गुणांचीच खाण, गुण सांगू तरी किती ।। ४ ।।

आनंदवार्ता आली, आनंदवार्ता आली ।
सर्वांची लाडकी ताई संतपदी विराजमान झाली ।। ५ ।।

आज साधकांच्या आनंदाला उरला नाही पारावार ।
पू. मनीषाताई आहे सर्वांचा आधार ।। ६ ।।

पू. मनीषाताई जणू साधकांची समष्टी आई ।
गुरुमाऊली होऊ कशी उतराई, होऊ कशी उतराई ।। ७ ।।

– सौ. आरती पांडुरंग कांडलकर, सिंहगड रस्ता, पुणे. (१६.३.२०२३) ॐ

३४. पुणे येथील सर्व साधक

३४ अ. तीव्र शारीरिक त्रासातही आनंदी असणे : ‘पू. मनीषाताईंना कितीही शारीरिक त्रास झाला, तरीही तो त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येत नाही. पू. ताई नेहमी सांगतात, ‘‘आपल्याला कितीही त्रास होत असला, तरीही आपण आनंदी असायला हवे. अन्य साधकांना आपल्याशी बोलतांना आनंद मिळायला हवा.’’

३४ आ. गुरुकार्याचा ध्यास : पू. मनीषाताईंना गेल्या अनेक वर्षांपासून तीव्र शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असूनही त्या अखंड सेवारत असतात. शारीरिक त्रासांमुळे त्यांना कधी रुग्णालयात भरती करावे लागले, तर त्या तेथेही भ्रमणभाषवरून सेवा करतात.

३४ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा उच्च कोटीचा भाव

१. पू. ताईंना तीव्र शारीरिक त्रास असूनही त्यांनी एकदाही याविषयी गार्‍हाणे केले नाही. त्या म्हणतात, ‘‘प.पू. गुरुदेव माझे प्रारब्ध नष्ट करत आहेत. मी साधकांशी बोलण्याची सेवा करू शकते. देवाने सर्व दिले आहे. मी कुठे काय करते ? मी न्यून पडते.’’

२. पू. ताई सांगतात, ‘‘आरंभी प.पू. गुरुदेव आणि शेवटीही प.पू. गुरुदेवच आहेत. आपल्याला सतत त्यांच्याशी बोलायचे आहे. त्यांनाच सर्व सांगायचे आहे. तेच सेवेच्या वेळी सर्व साधकांसह असतात; म्हणूनच सर्व सेवा होतात.’’

(सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२३)

(समाप्त)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.