अग्नी-५ क्षेपणास्त्र चाचणीवर होती चिनी जहाजाची दृष्टी !

आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांच्या समुद्रकिनार्‍यांवरही चिनी जहाजांचे लक्ष !

‘अग्नी-५’ क्षेपणास्त्र

बीजिंग/नवी दिल्ली – भारताच्या स्वदेशी बनावटीच्या ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टारगेटेबल री-एंट्री व्हेईकल’ तंत्रज्ञानाद्वारे विकसित केलेल्या ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राची चाचणी ११ मार्च या दिवशी यशस्वी झाली. ओडिशाच्या किनारपट्टीवरून झालेल्या या चाचणीवर चीनच्या गुप्तचर जहाजाची दृष्टी होती. भारताने चाचणीसाठी जवळपासच्या देशांना काही दिवसांपूर्वी एक चेतावणी प्रसारित केली होती. याला ‘नोटॅम’ म्हणजे ‘नोटीस टू एअर मिशन्स’ म्हणतात.

यावरून बीजिंगने भारतीय किनारपट्टीपासून काही अंतरावर आंतरराष्ट्रीय पाण्यात एक संशोधन जहाज तैनात केले. ‘जियांग यांग हाँग-०१’ असे त्याचे नाव असून ते २३ फेब्रुवारी या दिवशी चीनच्या किनारपट्टीवरून निघाले. चाचणीच्या एक दिवस आधी १० मार्च या दिवशीच ते बंगालच्या उपसागरात पोचले. चिनी जहाज आता विशाखापट्टणम्च्या किनार्‍यापासून केवळ ४८० किलोमीटर दूर आहे. याखेरीज आणखी एक चिनी जहाज मालदीवमध्ये तैनात आहे. यापूर्वीही भारताच्या क्षेपणास्त्र चाचणीची हेरगिरी करण्यासाठी चीनने जहाजे पाठवली आहेत.

आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचे अनेक किनारे मालदीव अन् श्रीलंका यांच्या बंदरांवर येणार्‍या चिनी जहाजांच्या प्रभावाखाली येतात. चीनची हेर जहाजे ‘हायटेक इव्हड्रॉपिंग उपकरणे’ यांनी सुसज्ज आहेत. याचा अर्थ असा की, ती जवळपासच्या देशांच्या बंदरांवर उभी राहून भारताच्या अंतर्गत भागापर्यंतची माहिती गोळा करू शकतात.

भारताच्या ‘अग्नी-५’ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये !

१. ते एकाच वेळी अनेक लक्ष्यांना भेदण्याची क्षमता !

२. संपूर्ण चीन आणि अर्धा युरोप या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात !

३. मारक क्षमता ५ सहस्र किलोमीटर !

४. दीड टन वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता !

५. वेग : ‘मॅक २४’, म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा २४ पट अधिक (२९ सहस्र ६३५ किमी प्रतिघंटा) !

६. एम्.आय.आर्.व्ही तंत्रज्ञान असणारा अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांच्यानंतर भारत हा सहावा देश !

संपादकीय भूमिका

  • कावेबाज चीनवर लक्ष ठेवण्यासाठी आता भारतानेही त्याला घेरले पाहिजे. यासाठी भारताने रशियासह चीनचे शेजारी असलेल्या व्हिएतनाम, फिलीपाईन्स, जपान, दक्षिण कोरिया या देशांशी सामरिक संबंध अधिक दृढ करण्याची आवश्यकता आहे !