सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताकडून निषेध

न्यूयॉर्क – विशेषाधिकार (व्हेटो पॉवर) वापरून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या सूचीत आतंकवाद्यांची नावे समाविष्ट करू न देणार्‍या देशांचा भारताने सुरक्षा परिषदेमध्ये निषेध केला आहे. चीनचे नाव न घेता भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आतंकवादाचा सामना करण्याचे आश्‍वासन देते. अशा परिस्थितीत काही देशांची भूमिका दुटप्पीपणाची आहे. (आतंकवादाला खतपाणी घालणार्‍या चीनसारख्या देशांचा विशेषाधिकार  रहित केला पाहिजे, तरच आतंकवाद खर्‍या अर्थाने संपू शकतो, हे जगाला पटवून देण्यासाठी भारताने पुढाकार घ्यायला हवा ! – संपादक)

सौजन्य DD News

कंबोज पुढे म्हणाल्या की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आतंकवादाच्या सूचीत समाविष्ट असलेली नावे घोषित करते; मात्र ज्यांची नावे नाकारली जातात, त्यांच्याविषयी कोणतीही सूची किंवा कारण सार्वजनिक केले जात नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सहयोगी संस्थांच्या नेतृत्वाविषयी घेतलेल्या निर्णयांमध्ये पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. प्रत्येकाला त्याच्या निर्णयात सामावून घेतले पाहिजे. सुरक्षा परिषदेच्या कार्याचा आढावा घेणे आणि त्यातून अनावश्यक गोष्टी काढून टाकणे अत्यंत आवश्यक आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पालट करण्याची मागणी

रुचिरा कंबोज यांनी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पालट करण्याची मागणी केली. त्या म्हणाल्या की, जागतिक सुरक्षा आणि शांतता यांना धोका वाढत आहे. जे सभासद संघटनेतील पालटाला आडकाठी आणत आहेत, त्यांनी एकत्र येऊन एकविसाव्या शतकातील आव्हानांचा सामना करण्यास सक्षम बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे.


काय आहे प्रकरण ?

चीनने साजिद मीरचे नाव आतंकवाद्यांच्या सूचीत समाविष्ट करण्यास विरोध केला होता. गेल्या वर्षी भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये २६/११ च्या मुंबई आक्रमणात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी साजिद मीरला आतंकवाद्यांच्या सूचीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव ठेवला होता; मात्र चीनने ‘व्हेटो पॉवर’ वापरून तो फेटाळला होता. पाकिस्तानी आतंकवादी मौलाना मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रऊफ असगर उपाख्य अब्दुल रौफ अझहर याचा संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवाद्यांच्या सूचीत समावेश करण्याच्या अमेरिका आणि भारत यांनी आणलेल्या प्रस्तावालाही वर्ष २०२२ मध्ये चीनने विरोध केला होता. यासह लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईदचा मुलगा तलहा सईद याला जागतिक आतंकवादी घोषित करण्याविषयी आणलेला प्रस्तावही चीनने थांबवला होता.

संपादकीय भूमिका 

अशी नावे समाविष्ट करण्यास विरोध करणार्‍या देशांवर जगाने बहिष्कार घालणे आवश्यक !