India Largest Arms Importer : भारत बनला जगातील सर्वांत मोठा शस्त्र आयातदार देश !

नवी देहली – ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (‘सिपरी’ने) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार गेल्या ५ वर्षांत भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीत ४.७ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वांत मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे. भारतासमवेतच जपानमधून आशियातील शस्त्रास्त्रांंच्या आयातीत १.५ टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी चीनच्या शस्त्रास्त्रांंच्या आयातीत ४४ टक्के घट झाली आहे. पाकिस्तान ५ व्या क्रमांकाचा शस्त्रास्त्र आयातदार देश आहे.

दुसरीकडे वर्ष २०१४-१८ च्या तुलनेत वर्ष २०१९-२३ मध्ये रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपमधील शस्त्रास्त्रांंच्या आयात जवळजवळ दुप्पट झाली. फेब्रुवारी २०२२ पर्यंत किमान ३० देशांनी सैनिकी साहाय्य म्हणून युक्रेनला शस्त्रे पुरवली. यामुळे २०१९-२३ मध्ये युक्रेन युरोपमधील सर्वांत मोठा शस्त्र आयातदार आणि जगातील चौथा सर्वांत मोठा आयातदार ठरला.

शस्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर !

शस्त्रास्त्र निर्यातीत अमेरिका पहिल्या, तर फ्रान्स दुसर्‍या क्रमांकावर आहे. रशिया प्रथमच तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे.