रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती संध्या बधाले यांना महाशिवरात्रीच्या दिवशी आलेल्या अनुभूती

श्रीमती संध्या बधाले

१. ‘रामनाथी येथील सनातनचा आश्रम, म्हणजे शिवालय आहे’, असे वाटणे : महाशिवरात्रीच्या दिवशी मी निवासस्थानावरून आश्रमात येत होते. तेव्हा गोव्यातील रामनाथ देवस्थानात पुष्कळ गर्दी होती. बाहेर गाडी उभी करायला जागा नव्हती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सनातनचा रामनाथी आश्रम, म्हणजे शिवालय आहे.’

२. रामनाथी आश्रमाच्या दर्शनाची ओढ लागणे आणि आश्रमात गेल्यावर मन पूर्णपणे निर्विचार होणे : आश्रमात जातांना मला आश्रमाच्या दर्शनाची एवढी ओढ लागली की, ‘कधी एकदा मी आश्रमात जाते आणि त्याचे दर्शन घेते’, असे मला वाटत होते. मी सकाळी आश्रमात आले. तेव्हा माझे मन पूर्ण निर्विचार झाले आणि ‘आश्रमच माझ्यासाठी ‘शिवाचे मंदिर’ आहे’, असे मला वाटले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे ‘संजीवनी’ असून ‘स्वभावदोष दूर करण्यासाठी शक्ती मिळू दे’, अशी प्रार्थना होणे : त्या वेळी माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘प.पू. गुरुदेव, तुम्ही मला या पवित्र शिवरूपी आश्रमात वास्तव्य दिले आहे. तुम्ही दिलेली स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया, म्हणजे माझ्यासाठी संजीवनी आहे. स्वभावदोष दूर करण्यासाठी हे ‘शिवदेवते’ मला शक्ती दे. माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचा पूर्ण लय होऊन मला आश्रमात आनंदी रहाता येऊ दे.’ त्यानंतर दिवसभरात माझ्याकडून पुष्कळ वेळा प्रार्थना झाल्या. काही वेळा ‘मी शिवपिंडीची पूजा करत आहे’, असे मला जाणवत होते.

४. महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस मला प.पू. गुरुदेव शिवाच्या रूपातच दिसत होते. सर्व साधक ‘शिवाचेच रूप आहेत’, असे वाटत होते.

५. ‘पार्वतीमातेने शिवाला प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपाप्रमाणे कठोर होऊन ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवायची आहे’, असे मला वाटणे : ‘पार्वतीमातेने शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तप केले, तसेच मला प.पू. गुरुदेवांच्या चरणाची धूळ म्हणून रहायचे आहे. मला कठोर होऊन ‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवायची आहे. माझ्यातील सर्व आसक्ती मला न्यून करायची आहे’, असे मला आतून सतत वाटत होते.

६. रात्री निवासस्थानी जाण्यापूर्वी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन प्रार्थना करणे, त्याच वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचे दर्शन होऊन त्यांना ‘साधनेसाठी शक्ती आणि बळ द्या’, अशी प्रार्थना होणे : रात्री मी निवासस्थानी जायला निघाले. तेव्हा मी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मी श्री सिद्धिविनायकाला प्रार्थना केली, ‘तू शिवपुत्र आहेस. तूच माझ्या साधनेतील सर्व विघ्ने दूर कर आणि मला आनंदाने स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवण्यासाठी शक्ती दे.’ ही प्रार्थना करत असतांना मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ दिसल्या. तेव्हा ‘आज मला महाशिवरात्रीनिमित्त पार्वतीमाता, श्री गणेश आणि शिव यांचे दर्शन झाले’, असा विचार माझ्या मनात आला. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई, तुम्ही देवीच आहात. मला साधना करण्यासाठी शक्ती आणि बळ द्या’, अशी त्यांच्याकडे पाहून आपोआप प्रार्थना झाली.

– श्रीमती संध्या बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.२.२०२३)

भक्तीसत्संग ऐकल्यापासून २ दिवस कैलासात शिवाची सेवा करत असल्याचा भाव मनात निर्माण होऊन डोळ्यांतून गार अश्रू येणे

भावसत्संग ऐकल्यापासून दोन दिवस ‘मी आश्रमात नसून, कैलासात शिवाची सेवा करते’, हाच भाव माझ्या मनात येऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू यायचे. ते अश्रू मला गार वाटायचे. ‘माझ्याभोवती शिवाचे वलय निर्माण झाले आहे’, असे मला सतत जाणवायचे.’ – श्रीमती संध्या बधाले

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक