बर्फमय केदारनाथ !
येथे प्रचंड बर्फवृष्टी होते. ती इतकी असते की, ‘केदार’ हे छोटेसे गाव बर्फात बुडून जाते. येथील केदारनाथाचे मंदिर आणि घरे बर्फमय होतात. दिवाळीच्या पाडव्याला केदारनाथाचे मंदिर बंद केले जाते. अक्षय्य तृतीयेला मंदिरावर साठलेले बर्फ खोर्याने बाजूला सारून उघडले जाते. मंदिर ६ मास बंद असते. तेव्हा तेथील उत्सवमूर्ती उखीमठ येथे नेण्यात येत असते.
१. शिवशंकरांची घोर तपश्चर्या करणार्या राजा केदारचे योगदान !
‘केदारनाथ हे १२ ज्योतिर्लिंगातील एक तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून ३ सहस्र ६१८ मीटर उंचीवर वसलेले ! सत्ययुगामध्ये केदार नामक राजाने येथे शिवशंकरांची घोर तपश्चर्या केली. त्यावरून त्या क्षेत्राला ‘केदार’ असे नाव पडले. २ नद्यांच्या संगमाला भारतीय संस्कृतीत महत्त्व दिले जाते. केदारनाथला ५ नद्यांचा संगम आहे. मंदाकिनी, सरस्वती, क्षीरगंगा, स्वर्गद्वारी आणि महोदधी या ५ नद्यांचा संगम येथे होतो अन् त्यांचा एक प्रवाह वाहू लागतो. तो म्हणजे मंदाकिनी प्रवाह !
२. कौरव आणि पांडव युद्ध ते पशूपतीनाथ यांचा इतिहास !
कौरव आणि पांडव यांचे युद्ध झाले. त्यामध्ये पांडवांना स्वत:च्याच बंधूंवर शस्त्रे उगारावी लागली. त्यांना ठार करावे लागले. त्यामुळे हे पाप घडले. ‘त्या पापाचे क्षालन कसे करावे ?’ असे पांडवांनी महर्षी व्यासांना विचारल्यावर त्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे पांडव हिमालयात श्री शंकराचे तप करू लागले. तेथे शंकर म्हशीचे रूप घेऊन आले. त्या म्हशीच्या आगमनाने तपश्चर्या भंगलेल्या भीमाचा राग अनावर झाला आणि त्याने म्हशीवर गदेचा प्रहार केला. त्यात तिचे ५ तुकडे झाले. मुंडके भूमीत घुसले आणि ते नेपाळमधील काठमांडू येथे प्रकटले, ते ठिकाण म्हणजे पशुपतीनाथ ! यामुळे पशुपतीनाथास ‘अर्ध ज्योतिर्लिंग’ समजण्यात येते.
३. केदारनाथ येथील शिवलिंगाची पूजा केल्यामुळे पांडव पापमुक्त झाले !
पांडवांच्या तपश्चर्येने शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना दर्शन दिले. म्हशीच्या पाठीचा भाग केदार येथे भूमीवर राहिला, तेच म्हणजे केदारनाथ येथील स्वयंभू लिंग ! त्यामुळे केदारनाथ येथील शिवलिंग म्हशीच्या पाठीसारखे आहे. या शिवलिंगाची पूजा केल्यामुळे पांडव पापमुक्त झाले. तेथे पांडवांनी मंदिर बांधले. पुढे आद्यशंकराचार्यांनी त्याचा जीर्णाेद्धार केला. ‘देवळावरील सुवर्ण कलश पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बसवला’, असे सांगतात. देवळात पांडव आणि द्रौपदी यांच्या प्रतिमा आहेत. येथील शिवलिंगाला पाण्याने स्नान घालत नाहीत. त्याला तूप चोळण्याची प्रथा आहे.
४. पंचकेदारांची निर्मिती !
शिवशंकरांनी रूप घेतलेल्या म्हशीला भीमाने गदा मारली होती. तिचे झालेले अन्य ५ तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी उडाले. तुंगनाथ (३७१४ मीटर उंच), रुद्रनाथ (३५९० मीटर उंच), मध्यमहेश्वर (२९८४ मीटर उंच) आणि कल्पेश्वर अन् केदार अशी ही ठिकाणे आहेत. यातील मध्यमहेश्वर हे ठिकाण केदारपासून ६४ किलोमीटरवर बद्रीनारायण मार्गावर आहे. तेथे मार्गावर कालीमठ आहे. देवीचे हे एक सिद्धपीठ आहे. उखीमठापासून ३७ किलोमीटरवर तुंगनाथ आहे. तुंगनाथाहून रूद्रनाथाच्या लंकेकडे जाण्याचा मार्ग आहे. जोशी मठाच्या मार्गावर कल्पेश्वर आहे. मुख्य स्थान म्हणजे केदार. अशी ही ५ स्थाने मिळून ‘पंचकेदार’ होत असतो.
५. आत्महत्येचे पातक न लागणारे केदारनाथापासून जवळ असणारे एक महत्त्वपूर्ण स्थान !
मंदिराच्या भोवती ८ कुंडे आहेत. येथून जवळच भैरवझाप तथा भृगुपतन नावाचा हिमालयाचा सुळका आहे. ‘तेथून उडी टाकून देह समर्पण केला, तर आत्महत्येचे पातक लागत नाही’, असे माहात्म्य आहे. स्वर्गारोहण नावाचा येथे एक मार्ग आहे. पांडव त्याच मार्गाने देहसमाप्तीच्या वेळी गेले. स्वर्गारोहण येथे कुंड असून हे तीर्थ मानले जाते. पवाली, रुद्र, वासुकी, गौरी, उष्ण, उदक, रेत, महापथ इत्यादी तीर्थे या आसमंतात आहेत.
आद्य शंकराचार्य (इ.स.चे ८-९ वे शतक) म्हणजे हिंदुस्थानातील महान युगपुरुष ! केरळमधील कलाडी येथे त्यांचा जन्म झाला आणि ते केदार येथे समाधीस्थ झाले. त्यांची समाधी केदारनाथ मंदिराच्या मागेच आहे.’
(साभार: ‘अक्कलकोट स्वामीदर्शन’)