९ मार्चला मुख्यमंत्री शिंदे दापोलीत : विकासकामांचे होणार भूमीपूजन आणि सभा

एकनाथ शिंदे

खेड – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ९ मार्च या दिवशी दापोलीमध्ये अनुमाने ४०० कोटी रुपये कामांचे भूमीपूजन होणार आहे. यानंतर त्यांची सार्वजनिक सभा होईल, अशी माहिती दापोली-खेड मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी दिली.

आमदार योगेश कदम म्हणाले, ‘‘राज्यात महायुतीचे सरकार राज्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दापोली मतदार संघातील ज्या प्रमुख काही महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना देण्याची विनंती केली होती. त्या पैकी ऐतिहासिक वारसा असलेले हर्णे बंदर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी २०५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात १०० खाटांचे नवीन रुग्णालय ज्यामध्ये अतीदक्षता विभाग, रक्तपेढी, डायलिसिस सेंटर आदी सुविधा उपलब्ध असतील, त्यासाठी २० कोटी २१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये संमत करण्यात आले असून विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.

दापोलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळकाई देवस्थानच्या जीर्णोद्धार करण्यासाठी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असतांना ४ कोटी ५० लाख रुपयांचे प्रावधान त्यांनी केले होते.’’