Ram Mandir Website Hacked : पाक-चीनमधून भारतीय संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड !

श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी झाला होता प्रयत्न

नवी देहली – अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनापूर्वी पाकिस्तान आणि चीन यांच्या हॅकर्सनी (संगणकातील माहिती चोरणार्‍यांनी) श्रीराममंदिर, प्रसार भारती, तसेच उत्तरप्रदेश सरकार यांच्या संकेतस्थळे हॅक (बेकायदेशीररित्या संकेतस्थळांवर नियंत्रण) मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे आता समोर आले आहे.

भारताचे टेलिकॉम ऑपरेशन सेंटर श्रीरामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी सुमारे २६४ संकेतस्थळांचे निरीक्षण करत होते. या कालावधीत सुमारे १४० संगणकीय पत्ते (आय.पी.) सापडले होते जे श्रीराममंदिर आणि प्रसार भारती यांच्या संकेतस्थळांना लक्ष्य करत होते. या काळात सुमारे १ सहस्र २४४ संगणकीय पत्ते प्रतिबंधित करण्यात आले होते. त्यांपैकी ९९९ चीनचे होते, तर उर्वरित पाकिस्तान, हाँगकाँग आणि कंबोडिया येथील होते. याखेरीज काही पत्ते भारताचेच होते, ज्यांवर आवश्यक कारवाई करण्यात आली.