घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने फूट पाडणारी विधाने टाळावीत ! – मद्रास उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयानंतर मद्रास उच्च न्यायालयानेही उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले !

चेन्नई (तमिळनाडू) – घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने सनातन धर्माची एड्स आणि मलेरिया यांच्याशी तुलना करणे योग्य आहे, असे म्हणता येणार नाही. तसेच अशा लोकांनी फूट पाडणारी विधाने टाळावीत, अशा शब्दांत आता मद्रास उच्च न्यायालयाने राज्याचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र अन् मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना फटकारले; मात्र त्याच वेळी न्यायालयाने उदयनिधी यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.

सौजन्य India Today

१. तमिळनाडू राज्यातील अन्य काही नेत्यांच्या वक्तव्यांवर आणि सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी झालेल्या परिषदेत त्यांनी सहभाग नोंदवल्यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, राजकीय नेत्यांमध्ये वैचारिक मतभेद असले, तरी जनतेला विभाजित करणारी विधाने सार्वजनिक ठिकाणी करू नयेत.

२. यापूर्वी ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांना सनातन धर्मावरील विधानावरून फटकारले होते. ‘कलम १९ अन्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा तुम्ही गैरवापर केला आहे. धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आणि आता तुम्हाला कलम ३२ अंतर्गत न्यायालयाचा हस्तक्षेप हवा आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही. तुम्ही मंत्री आहात, तुमच्या अशा विधानाचा काय परिणाम होईल हे तुम्हाला कळायला हवे’, अशा शब्दांत न्यायालयाने उदयनिधी यांचे कान टोचले होते. तसेच या संदर्भात मद्रास उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले होते.

संपादकीय भूमिका 

न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !