Taiwan Racist Remark : भारताच्या आक्षेपानंतर तैवानने मागितली क्षमा !

तैवानच्या कामगारमंत्र्यांनी केले होते भारतीय कामगारांवर वर्णद्वेषी विधान !

तैवानच्या कामगारमंत्री झू मिंग चुन

तैपेई (तैवान) – तैवानच्या कामगारमंत्री झू मिंग चुन यांनी ४ मार्चला ‘ईशान्य भारतातील लोकांचा रंग आणि खाण्याच्या सवयी आपल्यासारख्याच आहेत. आमच्याप्रमाणे त्यांचा ख्रिस्ती धर्मावर अधिक विश्‍वास आहे. ते त्यांच्या कामातही निपुण आहेत. त्यामुळे आधी ईशान्येकडील कामगारांची भरती केली जाईल’, असे विधान केले होते. त्यावर भारताने आक्षेप घेत त्याला वर्णद्वेषी ठरवत निषेध केला होता. यानंतर आता तैवानने क्षमा मागितली आहे.

१. तैवानने म्हटले की, मंत्र्यांची टिप्पणी खेदजनक आहे. तैवान कोणत्याही स्थलांतरित कामगार किंवा व्यावसायिक यांच्याशी त्यांचे स्वरूप, वंश, धर्म, भाषा किंवा खाण्याच्या सवयी यांच्या आधारावर भेदभाव करत नाही. आम्ही भारत सरकारला आश्‍वासन देतो की, तैवानमधील सर्व भारतीयांना न्याय्य वागणूक दिली जाईल.

२. भारत आणि तैवान यांनी १७ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य करारांतर्गत भारतीय कामगारांसाठी तैवानचे दरवाजे उघडले जातील. तैवानमध्ये सध्या उत्पादन, बांधकाम आणि कृषी क्षेत्रांत कामगारांची कमतरता आहे. या कराराअंतर्गत भारतातील किती स्थलांतरित कामगारांना तेथे अनुमती द्यायची, हे तैवान ठरवेल.