प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जाणार !

शासनाकडून १२७ कोटी निधी संमत !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफझलखानाचा कोथळा काढला, त्या ठिकाणी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास सांगितला जाणार आहे. ‘ऑडिओ व्हिज्युअल’, संग्रहालय, ध्वनीक्षेपक यंत्रणा, प्रेक्षक गॅलरी यांद्वारे महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास दाखवला जाणार आहे. यासाठी, तसेच प्रतापगडाचे जतन आणि संवर्धन यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून ५ मार्च या दिवशी १२७ कोटी १५ रुपये संमत करण्यात आले आहेत.

प्रतापगडावरील पुरातन मंदिरांचे संवर्धनही या निधीतून केले जाणार आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वस्तूंच्या दालनाचीही निर्मिती केली जाणार आहे. वाहने उभी करण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आदी कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.

श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर आणि परिसराचा विकास !

श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर आणि परिसराचा विकास अन् संवर्धन यांसाठीही शासनाकडून १८७ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. यातून रस्ते, वाहनतळ यांची निर्मिती, बाजारपेठेचा विकास, सांडपाण्याची व्यवस्था, अन्नछत्र, विद्युतीकरण आदी विविध कामे या निधीतून केली जाणार आहेत.