१ लाख ४० सहस्र ९०४ दावे निकाली
पुणे – राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दावे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. ३ मार्चला झालेल्या लोक अदालतमध्ये १ लाख ४० सहस्र ९०४ दावे निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये ३६९ कोटी ७८ लाख २० सहस्र २६८ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी ११९ ‘पॅनेल’ची नेमणूक करण्यात आली होती. त्या माध्यमातून विविध न्यायालयांत प्रलंबित ४६ सहस्र ६३७ दावे तडजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांपैकी २६ सहस्र ८१३ दावे निकाली काढण्यात आले. त्यामध्ये २७१ कोटी ४७ लाख २९ सहस्र ४५० रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. लोकअदालतीत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये तडजोडयोग्य फौजदारी आणि दिवाणी, धनादेश बाउन्स, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, कौटुंबिक वाद, कामगार वाद, भूसंपादन, नोकरी आणि महसूल विषयक प्रकरणे, विविध बँका, वित्तीय संस्था, दूरभाष आणि विद्युत् विभाग यांसह विविध दाव्यांचा समावेश आहे.