१. साधना करत पुढे गेल्यास जीवन आनंदी होईल !
सौ. जयश्री सारंगधर : मी अन्नपूर्णा कक्षात सेवा करते. तिथे माझ्याकडे संतांसाठी स्वयंपाक करण्याची सेवा आहे. ती सेवा करण्यापूर्वी माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होतो; पण सेवा केल्यानंतर मला चांगले वाटते. परम पूज्य, मी कुठे न्यून पडते ? मी संतसेवेचा लाभ कसा करून घ्यायला पाहिजे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आताचा काळ हा आपत्काळ आहे. हा वाईट शक्तींचाच काळ आहे. आपण आपले साधनेचे प्रयत्न करत करत त्या काळातून पुढे जायचे. मग आपले सगळे जीवन आनंदी होईल.
२. वाईट शक्तींच्या त्रासामुळे मनात मायेतील विचार येत असल्याने ते दूर करण्यासाठी नामजपादी उपाय करा !
सौ. जयश्री सारंगधर : रामनाथी आश्रमात आल्यापासून माझ्या मनात गावी जायचे विचार येत नव्हते; पण एवढ्यात मला ‘गावी जावे’, असे वाटत आहे. माझ्या मनात मायेतील विचार येत आहेत. मला त्यांच्यावर मात करता येत नाही.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : वाईट शक्तींचा जोर असल्याने तुमच्या मनात असे विचार येत आहेत. अशा वेळी उत्तरदायी साधकांना विचारा, ‘माझ्या मनात असे विचार येत आहेत, तर मी कोणता जप करू ?’ त्यांनी सांगितलेला जप करा. त्यामुळे मनातील हे विचार दूर होतील.’’
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |