सर्व प्रकारच्या देवाण-घेवाण हिशोबांतून मुक्त होण्यासाठी तीव्र साधना करण्याचे महत्त्व पटवून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. ५ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.

(भाग १६)

भाग १५ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/770646.html  

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. गुरुदेवांनी ‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकाला परत जन्म घ्यावा लागत नाही’, असे सांगितल्यावर पातळी अधिक असण्याचे महत्त्व लक्षात येणे

‘सौ. मंजू सिंह यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या लिंगदेहाचे परीक्षण करतांना मी गुरुदेवांना विचारले, ‘‘आता सौ. मंजू पृथ्वीवर परत कधी जन्म घेतील का ?’’ त्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘ती परत जन्म घेईलच; कारण तिची साधना अपूर्ण राहिली आहे. मृत्यूच्या वेळी तिची आध्यात्मिक पातळी ५० – ५१ टक्के होती. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाला परत जन्म घ्यावा लागत नाही.’’ यावरून आध्यात्मिक पातळी अधिक असण्याचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ‘आपण याच जन्मात साधना करून मनुष्ययोनीतून मुक्त व्हायला हवे’, असे मला वाटले.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

२. ‘निधन झालेल्या सौ. मंजू यांचा देवाण-घेवाण हिशोब आणि पुनर्जन्म’, यांविषयी गुरुदेवांनी सांगितलेली सूत्रे

‘मंजू यांचा जन्म साधारण कोणत्या कालावधीत होईल ?’, असे मी गुरुदेवांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘पत्नीचा सर्वांत अधिक देवाण-घेवाण हिशोब आपल्या पतीशी असतो. आता पती जन्माला आल्यानंतर मगच ती जन्माला येईल; कारण देवाण-घेवाण हिशोब फेडण्यासाठीच तर आपण जन्माला येत असतो. पती जन्माला येईपर्यंत तिला वाट पहावी लागेल.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘बापरे ! म्हणजे हे पुष्कळच कठीण आहे; कारण मंजू यांचे पती अजून जिवंत आहेत आणि तरुणही आहेत.’’ त्यावर गुरुदेव म्हणाले, ‘‘याच कालावधीत मंजूने मृत्यूनंतरही चांगली साधना केली, तर देवाच्या कृपेने तिला परत जन्माला यावे लागणार नाही; कारण ती स्वतःच्या साधनेने पतीच्या समवेतच्या देवाण-घेवाण हिशोबातून मुक्त झालेली असेल.’’ यातून साधनेचे महत्त्व लक्षात येते.

३. देवाण-घेवाण हिशोबातून मुक्त होण्यासाठी देवाशी अनुसंधान वाढवणे आवश्यक असणे

गुरुदेवांनी सांगितले, ‘‘मुलीचा देवाण-घेवाण हिशोब प्रथम तिच्या आई-वडिलांशी अधिक असतो. तिचे लग्न झाल्यावर तिचा सर्वाधिक देवाण-घेवाण हिशोब पतीशी आणि मुले झाल्यावर मुलांशी असतो.’’ यावरून मला कळले, ‘जिवंत असतांनाच साधना करून आपली मुले आणि पती यांच्या संदर्भातील इच्छा-आकांक्षा संपल्या पाहिजेत. तीव्र साधना केल्यानेच नातेवाईक आणि मित्र यांच्या देवाण-घेवाण हिशोबातून आपण मुक्त होतो. यासाठी गुरुकृपा हवी.

गुरुकृपेनेच आपला जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. जीवनाविषयीच्या आपल्या अपेक्षा संपल्या की, आपले जीवन दैवी होते. देव देवाण-घेवाण हिशोबाच्या पलीकडे असल्याने आपले देवाशी अनुसंधान वाढले की, आपल्याला त्याच्या कृपेचा वरदहस्त लाभतो आणि आपले जीवन मायेतील देवाण-घेवाणीतून मुक्त, म्हणजेच खर्‍या अर्थाने सफल होते.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (२७.२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म- जगत्’ असे संबोधतात.

भाग १७ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/771849.html