पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर भ्याड आक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

 जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

रत्नागिरी, ५ मार्च (वार्ता.) – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर मनमाड (जिल्हा नाशिक) येथे २९ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० च्या सुमारास स्वतःला आंबेडकरवादी म्हणणार्‍या काही माथेफिरूंनी त्यांची गाडी अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली, पायातील बूट आणि अन्य तत्सम वस्तूंचा उपयोग करून गाडीच्या काचा फोडून त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. हे भ्याड आक्रमण करणार्‍यांचा आणि या मागील ‘मास्टर माईंड’ शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याविषयी ५ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी सर्वश्री गणेश गायकवाड, सुशील कदम, गौरव पावसकर, संजय जोशी, अनिल वीर, अंकिता राजेशिकर्े, सोहम् खानविलकर, रमण पाध्ये, साहिल पाटील, जीवन जाधव, श्रीकांत जोशी, सचिन खेत्री, अरुण जयस्वाल, सुशील ऐवळे, गणेश घडशी, मालप आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

रत्नागिरी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी

पू. संभाजीराव भिडेगुरुजी म्हणजे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व असून त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील अनेक युवकांना दिशा देऊन त्यांना देव, देश अन् धर्म यांच्या रक्षणासाठी कृतीशील केलेले आहे. त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळे अनेक युवक राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी कृतीशील झालेले आहेत, तसेच व्यसनांपासून दूर झालेले आहेत. त्यामुळे पूज्य संभाजीराव भिडेगुरुजी हे अनेक युवकांचे प्रेरणास्थान आहेत. असे असतांना पू. गुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचे प्रकार होत आहेत. पू. गुरुजींसारख्या वयोवृद्ध व्यक्तीवर अशा प्रकारचे भ्याड आक्रमण करणे, हे निषेधार्ह आहे.

या घटनेमागे जे दोषी आहेत त्यांना पकडून त्वरित त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना लवकरात लवकर सुरक्षा पुरवण्यात यावी.