Maldives China Agreement : मालदीव-चीन यांच्यात झाला करार : चीन विनामूल्य सैनिकी साहाय्य पुरवणार !

चीनच्या आंतरराष्ट्रीय सैनिकी सहकार्य विभागाचे अधिकारी मेजर जनरल झांग बाओकुन व मालदीवचे संरक्षणमंत्री महंमद मौमून

माले (मालदीव) – संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी चीनने ४ मार्च या दिवशी मालदीवसमवेत करार केला. याअंतर्गत द्विपक्षीय संबंध अधिक सुधारण्यासाठी चीन मालदीवला विनामूल्य सैनिकी साहाय्य प्रदान करणार आहे.

१. मालदीवचे संरक्षणमंत्री महंमद मौमून यांनी चीनच्या आंतरराष्ट्रीय सैनिकी सहकार्य विभागाचे अधिकारी मेजर जनरल झांग बाओकुन यांची भेट घेतली. या करारातील कोणतीही माहिती सध्या समोर आलेली नसली, तरी मालदीवच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने मालदीवला १२ ‘इको-फ्रेंडली’ रुग्णवाहिकाही भेट दिल्या आहेत.

२. भारत आणि मालदीव यांमधील करारानुसार भारतीय सैनिक १० मेपर्यंत मायदेशी परततील, तर त्यांची जागा भारतीय तांत्रिक कर्मचारी घेणार आहेत. मालदीवमध्ये अनुमाने ८८ भारतीय सैनिक आहेत. मालदीवमधील मानवतावादी साहाय्य आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी भारताने मालदीवला २ हेलिकॉप्टर अन् एक विमान दिले आहे. त्यांचे सर्व कार्य हे सैनिक पहात होते. यापुढे हे काम भारतीय तांत्रिक कर्मचारी पहाणार आहेत.

संपादकीय भूमिका

मुळात ‘इंडिया आऊट’चा नारा देत महंमद मुइज्जू यांनी ‘मालदीव जनतेला विदेशी सैनिक त्यांच्या भूमीवर नको’, असे सांगत भारतीय सैनिकांना हाकलण्याची भूमिका घेतली. आता मात्र चीनशी केलेल्या करारातून त्यांनी चिनी सैनिकांसाठी पायघड्या घातल्या आहेत. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’चे सध्याचे उदाहरण म्हणजेच हा करार होय ! तसेच यातून मालदीवच्या महंमद मुइज्जू सरकारचा भारतद्वेष्टा चेहराही उघडा पडला आहे !