सोलापूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहितेपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील’, अशा अश्लाघ्य शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना चेतावणी दिली आहे. मनोज जरांगे पाटील सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. ‘फडणवीस यांची दडपशाही चालू राहिली, तर आधी केवळ २ कोटी मराठा एकत्र आले होते. आता हाक दिल्यास ४ कोटी मराठा एकत्र येतील आणि त्यांना पाणी पाजतील’, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीत निवडून येण्यासाठी तुम्हाला मराठा समाज लागतो; मात्र त्यांच्या नेत्यावर बोलले की, सर्व तुटून पडतात. गोरगरीब मराठ्यांची मुलेही मोठी झाली पाहिजेत, यासाठी मी लढत आहे.
‘मनोज जरांगे पाटील दूर करा’, असे धोरण सरकारच्या वतीने आखले गेले आहे; मात्र मला कारागृहात टाकले, तर मी कारागृहातील मराठ्यांनाही आरक्षण शिकवीन. मुसलमान आणि धनगर समाजातील लोकांनाही साहाय्याला घेईन. माझी मान कापली, तरी आता ‘ओबीसी’तून आरक्षण घेतल्याविना माघार घेणार नाही. मला कोणतेही पद नको आहे. मी आई-बापालाही बाजूला केले आहे.
नेत्यांना गावबंदी करा !- जरांगे यांचे नवीन आदेश
सोलापूर – नेत्यांना गावबंदी करा, असे आदेश मराठा नेते जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना दिले आहेत. ५ मार्चपासून जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा चालू करत आहेत. ‘मते मागायला दारात येऊ नका’, असा फलक गाडीवर मागून-पुढून आणि घराच्या दारावर लावा’, असे आवाहन जरांगे यांनी त्यांच्या भाषणात मराठ्यांना केले आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये मराठा आंदोलक पुढार्यांना गावबंदी करण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील सोलापूर आणि नांदेड या जिल्ह्यांच्या दौर्यावर आहेत. ‘सगेसोयरे’ कायद्याची कार्यवाही करत मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा आंदोलन करत आहेत. |