|
नवी देहली – मुंबईपासून ३ सहस्र ७२९ कि.मी. अंतरावर असलेल्या मॉरिशसच्या उत्तर अगालेगा बेटावर भारतीय सैन्याच्या तळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये विमानासाठी धावपट्टी, जेटी आदींचा समावेश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांनी ऑनलाईन उपस्थित राहून येथील एकूण ६ प्रकल्पांचे उद्घाटन केले. या सैन्य तळामुळे हिंद महासागरात भारत आणि मॉरिशस संयुक्तपणे चिनी युद्धनौका आणि पाणबुड्या यांवर लक्ष ठेवू शकतील.
१. भारतीय नौदलाचे ‘पी-८ आय’ विमान पाणबुड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात केले जाईल. अगालेगा बेटावर असलेला हा तळ चालवण्यासाठी भारतीय नौदलाचे ५० सैनिक तैनात केले जातील. अगालेगा बेट १२ किमी लांब आणि १.५ किमी रुंद आहे. येथे सुमारे ३०० लोक रहातात.
२. सध्या हिंद महासागराच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना इंधन मिळवण्यासाठी ब्रिटीश-अमेरिकी सैन्य तळ डिएगो गार्सिया येथे जावे लागते. अगालेगा येथील तळामुळे भारतीय नौदलाचा वेळ वाचेल.
Mauritius is a valued friend of India. Projects being inaugurated today will further bolster the partnership between our countries.https://t.co/YWwc43oBGs
— Narendra Modi (@narendramodi) February 29, 2024
३. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल युनिव्हर्सिटीचे तज्ञ सॅम्युअल बॅशफिल्ड म्हणाले की, अगालेगा महत्त्वाच्या ठिकाणी आहे. त्यामुळे येथून जाणार्या चीनच्या मालवाहू नौका, युद्धनौका आणि पाणबुड्या यांवर लक्ष ठेवता येईल.
४. चीनने पाकिस्तानातील ग्वादर, श्रीलंकेतील हंबनटोटा, तसेच आफ्रिकेतील काही देशांच्या बंदरावरील प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवले आहेत. त्याद्वारे तो भारताला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने हिंद महासागरात वर्ष २०१५ पासून ‘सुरक्षा आणि विकास’ प्रकल्प चालू केला आहे.