आर्थिक दिवाळखोर होऊ लागलेल्या पाकिस्तानने अमेरिकेलाच दाखवले डोळे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – कोणताही देश पाकिस्तानला आदेश देऊ शकत नाही. पाकिस्तान हे स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. आम्हाला पाकिस्तानच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे प्रत्युत्तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी अमरिकेच्या विधानावर दिले आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत हेराफेरीचे आरोप होत आहेत. या संदर्भात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्रश्न विचारला असता परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅट मिलर म्हणाले की, निवडणुकीत कोणत्याही कथित हेराफेरीची संपूर्ण पारदर्शकता आणि निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे. पाकिस्तानच्या निवडणुकीत झालेल्या हेराफेरीच्या आरोपांबद्दल आम्ही चिंतित आहोत आणि या प्रकरणांची लवकर आणि योग्य प्रकारे चौकशी व्हावी, अशी आमची इच्छा आहे.