सात्त्विकतेची ओढ असलेला ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला यवतमाळ येथील कु. शौर्य प्रशांत सोळंके (वय ८ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. शौर्य प्रशांत सोळंके हा या पिढीतील एक आहे !

कु. शौर्य प्रशांत सोळंके

(वर्ष २०१८ मध्ये कु. शौर्य प्रशांत सोळंके याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. – संकलक)

‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. शौर्य प्रशांत सोळंके महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१९.२.२०२४)

कु. शौर्य याच्याविषयी त्याच्या वडील आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहे.

१. श्री. प्रशांत सोळंके (शौर्यचे वडील), यवतमाळ

श्री. प्रशांत सोळंके

१ अ. उत्तम स्मरणशक्ती : ‘कु. शौर्यला बरेच मंत्र, आरत्या आणि स्तोत्रे मुखोद्गत आहेत.

१ आ. सात्त्विक आणि धार्मिक कृती यांची ओढ

१. तो प्रतिदिन शाळेत जातांना टिळा लावून जातो. तेव्हा मुले त्याला म्हणतात, ‘‘तुझा चेहरा चांगला दिसतो.’’ तो मुलांनाही टिळा लावायला सांगतो.

२. तो दुर्गादौडीसाठी स्वतःहून येतो. त्याला पोवाडा गायला आवडतो.

३. त्याला गणपतीची मूर्ती मातीऐवजी ‘प्लास्टर’ची बनवली, तर ते आवडत नाही.  मातीची गणेशमूर्ती बनवल्यावर त्यालाआनंद होतो. तो मला गणेशमूर्ती बनवायला तहान-भूक विसरून साहाय्य करतो.

४. त्याला हिंदु राष्ट्र-जागृती सभा, गुरुपौर्णिमा, अशा ठिकाणी यायला आवडते.

५. शौर्य केवळ देवतांची चित्रे काढतो. त्याला इतर चित्रे काढायला आवडत नाही.

१ इ. भाव

१. त्याच्या हृदयावर ज्योतीप्रमाणे जन्मखूण आहे. ‘तिथे गुरुदेव रहातात’, असा त्याचा भाव आहे.

२. त्याला गुरुदेवांच्या छायाचित्राची पूजा करायला आवडते.

३. त्याला ‘सर्व गोष्टी गुरुदेवांच्या आहेत’, असे वाटते.

४. त्याला ‘गुरुदेवांना भेटायला जावे’, असे सारखे वाटते.

५. गुरुदेव ‘श्रीहरि विष्णु आहेत’, या भावाने त्याने शंख, चक्र, गदा, कमळ बनवून ते सर्व गुरुदेवांच्या छायाचित्राजवळ ठेवले आहे.

६. त्याला ‘तुझी चूक गुरुदेवांना सांगतो’, असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांत पाणी येते.’

१ ई. शौर्यला आलेल्या अनुभूती

१. एकदा पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत) यांच्या सत्संगात तो मला म्हणाला, ‘‘येथे प.पू. गुरुदेव आहेत. येथे प्रकाश आणि कारंज्यासारखे चैतन्य येत आहे.’’

२. एकदा नामजप करतांना शौर्य मला म्हणाला, ‘‘मी डोळे मिटून नामजप करतांना ‘श्रीकृष्ण माझ्याकडे पहात आहे’, असे मला जाणवले.’’

३. तो कधी कधी मला सांगतो, ‘गुरुदेव माझ्याकडे पाहून हसत आहेत.’

४. एकदा त्याला ‘प.पू. गुरुदेव आमच्या घरी चालत येत आहेत’, असे जाणवले.

१ उ. शौर्य रुग्णालयात भरती असतांना त्याच्याविषयी आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१. रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना शौर्यमधील वेगळेपणा जाणवला. ते म्हणाले, ‘‘याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे.’’ त्यांना ‘शौर्यच्या खोलीत जावे’, असे वाटायचे.

२. ‘शौर्यला रुग्णालयात भरती केल्याच्या दुसर्‍याच दिवशी दसरा होता. आधुनिक वैद्यांनी दसर्‍याच्या दिवशी पहिल्यांदाच रुग्णालय फुलांच्या माळांनी सजवले, रांगोळ्या काढून घेतल्या आणि पेढे वाटले’, असे परिचारिकांनी आम्हाला सांगितले.

३. ‘शौर्यचा हसतमुखपणा आणि त्याचे प.पू. भक्तराज महाराज यांची भजने गुणगुणणे’, यांमुळे रुग्णालयातील वातावरण हलके झाले होते. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी, जवळपासचे रुग्ण अन् त्यांचे नातेवाईक यांनाही उत्साह वाटत होता.

१ ऊ. स्वभावदोष : चिडचिड करणे, भ्रमणभाष पहाणे, अभ्यास करण्यासाठी मागे लागावे लागणे’

२. सौ. ज्योती अर्धापूरकर, यवतमाळ

अ. ‘कु. शौर्य शांत, संयमी आणि निरागस आहे.

आ. ‘त्याची आंतरिक साधना चालू आहे’, असे मला जाणवते.’

३. सौ. सुनिता खाडे, यवतमाळ

अ. ‘त्याचा जन्म हनुमान जयंतीचा असल्यामुळे त्याला एक प्रकारे देवाचे वरदान आहे’, असे मला नेहमी वाटते.

आ. शौर्य मार्गदर्शन व्यवस्थित ऐकतो.’

४. सौ. छबू बगमारे, यवतमाळ

अ. ‘शौर्य शांत आणि स्थिर आहे.

आ. त्याने घाटंजी येथील सभेच्या वेळी आमच्या समवेत पूर्ण वेळ नामजप केला. त्याचे गुण आणि तळमळ पाहून ‘मी किती न्यून पडते’, याची जाणीव होऊन मला खंत वाटली.

इ. तो त्याच्या आईला म्हणाला, ‘‘रेमंड’ आस्थापनात काम करणारे काका सुटी घेऊन सेवेला येतात आणि तू येत नाहीस.’’ यातून ‘त्याला सेवेची तळमळ आहे’, असे जाणवते.

५. सौ. शांता घोंगडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), यवतमाळ

अ. ‘शौर्यची देवावर पूर्ण श्रद्धा आहे. तो देवाच्या अनुसंधानात राहून देवाला विचारून प्रत्येक कृती करतो.

आ. त्याने घाटंजी सभेच्या ठिकाणी स्वतःहून केर टोपलीत भरण्यासाठी साहाय्य केले.’

६. सौ. सिंधू देऊळकर, यवतमाळ

अ. ‘घाटंजी सभेच्या वेळी त्याला सेवा करायची होती; म्हणून तो मला ‘मी हे करू का ?’, ‘मी ते करू का ?’, असे विचारत होता.

आ. तो सर्वांशी प्रेमाने बोलत होता.’

७. सौ. सुनंदा हरणे (आध्यात्मिक स्तर ६७ टक्के), यवतमाळ

अ. ‘शौर्य भेटल्यावर नेहमी सर्वांची विचारपूस करतो.’

८. श्री. विजय जाधव, यवतमाळ

अ. ‘शौर्यला मायेतील गोष्टींपेक्षा सेवा करायला आवडते.’

–  (वरील सर्व सूत्रांचा दिनांक २२.३.२०२३)