सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ शोधून देत असलेल्या नामजपादी उपायांचे लक्षात आलेले सामर्थ्य !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. डोळ्यांचे शस्त्रकर्म करण्याचे ठरल्यावर खोकला येऊ लागणे

सौ. भाग्यश्री लेले

‘माझ्या दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे शस्त्रकर्म करावे लागणार होते. १४.८.२०२३ या दिवशी माझ्या उजव्या डोळ्याचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले होते. ९.८.२०२३ या दिवसापासून मला खोकला येऊ लागला. मी त्याकडे दुर्लक्ष न करता आधुनिक वैद्यांनी दिलेली औषधे घ्यायला आरंभ केला.

२. आधुनिक वैद्यांनी औषधे आणि ‘स्टिरॉईड’ देऊनही परिणाम न होणे

माझा खोकला ४ दिवसांत न्यून न झाल्याने शस्त्रकर्म १ आठवडा पुढे ढकलले गेले. त्याही आठवड्यात औषधे पालटूनही माझा खोकला न्यून होत नव्हता. आधुनिक वैद्यांनी ३ वेळा माझी औषधे पालटली. त्यांनी शेवटी मला ‘स्टिरॉईड’ दिले, तरीही काहीच उपयोग झाला नाही.

३. ‘मला ताण आला असेल’, या विचाराने मी प्रतिदिन १२ स्वयंसूचनासत्रे केली आणि प्रसंगाचा सराव केला. मी त्रासावर नामजपादी उपाय शोधले आणि केले, तरीही माझ्या खोकल्याची तीव्रता न्यून होत नव्हती.

४. पू. (श्रीमती) माया गोखलेआजी यांनी सांगितलेला नामजप केल्यावर खोकला येण्याचे प्रमाण न्यून होणे; मात्र शस्त्रकर्म करण्याचा दिवस ठरल्यावर पुन्हा पुष्कळ खोकला येऊ लागणे

आमच्या घरासमोर रहाणार्‍या पू. (श्रीमती) माया गोखलेआजी (सनातनच्या ८१ व्या संत) यांनी मला २ वेळा नामजप शोधून दिला. त्यांनी माझी ३ वेळा दृष्ट काढली. हे नामजपादी उपाय केल्यावर माझा त्रास एका दिवसातच न्यून झाला. त्यामुळे ३०.८.२०२३ या दिवशी माझे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. शस्त्रकर्म करण्याचा दिवस ठरताच मला पुन्हा पुष्कळ खोकला येऊ लागला.

५. साधिकेच्या सुनेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेचा त्रास दूर होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाचा निरोप साधिकेला देणे आणि साधिकेने नामजप न करताही तिचा त्रास दूर होणे

२६.८.२०२३ या दिवशी माझी सून सौ. सायली प्रसाद लेले हिने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणारा त्रास सांगितला. २७.८.२०२३ या दिवशी सायलीने मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी करायला सांगितलेल्या नामजपाचा निरोप दिला. सद्गुरु गाडगीळकाकांनी मला ‘शून्य’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय – ॐ नमो भगवते वासुदेवाय – श्री हनुमते नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय ।’, हे नामजप १ – १ घंटा करायला सांगितले.

मी अजून नामजप करायला प्रारंभही केला नव्हता, त्याआधीच माझा खोकला थांबला. तो नंतर आलाच नाही. मी दोन्ही डोळ्यांचे शस्त्रकर्म होईपर्यंत हे नामजप प्रतिदिन केले.

६. कृतज्ञता आणि प्रार्थना

सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजप केल्यामुळेच माझे दोन्ही डोळ्यांचे शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडले. त्याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म (डॉ.) जयंत आठवले आणि सद्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘नव्याने मिळालेल्या दृष्टीचा उपयोग श्री गुरुसेवेसाठी होवो’, अशी मी श्री गुरुचरणी प्रार्थना करते.’

– सौ. भाग्यश्री नरसिंह लेले (वय ६१ वर्षे), मु. धुंदरे, ता. लांजा, जि. रत्नागिरी. (२०.११.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक