‘महर्षींनी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील दैवी तत्त्व जाणून नाडीपट्टीमध्ये उल्लेख केल्यानुसार त्यांच्या नावाआधी ‘श्रीचित्शक्ति’ ही उपाधी लावलेली आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म’ यांचे दैवी गुण आहेतच; पण त्यांच्या संपर्कात आल्यावर अध्यात्माची फारशी ओळख नसलेल्या सामान्यजनांना त्यांचे दैवी गुण पटकन जाणवतात, भावतात आणि घट्ट जोडून ठेवतात, ते गुण म्हणजे त्यांच्यातील आपुलकी, आपलेपणाने बोलणे आणि जवळीक साधणे ! या गुणांना आध्यात्मिक परिभाषेत ‘प्रीती’ असे म्हणतात. व्यवहारातही जे काम आपल्या विद्वत्तेने होत नाही, ते काम प्रेमभाव आणि त्याहून श्रेष्ठ प्रीती या गुणांनी सहज साध्य होते; कारण प्रीतीमुळे माणसे घट्ट विणेसारखी ( कापड विणतांना दोन धागे एकमेकांमध्ये जेवढे घट्ट विणू, तेवढे कापड मजबूत बनते. त्याप्रमाणे प्रीतीमुळे माणसे एकमेकांशी दृढ जोडली जातात.) जोडली जाऊन कायमची आपली होतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात अन्य पुष्कळ गुण असले, तरी त्यांच्यात सर्वांत महत्त्वाचा गुण (मुकुटमणी) आहे, तो म्हणजे प्रीती !
ज्ञानमार्गी व्यक्तींचीही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्याशी सहजतेने जवळीक होत असणे
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गंभीर असतो किंवा एखादी व्यक्ती ज्ञानमार्गी असते. सहसा अशा व्यक्तींशी बोलणे अनेक जण टाळतात. तशा प्रकृतीचे संत किंवा मान्यवर आश्रमात आले, तर त्या व्यक्तींना आपलेसे करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना कोणतीही अडचण येत नसे. खरेतर ज्ञानमार्गियांच्या प्रश्नांची उत्तरे देणे फार अवघड असते; पण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना स्वतःला गुरुकृपेने ईश्वरी ज्ञान मिळत असल्याने त्यांना अशांच्या प्रश्नांना सहजतेने उत्तरे देता येत होती. बोलक्या स्वभावामुळे मिळालेली अनेकविध माहिती आणि दांडगी स्मरणशक्ती यांमुळे त्यांना कोणत्याही विषयावर बोलता येते. त्यामुळे ज्ञानमार्गी व्यक्तींचीही श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्याशी सहजतेने जवळीक होते.
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ
१. ‘प्रीती’ या गुणाचे वैशिष्ट्य
अध्यात्मात ‘प्रीती’ हा सर्वाेच्च गुण आहे. तो पंचमहाभूतांपैकी आकाशतत्त्वाशी संबंधित आहे. जसे आकाशतत्त्व सर्वांना सामावून घेते, तसेच प्रीती या गुणामुळे आपण सर्व जणांना सामावून घेऊ शकतो. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी ‘प्रीती’ या गुणाचे सर्वांत अधिक योगदान असते. तो आपल्यात येण्यासाठी दुसर्याचा आदर करणे, दुसर्याचे बोलणे ऐकून घेणे, त्याला प्रतिसाद देणे, योग्य वेळी त्याची आठवण ठेवून त्याला आपल्यात सामावून घेणे, त्याच्या सहकार्याबद्दल त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, असे पैलू आपल्यात असणे आवश्यक असते. हे सर्व पैलू आपल्यात येण्यासाठी आपला अहं अल्प असणे आवश्यक असते.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यात ‘प्रीती’ हा गुण उपजत असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांनी त्यांच्यातील ‘प्रीती’ हा गुण साधनेला आरंभ केल्यावर विकसित केलेला नसून त्यांच्यात तो गुण लहानपणापासून, म्हणजे उपजतच आहे. आता आपण बघतो की, त्या कुठेही गेल्या असता त्यांच्या भोवती अनेक जण जमा होतात. त्याप्रमाणे लहानपणीसुद्धा शाळेत असो किंवा एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात असो, त्यांच्या भोवती नेहमी अनेक जण गोळा होत. यामध्ये लहान-मोठे सर्वजण असत. लहानपणापासून ते आतापर्यंत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना त्यांच्या प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमाला बोलावणे असते. त्या सर्वांना हव्या असतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा प्रत्येकाशी जवळीक साधण्याचा, सर्वांशी आपलेपणाने बोलण्याचा, कुणाला काही हवे-नको, हे बघण्याचा स्वभाव ! त्यामुळे त्या सर्वांच्या लाडक्या आहेत.
३. साधक असोत किंवा साधिका सर्वच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात !
जे कुटुंबियांच्या संदर्भात लक्षात आले, तेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली साधनेत आल्यावर साधकांच्या संदर्भातही दिसून आले. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्या ‘सर्वांशी जवळीक करणे आणि सर्वांशी प्रेमाने बोलणे’ या गुणांमुळे साधक त्यांच्याशी सहजतेने बोलू शकतात, मग साधक असोत किंवा साधिका ! बोलतांना स्वत:च्या वयाचाही कुणाला प्रश्न पडत नाही. लहान-मोठे सर्व जण त्यांच्याशी बोलतात. साधनेमधील मनाचा अडथळा दूर करण्यासाठी आणि मन मोकळे होण्यासाठी साधकांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्याशी बोलण्यास सांगितले होते. यामध्ये साधक आणि साधिका दोघांनीही भूतकाळात जीवनात आलेल्या समस्या आणि घडलेले कटू प्रसंग श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांना अगदी मोकळेपणाने सांगितले. यामुळे साधकांच्या मनावरचा पुष्कळसा ताण आणि अपराधीपणा दूर झाला अन् त्यांना साधनेतील पुढच्या वाटचालीविषयी गुरुकृपेने दृष्टीकोन मिळाले.
४. आश्रमात आलेले समाजातील संत किंवा महनीय व्यक्ती यांच्याशी सहजतेने जवळीक साधणे, त्यांचा ‘अतिथी देवो भव’, या भावाने पाहुणचार करणे आणि त्यामुळे त्या व्यक्ती श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांची विशेष आठवण ठेवत असणे
गोव्यातील रामनाथी येथील आश्रमात समाजातील एखादे संत किंवा मान्यवर आले की, त्यांची ओळख करून घेणे, त्यांचे कार्य जाणून घेणे, त्यांना सनातन संस्थेचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य यांविषयी माहिती देऊन ‘त्यामध्ये आणखी काय करता येईल ?’, याविषयी त्यांच्याकडून जाणून घेणे इत्यादी सेवा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली सहजतेने करत. हे करत असतांना त्या ‘अतिथी देवो भव’, या भावाने त्या पाहुण्यांकडे पाहून त्यांची चोख व्यवस्था ठेवत. त्यामुळे ते संत किंवा मान्यवर पहिल्या भेटीतच आपलेसे होत, तसेच ते श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांची विशेष आठवण ठेवत. वर्ष २०१२ पासून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली धर्म आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी भारतभर भ्रमण करत आहेत. आश्रमात येऊन गेलेले समाजातील संत किंवा मान्यवर यांची पुन्हा दुसरीकडे कुठे भेट झाली आणि त्यांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांनी पुन्हा आश्रमात यायचे आमंत्रण दिले, तर ते म्हणत, ‘तुम्ही आश्रमात असाल, तेव्हाच आम्ही येऊ !’
५. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांनी भारतभर भ्रमण करून स्वतःतील ‘प्रीती’ या गुणामुळे अमूल्य असे ज्ञान आणि सांस्कृतिक साठा जतन केला असणे, तसेच विविध क्षेत्रांतील संत अन् मान्यवर यांना सनातन संस्थेशी जोडलेले असणे
भारत हा देश धर्म आणि संस्कृती यांच्या संदर्भात विपुलतेने नटलेला आहे. भारताला पौराणिक महत्त्व आहे. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली या वर्ष २०१२ पासून भारत भ्रमण करत आहेत. आतापर्यंत त्यांचा ७ – ८ लाख किलोमीटर प्रवास झाला आहे. त्यांचा भारत भ्रमणाचा उद्देश अतीप्राचीन आणि अमूल्य अशा हिंदु संस्कृतीचे संशोधन अन् जतन करणे हा आहे. त्यांनी आतापर्यंत भारतातील विविध तीर्थक्षेत्रे, मठ, मंदिरे, कलाक्षेत्रे इत्यादी ठिकाणी जाऊन हिंदु संस्कृती, परंपरा यांचे चित्रीकरण करणे, तेथील संत-महंत यांच्या ओळखी करून घेणे, तेथील मान्यवरांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याकडील अमूल्य ठेव्याचे दर्शन घेणे, अशा सेवा केल्या आहेत. चित्रीकरण आणि मुलाखती यांद्वारे ठिकठिकाणचा अमूल्य ठेवा जतन होत आहे, तसेच अमूल्य अशा वस्तू संग्रहासाठी मिळत आहेत. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे हे शक्य होत आहे. खरेतर कुणी सहजासहजी आपल्याकडील माहिती सांगत नाही किंवा आपल्याकडील अमूल्य ठेवा उघड करत नाही; पण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यातील ‘आपुलकीने बोलणे’, ‘जवळीक करणे’, ‘त्यांच्यातील होऊन जाणे’ इत्यादी गुणांमुळे समाजातील संत, मान्यवर व्यक्ती, पुजारी हे पहिल्या भेटीतच स्वतःकडील सर्व माहिती सांगायला, चित्रीकरण करू द्यायला होकार देतात. एवढेच नव्हे, तर त्या व्यक्ती सनातन संस्थेशी कायमच्या जोडल्या जातात, तसेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्या साधनेमुळे त्यांच्याविषयी समाजातील त्या व्यक्तींना चांगल्या अनुभूतीही येतात. त्यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली या कुणीतरी वेगळ्या आहेत, दैवी आहेत’, हे कळते.
कृतज्ञता
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांच्यातील ‘प्रीती’ या गुणामुळे त्यांचा झालेला मोठा लोकसंग्रह, त्या करत असलेला सर्वांचा विचार आणि त्या व्यक्तीही कशा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली यांचे कौतुक करतात अन् त्यांच्याकडे जे काही आहे, ते अर्पण करतात, याची थोडक्यात माहिती येथे दिली आहे. लिहिण्यासारखे एवढे आहे की, आपली लेखणी अपुरी पडेल ! मला हे लिहिता आले, यासाठी मी श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे पती), पीएच्.डी., गोवा. (२५.११.२०२४)