‘पूर्वी नामजप करतांना माझ्या मनात पुष्कळ अनावश्यक विचार यायचे. त्यामुळे प्राणशक्तीवहन पद्धतीने (टीप) नामजप शोधून काढून ते करायला मला पुष्कळ वेळ लागायचा. तसेच ‘नामजप लवकर व्हावा’, यासाठी मी तो उरकण्याच्या दृष्टीने करायचे. काही मासांपूर्वी मला सद़्गुरु गाडगीळकाकांनी ‘जप करतांना देवाला आणि जपातून निर्माण होणार्या स्पंदनांना अनुभवा’, असे सांगितले होते. ते मला आठवले आणि ‘त्यांंनी जप करायला सांगितले आहे, तर तेच करून घेतील’, असे वाटून मी तसा प्रयत्न केला. ९.४.२०२४ या दिवशी मला नामजप करतांना पुढील अनुभूती आल्या.
टीप : प्राणशक्ती (चेतना)वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपायांसाठी नामजप शोधणे
१. वातावरणात ‘थंड स्पंदने’ जाणवणे : मी जप चालू केल्यावर ‘सद़्गुरु गाडगीळकाका स्वतः ध्यानस्थ बसलेले आहेत आणि ते मला शक्ती पुरवत आहेत’, असे मला वाटले. तेव्हा मला वातावरणात ‘थंड स्पंदने’ जाणवत होती.
२. ‘मी जप करायला पृथ्वीवर बसलेली नसून ब्रह्मांडाच्या पोकळीत आहे’, असे मला वाटले. तेव्हा ‘मी तारांगणात आहे’, असे मला भासत होते.
३. मला ‘सद़्गुरु गाडगीळकाका सूक्ष्म शस्त्रे सोडून माझ्या मनात येत असलेले अनावश्यक विचार नष्ट करत आहेत’, असे जाणवत होते.
४. ‘सद़्गुरु गाडगीळकाका अहं नष्ट करत आहेत’, असा भाव ठेवल्यावर आलेली अनुभूती : सद़्गुरु गाडगीळकाकांनी माझ्या मनात आलेले कर्तेपणाचे विचार गुरुचरणी अर्पण करण्यास सांगितले, तरीही माझ्या मनात पुनःपुन्हा अहंचे विचार येत होते. तेव्हा मी ‘सद़्गुरु गाडगीळकाका माझ्यातील अहं नष्ट करत आहेत’, असा भाव ठेवत जप करू लागले. त्या वेळी माझ्या सप्तचक्रांवर उपाय झाले. मला माझ्या डोळ्यांवर उपाय करतांना वेगळा भाव जाणवला.
५. माझ्या मनात अनावश्यक विचार येत असतांना ‘सद़्गुरु गाडगीळकाका ध्यानातून माझ्या दिशेने चैतन्य प्रक्षेपित करत आहेत’, असे मला वाटले आणि त्यांनी माझ्या आज्ञाचक्रावर त्यांचे मन एकाग्र केल्याचे मला जाणवले.
६. ‘मी नदीच्या काठाजवळील परिसरात नामजपाला बसले आहे’, असे मला वाटले. त्या वेळी सद़्गुरु गाडगीळकाका शिवस्वरूप असून मला भगवान शिवाचे अस्तित्व जाणवले.
७. ‘सद़्गुरु गाडगीळकाकाच माझ्याकडून जप करून घेत आहेत’, असे मला वाटत होते.
८. मी आज नामजपाचे उपाय करतांना उरकण्याच्या दृष्टीने नामजप न करता भावपूर्ण आणि अपेक्षित तेवढा वेळ देऊन, तसेच स्पंदने अनुभवत नामजप केला. तरीही माझा जप नेहमीच्या वेळेत पूर्ण झाला आणि माझ्या मनात अनावश्यक विचार आले नाहीत.
९. मला नामजप करतांना हलके आणि शांत वाटले. तेव्हा ‘नामजप करण्यात माझा काही कर्तेपणा नसून सद़्गुरु गाडगीळकाकांनीच माझा नामजप करून घेतला’, असे मला वाटले.
या अनुभूती माझ्याकडून लिहून घेतल्या, याविषयी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद़्गुरु गाडगीळकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. सिद्धी गावस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२४)
|