होत असलेल्या एखाद्या त्रासावर प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने एकदा उपाय शोधल्यास पुढे तो प्रतिदिन न शोधता १५ दिवसांनी पुन्हा शोधावा आणि तोवर तोच उपाय करावा !

साधकांना महत्त्वाची सूचना

‘सध्या साधक स्वतःला होत असलेला त्रास दूर करण्यासाठी प्रतिदिन प्राणशक्तीवहन उपायपद्धतीनुसार नामजप शोधतात आणि त्यानुसार नामजप करतात. साधकांना ‘प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे नामजप शोधता यावा आणि त्याचा त्यांना सराव व्हावा, या दृष्टीने ‘प्रतिदिन नामजप शोधावा’, असे सांगण्यात आले होते. आता बहुतेक साधकांना ही उपायपद्धत अवगत झाल्यामुळे यापुढे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे प्रतिदिन नामजप शोधण्याची आवश्यकता नाही. जसे एकदा का ‘आजार काय आहे’, हे कळले की, त्यावरील औषधे आपण घेत रहातो. आपण प्रतिदिन आजाराची चाचणी करत नाही. तसेच हे आहे. या दृष्टीने पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. आध्यात्मिक त्रास नसलेले आणि मंद त्रास असलेले साधक

यांनी एकदा प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे उपाय शोधला की, त्यांना सर्वसाधारणतः त्यामध्ये १५ दिवस एकच नामजप येत असतो. त्यामुळे आध्यात्मिक त्रास नसलेल्या आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी एकदा प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे उपाय शोधावा आणि पुढील १५ दिवस तोच उपाय करावा.

२. मध्यम आणि तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले साधक 

ज्या वेळी ‘त्रासाची तीव्रता वाढत आहे’, असे लक्षात येईल, त्या वेळी प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे उपाय पुन्हा शोधावा. त्रासाची तीव्रता वाढलेली जाणवत नसल्यास १५ दिवसांतून एकदा उपाय शोधून तो उपाय पुढील १५ दिवस करावा.

टीप

१. काही तीव्र त्रास असणार्‍या साधकांना ‘स्वतःचा आध्यात्मिक त्रास वाढला आहे’, हे स्वतःला लक्षात येत नाही. अशा साधकांनी त्यांना जोडून दिलेल्या उपाय सांगणार्‍या साधकांना विचारून त्यांनी दिल्याप्रमाणे प्राणशक्तीवहन उपायपद्धतीने उपाय करावा.

२. ही सूचना केवळ प्राणशक्तीवहन उपायपद्धतीद्वारे उपाय शोधण्याच्या संदर्भात आहे. या व्यतिरिक्त यापूर्वी सांगितलेले आध्यात्मिक उपाय, विविध पद्धतींनी आवरण काढणे आदी उपाय पूर्वीप्रमाणेच प्रतिदिन चालू ठेवावेत.’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., सनातन आश्रम, गोवा.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.