२ दिवसांच्या कारवाईत पुणे येथे १ सहस्र १०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त !

संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे देश-विदेशात पोचलेले !

पुणे – पुणे पोलिसांनी २० फेब्रुवारीला मोठी कारवाई करत ३ आरोपींना अटक करत त्यांच्याकडून ४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणाचे अधिक अन्वेषण करत पोलिसांनी पुण्यातील विश्रांतवाडी येथे धाड घातली. पोलिसांनी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.  कुरकुंभ येथे असलेल्या अनिल साबळे यांच्या कारखान्यातून हे अमली पदार्थ सिद्ध करण्यात येत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. कुरकुंभ एम्.आय.डी.सी. परिसरात असलेल्या ‘केमिकल फॅक्ट्री’ वर कारवाई करत ५५० किलो एम्.डी. (मेफेड्रॉन) जप्त करण्यात आले. आतापर्यंत ६०० किलो एम्.डी. जप्त करण्यात आले आहे. याचे मूल्य १ सहस्र १०० कोटी रुपये आहे. याचा पंचनामा करण्यात आला असून संबंधितांना अटक केली आहे. विविध पथके सिद्ध करून देशातील विविध भागांत पाठवण्यात आली आहेत. या प्रकरणी रसायन शास्त्रज्ञाचाही सहभाग आहे. संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे देश-विदेशांतही पोचलेले आहेत, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त म्हणाले की, पुणे येथे जप्त केलेल्या अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी हैदर शेख याला नायजेरीयन नागरिकाने एम्.डी. दिले होते. या एम्.डी.चे मूल्य कोट्यवधी रुपयांपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात ५०० ग्रॅम एम्.डी.चे मूल्य १ कोटी रुपये एवढे आहे. आता या प्रकरणात आंतरराष्ट्रीय धागेदोरे नेमके कुठले आहेत ? आणि नेमके हे अमली पदार्थ कुठून येत होते ? आणि कुणाला याची विक्री केली जात होती ? याचे अन्वेषण चालू असून राज्यातील विविध भागांत पथके रवाना करण्यात आली आहेत.

सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात गुंड पिंट्या माने आणि अजत करोसिया यांना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून पकडले. त्यांच्याकडून १ कोटी रुपयांचे ५०० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली. तेव्हा विश्रांतवाडीतील हैदर शेखने मेफेड्रोन विक्रीस दिल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके पाठवण्यात आली. हैदरला पोलिसांनी कह्यात घेतले. हैदरकडून अडीच कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले. हैदरने गोदामात मिठाच्या पोत्यात मेफेड्रोन लपवले होते. पोलिसांनी १०० ते २०० पोत्यांची पडताळणी केली. आणि पोलिसांनी हैदरने मिठाच्या पोत्यात लपवलेले ५५ किलो मेफेड्रोन जप्त केले असून, जप्त केलेल्या ५५ किलो मेफेड्रोनचे मूल्य ५५ कोटी रुपये असल्याचे समजते. गोदामाच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

अमली पदार्थ विक्री करण्याचे प्रकार पोलिसांनी काही प्रमाणात उघडकीस आणले असूनही अद्याप कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ सापडतात, यातून गुन्हेगार पोलीस यंत्रणेला जराही घाबरत नाही, हे लक्षात येते. पोलिसांनी त्यांच्या ‘खाक्या’ची कार्यवाही केल्यासच गुंड वठणीवर येऊ शकतील.