Mankameshwar Metro Station : आगरा येथील जामा मशीद मेट्रो स्थानकाचे ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ असे नामांतर !

योगी सरकार आणि मेट्रो प्रशासन यांचा स्तुत्य निर्णय

आगरा (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ फेब्रुवारीला मनकामेश्‍वर मेट्रो स्थानकाचे उद्घाटन करतील, असे बोलले जात आहे. येथील ‘जामा मशीद मेट्रो स्टेशन’चे नाव पालटण्यात आले आहे. आता त्याला ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ असे नाव देण्यात आले आहे. आगरा येथील लोकांनी योगी सरकार आणि ‘उत्तरप्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ (यू.पी.एम्.आर्.सी.) यांच्याकडे याविषयीची मागणी केली होती. त्यावर राज्य सरकारने जामा मशीद मेट्रो स्थानकाचे नाव पालटण्याचा आदेश दिला होता. यानंतर ‘यू.पी.एम्.आर्.सी.’च्या अधिकार्‍यांनी जामा मशीद स्थानकावर ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ नावाचा फलक लावला आहे, अशी माहिती ‘उत्तरप्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशन’चे उपमहाव्यवस्थापक श्री. पंचानन मिश्रा यांनी दिली.

आगरा येथील रावतपाडा परिसरात मनकामेश्‍वर हे प्राचीन शिवमंदिर आहे. त्या ठिकाणी नवीन स्थानक बांधले जात असल्याने त्याचे ‘मनकामेश्‍वर मेट्रो स्थानक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील लोकांनी केली होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मेट्रो योजनेची पहाणी करण्यासाठी आगरा येथे आले होते. त्यानंतर त्यांनी स्थानकाच्या नावात पालट करण्याची घोषणा केली होती.