वर्ष २०१९ मध्ये श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) या स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन या प्रक्रियेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्या होत्या. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना पुढील दृष्टीकोन दिले. १९ फेब्रुवारी या दिवशी या सूत्रांचा काही भाग आपण पाहिला. आज पुढील प्रसंग पाहूया.
भाग ६ पाहण्या करिता येथे क्लिक कराhttps://sanatanprabhat.org/marathi/766150.html
(भाग ७)
१७. प्रसंग – साधनेत निरुत्साह असणे
१७ अ. दृष्टीकोन
१. ‘येथे साधकांमध्ये पूर्ण निरुत्साहच दिसून येत आहे. कुठलीही एखादी सवय थांबली, तर ती पुन्हा चालू करायला पुष्कळ वेळ लागतो.
२. प्रक्रियासुद्धा औपचारिकता म्हणून करण्याचा भाग होत आहे. ‘माझ्यात पालट झाला पाहिजे’, हा मनाचा सहभाग पूर्ण नाहीसा झाला आहे.
३. घरी गेल्यावर साधकांची व्यष्टी साधना होत नाही. प्रगती टप्प्याटप्प्यानेच होत असते; म्हणून उदासीनता आल्यास गांभीर्याने विचार केला पाहिजे, नाहीतर मन मायेत अडकते.
४. ‘उत्साह का न्यून झाला ?’, याचे चिंतन लिहून काढले पाहिजे. आपल्याला आपल्या स्थितीविषयी आंतरिक जाणीव असली, तरच पालट होणे शक्य आहे. त्यासाठी सातत्य हवे. सूचनेच्या माध्यमातून ५० टक्के जाणीव बिंबवता आली पाहिजे. राहिलेले ५० टक्के कृतीच्या स्तरावर केले, तरच पूर्ण लाभ होतो. मनाचा सहभाग असेल, तर अडचणींना सामोरे जाता येते, नाहीतर सर्व प्रयत्न केवळ दाखवण्यापुरते होतात. कसेतरी करून करायचा भाग होतो. मनाची प्रक्रिया सतत हवी, तरच आश्रमातील चैतन्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ होतो. त्यासाठी ‘निरुत्साहाचे कारण आणि मनाची प्रक्रिया कुठे थांबली आहे ?’, हे आधी सांगितले पाहिजे.
१८. प्रसंग – नकारात्मक विचारांचा त्रास होणे
१८ अ. दृष्टीकोन : नकारात्मक विचारांतून बाहेर पडण्याचे संस्कार मनावर केले पाहिजेत. लगेच कुणाला तरी ते विचार सांगावेत आणि उपाय विचारून घ्यावेत, तसेच स्वयंसूचना देणे इत्यादी करावे. वास्तवात ‘त्यामुळे आपल्या मनाची किती हानी होते ? विचारांचा काय परिणाम होतो ?’, याचे गांभीर्य नसल्याने आपण त्यातच अडकून पर्याय शोधण्याचे पुढे ढकलतो. त्यासाठी प्रत्येक घंट्याला एकदा मनाचा आढावा घेतला पाहिजे. नकारात्मकतेपेक्षा उपाययोजनेकडे आपले लक्ष असले पाहिजे. त्याची पूर्ण सविस्तर प्रक्रिया लिहून आणावी. तेव्हा उपाययोजना सापडते. मनाची सतर्कता वाढते. प्रत्येक विचारापुढे उपाय लिहिल्यास अंतर्मुखताही वाढते. त्या वेळी स्वयंसूचना देणे न झाल्यास प्रार्थना, कृतज्ञता आणि कृतीच्या स्तरावरचे प्रयत्न करावे.
१९. प्रसंग – स्वीकारण्याची वृत्ती नसणे
१९ अ. दृष्टीकोन
१. कुणीतरी आपल्याविषयी आपल्याला माहीत नसलेले सांगत आहेत, याचा आनंद मानला पाहिजे; परंतु ‘आपला प्रवास विरुद्ध दिशेने होत आहे’, हे देवाने लक्षात आणून दिल्याबद्दल कृतज्ञता वाटायला हवी होती. आपल्या अहंवर आक्रमण झाल्यावर नकारात्मकता अधिक वाढते. त्यामुळे आणखी स्पष्टपणे विचारणे होत नाही.
२. ‘रडू येते, म्हणजे त्या प्रसंगाची निराशा अजून आहे’, असा अर्थ होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याच क्षणी त्याची सखोलता किती आहे, हे लक्षात घेऊन साहाय्य घेतले, तर पुढची प्रक्रिया होते.’ (क्रमशः)
– श्रीमती अश्विनी प्रभु, मंगळुरू