वाईट शक्तींमुळे होणार्‍या त्रासाच्या निवारणार्थ अथक संशोधनात्मक प्रयोग करून उपाय शोधणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

कलियुगात वाईट शक्तींच्या त्रासाविषयी समाज अनभिज्ञ आहे. बुद्धीप्रामाण्यवादी तर ‘जगात वाईट शक्ती नाहीतच’, असे म्हणतात; कारण त्यांचा याविषयीचा अभ्यासच नाही. आम्हा साधकांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे वाईट शक्तींच्या सूक्ष्म जगताविषयी ज्ञात झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी याविषयी अनेक संतांकडे जाऊन आणि स्वतःही अखंड संशोधन करून सहस्रो प्रयोगांतून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ अनेक उपाय शोधून काढले. ‘वाईट शक्ती कितीही मोठी असली, तरी तिच्यापेक्षाही देवाची शक्ती पुष्कळ अधिक आहे’, हे अनेक प्रसंगांतून साधकांना दाखवून देऊन त्यांनी साधनेचे महत्त्वही साधकांच्या मनावर बिंबवले. वाईट शक्तींविषयीचा इतका सखोल अभ्यास करणारे पृथ्वीवरील परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आहेत. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहाणार आहोत. १८ फेब्रुवारी या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज पुढील भाग पाहूया.

भाग १ बघण्याकरिता येथे क्लिक करा https://sanatanprabhat.org/marathi/765920.html

(भाग २)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मातील सिद्धांत प्रयोग करून सिद्ध करून दाखवणे

१ अ. परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकाचे नाव एका कागदावर लिहून तो कागद नामजप करत फाडल्याने त्या साधकाला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला त्रास होणे : ‘एका साधिकेला वाईट शक्तींचा त्रास झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला वाईट शक्तींच्या त्रासाविषयी अनेक पैलू शिकवले. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला एक प्रयोग करून दाखवला. त्यांनी वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या एक साधकाचे नाव कागदावर लिहिले आणि तो कागद नामजप करत उभा फाडला. तत्क्षणी कागदावर नाव लिहिलेला तो साधक ज्या ठिकाणी सेवा करत होता, तेथेच त्याला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पुष्कळ त्रास होऊ लागला.

१ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘साधकासाठी उपाय होणे’, म्हणजे काय ?’, हे समजावून सांगणे : या प्रसंगातून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘वाईट शक्तींना सूक्ष्मातील किती कळते ?’, हे आमच्या लक्षात आणून दिले. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. कागदावरील साधकाच्या नावातील अक्षरांवर परात्पर गुरु डॉक्टरांमधील चैतन्यशक्तीचा जोरदार आघात झाल्याने साधकाला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला त्रास होऊ लागला. याविषयी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘यालाच ‘त्या साधकासाठी उपाय होणे’, असे म्हणतात.’’ यातून आम्हाला ‘संतांच्या चैतन्यमय सत्संगात वाईट शक्तींना कसा त्रास होतो ? ’, हे शिकायला मिळाले.

१ इ. ‘वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकासाठी आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत साधकाने नामजपादी उपाय करणे’, हे सूक्ष्म युद्धच असणे : वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकासाठी नामजपादी उपाय करणारी व्यक्ती मात्र आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत हवी, नाहीतर उपाय करणार्‍या व्यक्तीला वाईट शक्तींचा त्रास होऊ शकतो. ‘उपाय करणे’ एक प्रकारचे युद्धच असते. यालाच ‘सूक्ष्म युद्ध’, असे म्हणतात. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून ‘वाईट शक्तींचा त्रास, वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांसाठी उपाय करणे, वाईट आणि दैवी शक्ती यांच्यामध्ये ‘सूक्ष्म युद्ध होणे’, हे शब्दप्रयोग सनातन संस्थेच्या इतिहासात रूढ झाले.

२. वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ उपायपद्धती शोधून काढण्याचे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले महत्त्व

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

वाईट शक्तींच्या त्रासाविषयी आमच्याशी (सूक्ष्मातील जाणू शकणार्‍या साधकांशी) बोलतांना परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला म्हणाले, ‘‘हे जग सूक्ष्म जगतातील सर्व गोष्टींविषयी अनभिज्ञ आहे. लोकांना आपल्याला या गोष्टी शिकवायच्या आहेत. जगातील बरेच चांगले व्यवहार वाईट शक्तींच्या अडथळ्यांमुळेच अयशस्वी होतात. त्यामागे बर्‍याचदा हे आध्यात्मिक कारणच असते. ते आपल्याला शोधून काढायचे आहे आणि केवळ शोधायचे नाही, तर ‘त्यावर उपाययोजना कोणती करायची ?’, हेही आपल्याला समाजाला सांगता आले पाहिजे. पृथ्वीवरील समाज अधिकतर वाईट शक्तींच्या त्रासामुळेच दुःखी आहे; परंतु समाजाला हे शिकवणारे कुणीही नाही. त्यासाठी आपल्याला सूक्ष्म जगताचा अभ्यास करून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ उपायपद्धती शोधून काढायच्या आहेत.’’

३. समाजाच्या कल्याणाची तीव्र तळमळ असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांनी सहस्रो प्रयोगांतून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ अनेक उपाय शोधून काढणे

अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी १२ वर्षे अखंड संशोधन करून सहस्रो प्रयोगांतून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ अनेक उपाय शोधून काढले. परात्पर गुरु डॉक्टरांनी याविषयीचे लिखाण वेळोवेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध केले, तसेच त्यांनी या लिखाणाचे अनेक ग्रंथही प्रसिद्ध केले. अजूनही वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे यावर संशोधन चालूच आहे. यातूनच परात्पर गुरु डॉक्टरांची समाजकल्याणाची तळमळ दिसून येते.

४. वाईट शक्तींविषयी सखोल अभ्यास करवून घेणारे पृथ्वीवरील एकमेव गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपाशीर्वादाने आणि त्यांच्यातील जिज्ञासेमुळे सनातन संस्थेतील सूक्ष्मातील जाणणार्‍या साधकांनी वाईट शक्तींच्या प्रत्यक्ष, तसेच अप्रत्यक्ष होणार्‍या त्रासांच्या निवारणार्थ अनेक उपायपद्धती शोधून काढल्या. वाईट शक्तींविषयी इतका सखोल अभ्यास करवून घेणारे गुरु मी कुठेही पाहिले नाहीत. ‘पृथ्वीवर ते एकमेवच आहेत’, यात शंका नाही.’ (क्रमशः)

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.१.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक