सूक्ष्म जगताची ओळख करून देऊन ईश्वराच्या ‘सर्वज्ञता’ या गुणाशी एकरूप होण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

कलियुगात वाईट शक्तींच्या त्रासाविषयी समाज अनभिज्ञ आहे. बुद्धीप्रामाण्यवादी तर ‘जगात वाईट शक्ती नाहीतच’, असे म्हणतात; कारण त्यांचा याविषयीचा अभ्यासच नाही. आम्हा साधकांनाही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आणि त्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे वाईट शक्तींच्या सूक्ष्म जगताविषयी ज्ञात झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी याविषयी अनेक संतांकडे जाऊन आणि स्वतःही अखंड संशोधन करून सहस्रो प्रयोगांतून वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ अनेक उपाय शोधून काढले. ‘वाईट शक्ती कितीही मोठी असली, तरी तिच्यापेक्षाही देवाची शक्ती पुष्कळ अधिक आहे’, हे अनेक प्रसंगांतून साधकांना दाखवून देऊन त्यांनी साधनेचे महत्त्वही साधकांच्या मनावर बिंबवले. आताही वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे संशोधन कार्य चालूच आहे. वाईट शक्तींविषयीचा इतका सखोल अभ्यास करणारे पृथ्वीवरील परात्पर गुरु डॉ. आठवले एकमेवाद्वितीय आहेत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहाणार आहोत.        

(भाग १)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. पूर्णवेळ साधना करण्यासाठी गोवा येथील ‘सुखसागर’मध्ये आल्यावर साधना आणि सेवा चालू होऊन त्यातील आनंद मिळू लागणे

‘वर्ष २००० पासून आम्ही (मी, माझे पती डॉ. मुकुल गाडगीळ (आताचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ) आणि मुलगी कु. सायली (आताच्या सौ. सायली सिद्धेश करंदीकर) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. पूर्णवेळ साधना करण्यासाठी आम्ही कुटुंबीय फोंडा (गोवा) येथील ‘सुखसागर’ येथे आलो. आमची साधना चालू झाली. आम्हाला प्रथम सर्वच नवीन होते. हळूहळू जसजसे साधना आणि सेवा यांत दिवस जाऊ लागले, तसा आम्हाला सेवेतील आनंद मिळू लागला.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

२. ‘वाईट शक्तींचा त्रास कसा होतो ?’, याविषयी प्रथमच आलेला अनुभव

२ अ. एका साधिकेला अकस्मात् आध्यात्मिक त्रास होऊ लागणे आणि साधिकेने मोठ्याने दत्ताचा नामजप केल्यावर त्या साधिकेचा त्रास न्यून होणे : मी स्वयंपाकघरात सेवेला असतांना माझ्यासमोर एक विलक्षण घटना घडली. तोपर्यंत मी तशी घटना कधीच पाहिली नव्हती. मी आणि एक साधिका पोळ्या लाटण्याची सेवा करत होतो. आमचे सतत नामस्मरण चालू होते. आम्ही सेवेत दंग झालो होतो आणि अकस्मात् माझ्या समवेत सेवा करणार्‍या एका साधिकेला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होऊ लागला.  आमच्या समवेत सेवा करणार्‍या आजींनी जोरात ओरडून ‘श्री गुरुदेव दत्त ।’, या नामाचा उच्चार केला आणि काय आश्चर्य ! त्या साधिकेचा त्रास न्यून झाला. या प्रसंगातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आम्हाला नामातील सामर्थ्याची प्रचीती आली. प्रथमच ‘वाईट शक्ती त्रास कसा देतात ?’, हे लक्षात आले.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वाईट शक्तींच्या त्रासाचा अभ्यास करण्याचे एक दालन उघडे करणे

त्या दिवसापासून पुढे परात्पर गुरु डॉक्टरांनी वाईट शक्तींच्या अभ्यासाचे एक दालनच उघडे करून दिले. अजूनही आमचा हा अभ्यास चालूच आहे. यातूनच ‘सूक्ष्म दृष्टी असणार्‍या’, ‘सूक्ष्म परीक्षण करणार्‍या’ आणि ‘सूक्ष्म चित्रे काढणार्‍या’ साधकांमधील ‘सूक्ष्मातील जाणणे’ हा वैशिष्ट्यपूर्ण गुणही परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रगट केला. अशा प्रकारे पुढे वर्ष २००१ मध्ये ‘सूक्ष्मातील जाणणारे साधक’ असलेल्या साधकांचा एक गट निर्माण झाला.

४. ईश्वराशी एकरूप होता येण्यासाठी दैवी शक्तींच्या समवेत वाईट शक्तींचीही माहिती करून देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

४ अ. सूक्ष्मातील कळण्यासाठी साधना वाढवणे आवश्यक असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे : परात्पर गुरु डॉक्टर सूक्ष्मातील जाणणार्‍या आम्हा साधकांना नेहमी म्हणायचे, ‘‘आपल्याला सर्वशक्तीमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ असलेल्या ईश्वराशी एकरूप व्हायचे आहे, तर आपल्याला चांगल्या, म्हणजेच दैवी आणि वाईट शक्ती यांच्या विषयीही माहिती असायला हवी. देवाला सर्व ठाऊक असते. आपल्याला प्रत्यक्ष दिसते, ते स्थूल जग केवळ ३० टक्के आहे; तर सूक्ष्म जगाची व्याप्ती ७० टक्के आहे. हे सूक्ष्म जग आपल्याला जाणता आले पाहिजे. ते जग केवळ साधनेमुळेच कळते. त्यासाठी साधना वाढवली पाहिजे.’’

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये सूक्ष्म जगताविषयी जिज्ञासा जागृत करणे आणि त्यामुळे साधकांना सूक्ष्म परीक्षण करण्यातील आनंद मिळू लागणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी वेळोवेळी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळे आमची सूक्ष्म जगताविषयी जाणण्याची जिज्ञासा जागृत झाली. जिज्ञासा जागृत झाल्याने आम्हाला सूक्ष्म परीक्षण करण्यात आनंद मिळू लागला. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला अगदी बोट धरून वाईट शक्तींच्या विश्वात उतरवले आणि वेळोवेळी आमचे रक्षणही केले.

‘ईश्वरी चैतन्याच्या अनुभूतींच्या समवेतच वाईट शक्तींच्या त्रासालाही तेवढेच महत्त्व देऊन ईश्वराच्या ‘सर्वज्ञता’, या गुणाशी एकरूप होण्यास शिकवणारे परात्पर गुरु डॉक्टरांसारखे गुरु लाभणे’, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. अशा सर्वज्ञ श्री गुरूंना आमचे त्रिवार वंदन !’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१.२०२२)

(क्रमशः)


स्थूल आणि सूक्ष्म यांतील भेद

‘सूक्ष्म काळा’ला कर्माचे बंधन नसते; पण ‘स्थूल काळा’ला कर्मबंधन असते. स्थुलातील प्रत्येक गोष्ट प्रत्यक्ष दिसत असल्याने तिला कर्माचे सर्व नियम लागू होतात; कारण ही गोष्ट पृथ्वीतत्त्वाशी, म्हणजेच जडत्वाशी निगडित असते. सूक्ष्माचे तसे नसते; कारण सूक्ष्मात सर्व कृती मानस असतात. यात आपला भाव महत्त्वाचा असतो. आपल्या भावाप्रमाणे देव आपल्याला फळ देत असतो. स्थुलात कर्म प्रत्यक्ष घडत असल्याने ते वातावरणावर आपला स्थूल परिणाम सोडते; परंतु सूक्ष्मातील कर्म हे अधिकतः वायुतत्त्वाशी संबंधित असल्याने ते घडते आणि वातावरणात विलीन होऊन जाते. त्याचा परिणाम आपल्याला स्थुलातून लगेच दिसत नाही; परंतु तो होत असतो. सूक्ष्म कर्म संतांनाच जाणता येते. सूक्ष्म कार्य हे स्थुलापेक्षा अधिक श्रेष्ठ मानले गेले आहे. हे कार्य देवता, महर्षि, सिद्ध आणि संत करत असतात.

पूर्वी सूक्ष्म काळ होता; परंतु आता स्थूल काळाला प्रारंभ झाला झाला आहे. आता तिसरे महायुद्ध जवळ येऊन ठेपले आहे. पूर्वी १२ वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून सप्तपाताळांशी युद्ध केले. आता दृश्य परिणाम म्हणून स्थुलातील आपत्तींना प्रारंभ होत आहे. तेव्हा आता सर्वांनीच सतर्क होऊन स्थूल काळाला सामोरे गेले पाहिजे आणि आपले धैर्य वाढवले पाहिजे.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक