भारताची महान ऋषि परंपरा : लेखांक १७
१. अगस्ति ऋषींचा जन्म
अगस्ति ऋषींचे नाव काढताच त्यांनी समुद्र पिऊन टाकला आणि विंध्य पर्वताला वाकवले, या त्यांच्या सामर्थ्याची जाणीव होते. ऋषि अगस्ति काहीसे ठेंगणे अन् कृष्णवर्णी होते. आश्रमवासियांसारख्या त्यांनी जटा धारण केल्या होत्या. छातीवर रूळणारी दाढी होती. त्यांच्या दृष्टीत विलक्षण आत्मश्रद्धा होती, तेज होते. त्यांची दृष्टी ब्राह्मतेज प्रकट करणारी आणि तेजस्वी होती. त्यांना ‘मैत्रावरुणी’ असेही नाव आहे. ब्रह्मर्षि वसिष्ठांच्या समवेतच त्यांचा जन्म झाला होता; म्हणून त्यांना ‘मैत्रावरुणी’ म्हणतात. मित्र-वरुण हे दोघे देव, एकाच देहाने (‘मैत्र-वरूण’ या देहाने) वावरत होते. वाटेत ऊर्वशी होती. तिच्या संयोगापासून वसिष्ठ आणि अगस्ति यांचा जन्म झाला.
२. ऋषीपत्नी लोपामुद्रा हिचा जन्म
अगस्ति अत्यंत कडक शिस्तीचे धर्मजीवन जगत होते. करडे तपस्वी होते. अशा ऋषीला कोण कन्या देणार ? त्यांनी विवाहाचे स्वप्न पाहिले नाही; परंतु एक दिवस घनदाट जंगलातून जातांना त्यांनी त्यांचे पितर पाहिले. ते पितर आकाशात अधांतरी खाली डोके, वर पाय अशा स्थितीत लोंबकळत होते. त्यांच्या दुःखाचे कारण अगस्ति ऋषींनी विचारले. ते म्हणाले, ‘‘तू विवाह कर. तुला मुलगा झाला की, तो श्राद्ध करील आणि मग आम्ही स्वर्गात जाऊ.’’ त्याच क्षणी अगस्ति ऋषींच्या मनात विवाहाचा विचार आला; पण त्यांना कुणी कन्या देईना. शेवटी त्यांनी योगसामर्थ्याने निसर्गातील सर्व सुंदर वस्तूंचे सार असलेली अशी लावण्यवती कन्या निर्माण केली आणि अपत्य नसलेल्या विदर्भ राजाच्या स्वाधीन केली. राजाने तिचे नाव ‘लोपामुद्रा’ ठेवले.
विदर्भ देशाची राजकन्या लोपामुद्रा ही अगस्ति ऋषींची पत्नी. विदर्भ राजाला अगस्ति ऋषींमुळेच कन्यारत्न प्राप्त झाले. त्या वेळी ‘ती मुलगी अगस्ति ऋषींनाच पत्नी म्हणून द्यावी’, अशी अट होती. त्यानुसार लोपामुद्राही अगस्ति ऋषींची पत्नी झाली. वैभवात वाढलेल्या लोपामुद्राला ऋषि अगस्ति यांच्यासारखे १२ वर्षे कठोर संयमी जीवन जगावे लागले. अगस्ति प्रसन्न झाले. त्या वेळी लोपामुद्रेने तिला विलासी जीवनाची ओढ असल्याने तिने तशी इच्छा अगस्ति ऋषींकडे व्यक्त केली. त्यासाठी धन मागितले. धन हवे; म्हणून ते देशोदेशींच्या राजांकडे गेले. प्रत्येक राजाने त्यांना जमाखर्च दाखवला. जितके उत्पन्न होते, तितकाच खर्च होता. अगस्ति ऋषींना धन द्यायचे म्हणजे प्रजेवर कर बसवणे अपरिहार्य होते. त्याला अगस्ति ऋषींनी नकार दिला. नंतर अगस्ति ऋषींनी वातापि आणि इल्बल या दोन दुष्ट राक्षसांचा वध करून त्यांच्याजवळचे अमाप धन घेतले आणि लोपामुद्रेला दिले.
अगस्ति आणि लोपामुद्रा यांना एक मुलगा झाला. तो इतका तेजस्वी होता की, जन्माला येताच वेदपठण करू लागला. अगस्ति ऋषींनी त्याचे नाव ‘त्रिदस्यु’ असे ठेवले; परंतु अगस्ति त्याला ‘इध्मवाह’ म्हणत. अगदी लहानपणापासूनच तो वडिलांच्या यज्ञासाठी इध्मा (समिधा) गोळा करून आणायचा.
३. …तर अगस्ति ऋषींचेच पारडे जड !
रामायणात अगस्ति ऋषींनी श्रीराम प्रभुला अनुग्रह दिला. वराहपुराणातील ‘अगस्त्यगीता’ त्यांचीच आहे. काही प्राचीन ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. ललिता महात्रिपुरसुंदरी देवीचे ते श्रेष्ठ भक्त आहेत. हयग्रीवापासून त्यांनीच ‘ललितासहस्रनाम’ आणि ‘त्रिशती’ प्राप्त करून घेतली. त्यांची पत्नी लोपामुद्रा ही सुद्धा तंत्रशास्त्रातील ‘हादिविद्येची’ निर्माती आहे. दक्षिणेत अगस्ती ऋषींचा आश्रम आहे. अगस्ति ब्रह्मर्षि आहेत, योगी आहेत, वैदिक, ज्ञानी, तपस्वी आणि भक्तही आहेत. त्यांना अज्ञात असे काहीही नाही. हिमालय आणि विंध्य यांच्या मधल्या भूभागातील सर्व ज्ञान आणि पुण्य जर तराजूच्या एका पारड्यात टाकले आणि अगस्ति ऋषींना दुसर्या पारड्यात बसवले, तर अगस्ति ऋषींचेच पारडे जड होईल.’
(संदर्भ : ‘घनगर्जित’, जानेवारी २०१९)