१ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंचा सहभाग !
मालवण : अयोध्या येथे श्रीरामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्त तारकर्ली ते देवबाग अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. पारंपारिक वेषात सहभागी हिंदू, रस्त्याच्या दुतर्फा काढण्यात आलेल्या रांगोळ्या, बांधण्यात आलेल्या भगव्या पताका यामुळे वातावरण भगवामय झाले होते. ‘लाना होगा, लाना होगा, हिंदू राष्ट्र लाना होगा !, ‘हिंदू एकजुटीचा विजय असो !’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
(सौजन्य : Devbag Rockstar)
२२ जानेवारी या दिवशी काढण्यात आलेल्या या शोभायात्रेचा प्रारंभ तारकर्ली येथील श्री महापुरुष मंदिरात पूजा करून आणि ११ पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या. तारकर्ली बंदर जेटी येथून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेला प्रारंभ झाला. पुष्पक विमानाच्या चित्ररथावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, गरुड आणि हनुमंत या व्यक्तिरेखा साकारण्यात आल्या होत्या. देवबाग येथील श्री विठ्ठल मंदिर येथे शोभायात्रा आल्यावर महिला ढोल पथकाच्या तालावर यात्रेतील महिलांनी भगव्या पताका उंचावत फेर धरून नृत्य केले. सर्वांना अल्पोपहार आणि सरबत देण्यात आले. यात्रेच्या मार्गातील सर्व मंदिरांमध्ये ११ पण्यात लावण्यात आल्या. सांगतेच्या वेळी देवबाग संगम येथील श्री मोबरेश्वर मंदिरात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या व्यक्तिरेखांची पाद्यपूजा करून आरती ओवाळण्यात आली. श्री. कालिप्रसाद सारंग यांनी ‘हिंदूंची सद्य:स्थिती आणि हिंदू संघटनाची आवश्यकता’, याविषयी प्रबोधन केले. ५ कि.मी. अंतराच्या या शोभायात्रेत १ सहस्र ५०० हून अधिक सहभाग होते. आगामी हिंदु नववर्ष गुढीपाडव्याला स्वागत फेरी काढण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.