मुंबई – मुंबईहून वर्ष १९९० मध्ये अयोध्येत पोचलेल्या दादरच्या कारसेवक महिलांच्या जथ्थ्याला अटक करून उत्तरप्रदेश पोलिसांनी एका शाळेच्या आवारात बंदिस्त केले होते. त्यांपैकी काहींनी स्थानिकांच्या साहाय्याने पलायन करून अंदाजे ५० किलोमीटर पायपीट करत ३१ ऑक्टोबर १९९० या दिवशी कारसेवेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. या जथ्थ्यातील ९६ वर्षीय रामभक्त शालिनी रामकृष्ण डबीर यांचा त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कार्यकर्ते यांनी त्यांचा विशेष सन्मान केला. या वेळी श्रीमती डबीर यांना २२ जानेवारी या दिवशी होणार्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या अक्षता कलशासह प्रभु श्रीराम मंदिराची सुबक प्रतिकृती दिलीप गोडांबे यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आली.
श्रीमती शालिनी रामकृष्ण डबीर यांना वर्ष १९९० मध्ये पोलिसांचा लाठीमार, अश्रूधूर एवढेच नाही, तर आसपास होत असलेल्या गोळीबाराचाही अनुभव आला; मात्र त्या वेळी त्या आणि त्यांच्या समवेतचे सहकारी कुणीही डगमगले नाही. या कारसेवेमध्ये दिलीप गोडांबे यांनीही सहभाग घेतला होता. या सत्कार सोहळ्यात गजानन पेंडसे, मनोज मिसाळ, संगीता पवार आणि छाया गोडांबे आदी उपस्थित होत्या.