Manipur Violence : मणीपूरमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांकडून पोलिसांवर आक्रमण, ८ पोलीस घायाळ !

गेल्या ३ दिवसांत ४ जणांची हत्या, अनेक घायाळ !

इंफाळ (मणीपूर) – हिंदु मैतेई आणि ख्रिस्ती कुकी आतंकवादी यांच्यातील संघर्ष मध्यंतरीच्या काळात शांत होता; मात्र गेल्या ३ दिवसांपासून पुन्हा एकदा मणीपूर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. १ जानेवारीच्या सायंकाळी थौबलच्या लेंगोल हिल परिसरात ४ जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या आक्रमणात ११ जण घायाळ झाले.

१ जानेवारी २०२४ : प्रशासकीय अधिकार्‍यांनी सांगितले की, आक्रमण करणारे पैसे उकळण्यासाठी लिलोंग चिंगजाओ भागात आले होते. तेव्हा झालेल्या वादाच्या वेळी गोळीबार चालू झाला. काही प्रसारमाध्यमांनुसार आरोपींची ओळख पटलेली नाही, तर काही जणांनी सांगितले की, मारले गेलेले पंगल समाजाचे म्हणजे मुसलमान आहेत. ‘मैतेई हेरिटेज सोसायटी’ या संघटनेनुसार घटना धार्मिक तेढीतून झालेली नाही.

३१ डिसेंबर २०२३ : मोरेहमध्ये ख्रिस्ती कुकी आतंकवाद्यांनी मणीपूर पोलिसांवर आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात काही नागरिक घायाळ झाले. त्याच दिवशी कौत्रुक आणि कडंगबल भागांत मैतेई आणि कुकी यांच्यातही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

३० डिसेंबर २०२३ : ३० डिसेंबरच्या रात्रीही मोरेह येथे कुकी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ४ मणीपूर पोलीस घायाळ झाले. या वेळी ग्रेनेडचा वापर करण्यात आला. ३० डिसेंबरच्या दुपारी कुकींनी तेंगनौपालमध्ये पोलिसांच्या वाहनावर आक्रमण केले. यामध्येही ४ पोलीस गंभीर घायाळ झाले. कुकी आतंकवाद्यांनी मोरेहच्या वॉर्ड क्रमांक ९ मध्ये चिकिम वेंग येथे मोरेहच्या कमांडो पोलिसांवर गोळीबार केला आणि बाँब फेकले.

राजधानी इंफाळसह ५ जिल्ह्यांमध्ये पुन्हा संचारबंदी लागू !

हिंसाचार आटोक्यात आणण्यासाठी सरकारने इम्फाळ पूर्व, इंफाळ पश्‍चिम, थौबल, ककचिंग आणि बिष्णुपूर जिल्ह्यांत पुन्हा संचारबंदी लागू केली आहे. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी एका व्हिडिओ संदेशातून हिंसाचाराचा निषेध केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

३ मे २०२३ पासून राज्यात हिंसाचार चालू असून जातीय संघर्षात आतापर्यंत १८० हून अधिक लोक मारले गेले, तर अनुमाने ६० सहस्र लोक बेघर झाले आहेत.

संपादकीय भूमिका

ख्रिस्ती कुकी आतंकवादी, तसेच त्यांना म्यानमारमधून मिळत असलेले साहाय्य पहाता त्यांचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय सैन्य आणि मणीपूर पोलीस यांनी काश्मीरमधील ‘ऑपरेशन ऑल आऊट’सारखी मोहीम हाती घेतली पाहिजे !