पुणे येथे दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून, लग्नाचे आमीष दाखवून तरुणी, महिला यांवर, तसेच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार या प्रकरणांच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये पुणे राज्यात चौथ्या स्थानी असून, शहरात गेल्या वर्षी २ सहस्र ७४ गुन्हे नोंद झाले आहेत. त्यामुळे महिलांवरील वाढते अत्याचार हा चिंतेचा विषय ठरत आहे.
यावरून ‘पोलीस जनतेचे रक्षक आहेत’, हे बिरूदही किती पोकळ आहे, हे लक्षात येते. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनी एका स्त्रीच्या रक्षणासाठी मोठ्या प्रमाणात दुष्टांचा संहार करून जनतेला स्त्रीरक्षणाचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळेच स्त्रिया सन्मानाने जगू शकल्या; पण सध्या याच्या उलट स्थिती झाली आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून पीडितेला सर्व प्रकारे साहाय्य करण्याऐवजी तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. समाजामध्ये तिला सन्मानाने जगता येण्यासाठी, तसेच समाजामधील वाढती वासनांधता दूर करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे आवश्यक असते; पण तसे कुठेच होतांना दिसत नाही. वर्षानुवर्षे खटला चालल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य अल्प होत जाते. मधल्या काळात जामीन मिळवण्याचे प्रयत्न होतात. शिक्षा झालीच, तर दयेचा अर्ज प्रविष्ट करता येतो. शिक्षेची अशी स्थिती असेल, तर पीडितेला न्याय मिळणे दूरच; पण शिक्षेची जरब लोकांमध्ये कशी बसणार ? याउलट इस्लामी देशांची परिस्थिती आहे. तिथे शिक्षेची कठोर कार्यवाही काही दिवसांमध्येच केली जाते. सौदी अरेबियात ४ दिवसांत जाहीर शिरच्छेद, अफगाणिस्तानमध्ये जाहीररित्या गुन्हेगाराच्या डोक्यात गोळी घालून त्याला ठार करणे, इजिप्तमध्ये ७ दिवसांत फासावर लटकवणे अशा शिक्षा देण्यात येतात.
एकीकडे बलात्कार्यांना तात्काळ शिक्षाही होत नाही आणि अशा घटना होऊ नये; म्हणून मुळापासून त्यावर उपाययोजनाही काढल्या जात नाहीत. आजही एखादी महिला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करायला गेल्यावर तिची तक्रार नोंदवली जात नाही. अनेकदा पीडितेला पोलिसांकडूनच अपमानास्पद वागणूक दिली जाते. न्यायालयात पीडित महिलांना न्यायासाठी वर्षानुवर्षे ताटकळत रहावे लागते. जोपर्यंत यंत्रणेतील या त्रुटी काढल्या जात नाहीत, तोपर्यंत कितीही नवीन कायदे आले, तरी त्याची प्रभावीपणे कार्यवाही केल्याविना या घटना थांबू शकणार नाहीत.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे