संपादकीय : श्रीरामाच्या आगमनापूर्वी…!

पहिल्या विमानातील प्रवाशांनी प्रवासात हनुमान चालिसाचे पठण केले ( सौजन्य . ANI )

श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी रामभक्तांमध्ये अपूर्व उत्साह संचारला आहे. नवी देहली येथून अयोध्या येथील महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम येथे आलेल्या पहिल्या विमानातील प्रवाशांनी प्रवासात हनुमान चालिसाचे पठण केले. विमानातून बाहेर पडतांना ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाच्या वेळीही अयोध्यावासियांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये विमानतळासह विविध विकासकामांचे उद्घाटन केले. सध्या अयोध्येतील रस्ते, चौक सजवण्यात येत आहेत. तेथील दुकानदारांपासून सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वांच्या मुखावर ‘५०० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राममंदिर आताच्या पिढीला पहाण्यास मिळत आहे’, याविषयी कृतज्ञताभाव जाणवत आहे. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी १ मास आधीपासूनच राममंदिर परिसरात ठाण मांडून बसले असून ते तेथील बित्तंबातमी जनतेपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वजण आतुरतेने २२ जानेवारीला भव्य श्रीराममंदिराच्या गर्भगृहात रामलला प्रतिष्ठापित होण्याची वाट पहात आहेत. विदेशातील हिंदूही त्यांच्या देशात आतापासूनच फेरी काढणे, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे यांद्वारे भारतातील हिंदूंना साथ देत आहेत. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.

श्रीरामाला आताही विरोध ?

सॅम पित्रोदा

एकीकडे आनंदाची अशी स्थिती असतांना त्यात मिठाचा खडा टाकण्याचे काम काही जण जाणीवपूर्वक करत आहेत. काँग्रेसची विदेशात शाखा असलेल्या ‘इंडियन ओव्हरसिज काँग्रेस’चे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी ‘राम हीच अडचण आहे’, असे सांगितले आहे. हीच काँग्रेस रामसेतूला खिंडार पाडून सागरी मार्ग सिद्ध करण्यासाठी ‘रामायण आणि राम काल्पनिक आहे’, असे सांगत होती. ‘सी.पी.एम्.’ पक्षाचे सीताराम येच्युरी यांनी ‘राममंदिराच्या उद्घाटनाला येणार नाही’, असे सांगितले आहे. ज्यांच्या नावातच सीता आणि राम आहे, अशांनी असे म्हणणे दुर्दैवी नव्हे का ? महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनीही ‘मी राममंदिराच्या सोहळ्याला जाणार नाही’, असे सांगितले आहे. समाजवादी पक्षाने ‘रामाला विरोध नसून भाजपकडून श्रीराममंदिराच्या आडून जे राजकारण केले जात आहे, त्याला विरोध आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हे सर्व करण्यात येत आहे’, असे सांगितले आहे. समाजवादी पक्ष किंवा अन्य पुरोगामी राजकारण्यांनी त्यांची व्यक्त केलेली मते हा त्या आडून हिंदु धर्माला वा श्रीरामाला विरोध करण्याचा वेगळा प्रकार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राममंदिराच्या उद्घाटनाला येणार नाही; पण ते नंतर कधी जाणार ? याविषयीही सोहळ्याला विरोध करणार्‍यांपैकी कुणी काही म्हटलेले नाही. यातून त्यांचा ‘श्रीरामाला छुपा विरोध आहे’, हे लक्षात येते.

श्रीराम सर्वांचा, हे आता समजले का ?

डॉ. फारूख अब्दुल्ला

जागतिक मत रामाच्या बाजूने असल्यामुळे विरोध कसा करायचा ? हा पुरोगाम्यांना प्रश्न आहे. मुंबईतील मुसलमान तरुणी शबनम शेख रामाच्या दर्शनासाठी चालत निघाल्यावर तिने ‘तुम्ही रामाला एका धर्मात बांधू नका’, असे सांगितले. तेवढाच संदर्भ घेऊन तिच्या नावे माध्यमांमध्ये लिखाण प्रसारित करण्यात आले. खरेतर असे लिखाण प्रसारित करणार्‍यांनी किंवा तसे म्हणणार्‍यांनी ‘जेव्हा श्रीराम अयोध्येत एका तंबूत होते, तेव्हा राममंदिर बांधण्यासाठी मुसलमानांनी जागा द्यावी’, असे का सांगितले नाही ? जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनीही ‘राम केवळ हिंदूंचे नव्हे, तर पूर्ण जगाचे भगवान आहेत’, असे विधान केले आहे. फारूख अब्दुल्ला यांना श्रीरामाचे एवढे महत्त्व वाटत होते, तर त्यांनी त्यांच्या धर्मबांधवांना श्रीराममंदिरासाठी बाबरीची जागा देण्यास वा सहकार्य करण्यास का सांगितले नाही ? तसेच त्यांचे धर्मबांधवही गेली ५०० वर्षे मंदिराला विरोध का करत होते ? याचे उत्तर देणार का ? श्रीराममंदिरासाठी संघर्ष चालू असतांना राममंदिर होईल कि नाही ? याची हिंदूंना शाश्वती नसतांना आता श्रीरामाचे सार्वत्रिकीकरण करणारे गप्प का होते ? बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍यांवर गुन्हे का नोंद केले ? या घोषणा देणारे त्यांना समाजकंटक अथवा वातावरण बिघडवणारे का वाटतात ? याचे त्यांनी प्रथम उत्तर दिले पाहिजे.

बाबरीचे पक्षकार आणि सर्वाेच्च न्यायालयापर्यंत श्रीराममंदिराला विरोध करणारे इक्बाल अन्सारी यांनी ३० डिसेंबरला अयोध्येत विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फुले उधळली. यातून जग हिंदूंच्या संघटित शक्तीमुळे आणि हिंदूंना राजाश्रय मिळू लागल्यामुळे पालटत आहे, हे निश्चित आहे.

मंदिरामुळे सर्वंकष विकास !

काँग्रेसी सॅम पित्रोदा यांनी ‘राममंदिर बांधून काय होणार ? बेरोजगारी दूर होणार का ? महागाई न्यून होणार का ?’, असे विचारले आहे. पित्रोदा यांचा पक्ष भारतात ६० वर्षे सत्तेत होता. त्या कालावधीत महागाई अथवा बेरोजगारी दूर का झाली नाही ? याचे आत्मपरीक्षण ते केव्हा करणार ? भारतीय व्यापारी संघटनेच्या अनुमानानुसार राममंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच ५० सहस्र कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. अयोध्येत केंद्र आणि राज्य शासन यांनी विकासकामांचा सपाटाच लावला आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अयोध्येत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून अयोध्येचा चेहरामोहरा पालटणार आहे’, असे सांगितले आहे. अयोध्येचे रेल्वेस्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीन मोठी हॉटेल्स, रस्ते इत्यादी अनेक गोष्टी करण्यात येत आहेत. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळणार नाही का ? अयोध्येत सध्याच्या आकडेवारीनुसार प्रतिदिन

८० सहस्रांहून अधिक रामभक्त भेट देत आहेत. श्रीराममूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ही संख्या काही लाखांवर जाण्याची शक्यता असणार आहे. या रामभक्तांना सुविधा देण्यासाठी अयोध्येत मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. हा विकास नाही तर काय आहे ?

‘राममंदिराचे राजकारण करू नये, राम सर्वांचाच आहे’, असे म्हणणार्‍यांनी राममंदिरासाठी काय संघर्ष केला ? हेही उघडपणे सांगावे !