Myanmar Soldiers : गृहयुद्धामुळे म्यानमारचे १५१ सैनिक भारतात पळून आले !

गौहत्ती (आसाम) – म्यानमारमध्ये चालू असलेल्या गृहयुद्धामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. आतापर्यंत सीमेवर रहाणारे म्यानमारमधील नागरिक भारतात पळून येत होते. आता म्यानमारचे जवळपास १५१ सैनिक भारतात पळून आले असून भारतीय सैन्याच्या ‘आसाम रायफल्स’ने त्यांना कह्यात घेतले आहे. म्यानमारच्या ‘आराकान आर्मी’ या सशस्त्र गटाने सैन्याच्या तळांवर आक्रमणे करून सैन्यतळ कह्यात घेतले. यामुळे तेथील जवळपास १५१ सैनिक पळून मिझोरममधील लॉन्गतलाई जिल्ह्यात पळून आले. त्यांतील काही जण गंभीर घायाळ झाले होते. आसाम रायफल्सने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. या सैनिकांना पुन्हा म्यानमारला पाठवण्यात येणार आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि म्यानमारचे सैन्य यांच्यामध्ये यासंदर्भात चर्चा चालू आहे, असे आसाम रायफल्सच्या अधिकार्‍यांनी सांगितले. नोव्हेंबरमध्येही सशस्त्र गटांनी म्यानमार-भारत सीमेवरील सैनिकी छावण्या कह्यात घेतल्या होत्या. तेव्हाही म्यानमारचे १०४ सैनिक मिझोराममध्ये पळून आले होते.