राजकीय पक्षांमध्ये ‘अर्बन’ (शहरी) नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस अर्बन नक्षलवादाची विचारधारा ‘आऊट सोर्सिंग’ (बाह्यस्रोत) करत आहे’, असे वक्तव्य केले. ‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

३ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘काँग्रेसचे नेते आणि इंदिरा गांधी यांची साम्यवाद्यांशी जवळीक, नक्षलवाद हा आतंकवादच, नक्षलवाद्यांकडून आतंकवाद्यांपेक्षा अधिक हत्या आणि राष्ट्र तोडण्याची राहुल गांधींची विचारधारा’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/742616.html

श्री. रमेश शिंदे (उजवीकडे) यांची मुलाखत घेतांना श्री. स्वप्नील सावरकर

५. शहरी नक्षलवाद्यांचा विद्यापिठांतील प्रभाव आणि विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद !

श्री. रमेश शिंदे

‘शहरी नक्षलवाद’ या आजच्या संकल्पनेच्या दृष्टीकोनातून जर आपण बघितले, तर त्यामागील मूळ संकल्पना ही नक्षलवादाचीच आहे. जसे आपण म्हटले की, वर्ष १९६७ मध्ये साम्यवादी विचारांचे नेते कनू संन्याल आणि चारु मुजुमदार यांनी नक्षलबाडी या गावामधून हिंसक नक्षलवादाला प्रारंभ केला. त्यानंतर १३ वर्षांनी १९८० च्या दशकामध्ये शहरी नक्षलवादाला प्रारंभ करण्यात आला; कारण नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून देणे आणि त्यासाठी शहरातील युवकांचे ‘रिक्रूटमेंट’ (भरती) करणे आवश्यक होते. साम्यवादी विचारसरणीचे लोक हे तोपर्यंत वेगवेगळ्या विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून प्रस्थापित झालेले होते. ते इतिहासकार आणि पत्रकार बनले होते. ते स्वतःला ‘मानवतावादी’ कार्यकर्ते आहोत’, असे म्हणू लागले होते. अशा माध्यमांतून ते नक्षलवादाची भीषणता आणि अमानुषता लपवण्यासाठी त्याला तात्त्विक मुलामा देण्याचे कार्य करत होते. हे शहरी नक्षलवादी वेगवेगळ्या विद्यापिठांमध्ये जाऊन तेथे वैचारिक प्रचार करायला लागले. भारतातील वर्गसंघर्ष, वर्णसंघर्ष, स्त्रीमुक्ती अशा वेगवेगळ्या विषयांवर आंदोलने करून विद्यापिठांमधून त्यांनी विद्यार्थ्यांचा बुद्धीभेद करायला प्रारंभ केला. याचे सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण, म्हणजे जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये (‘जे.एन्.यू.’मध्ये) ‘भारत तेरे टुकडे होंगे’, ‘अफझल हम शर्मिन्दा है, तेरे कातिल जिंदा है’, अशा देशविरोधी आणि आतंकवाद समर्थक घोषणा दिल्या गेल्या. या घोषणा भारताच्या राजधानीमध्ये दिल्या गेल्या आणि घोषणा देणारे विद्यार्थी भारतीयच होते. यातून हे शहरी नक्षलवादी कशा प्रकारे बुद्धीभेद करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. भारताची भावी पिढीच विद्यापिठात भारताचे तुकडे तुकडे करायचे स्वप्न बघत असेल, तर त्याला हे विचार त्यांच्या डोक्यात भिनवणारे शहरी नक्षलवादीच कारणीभूत आहेत. याचा परिणाम, म्हणजे हेम मिश्रा नावाचा ‘जे.एन्.यू.’चा विद्यार्थी हा नक्षलवाद्यांसह सापडला.

६. ‘कबीर कला मंच’ शहरी नक्षलवादाचे प्रमुख केंद्र !

श्री. स्वप्नील सावरकर

त्याचप्रमाणे आज ‘कबीर कला मंच’ नावाची संघटना मुंबई-पुण्यामध्ये काम करते. मुंबईमधील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चे काही विद्यार्थी एकत्र येऊन पुण्यामध्ये कबीर कला मंच चालू करतात. कबीर कला मंचमध्ये संत कबीरांचे नाव सांगून डफली वाजवत गाणी आणि भजने म्हटली जातात; परंतु या भजनांच्या मागून हळूहळू विद्रोही अन् मग देशद्रोही विचार येतो. ज्याचा परिणाम, म्हणजे आज पुण्यासारख्या शहरातील २ विद्यार्थी गडचिरोलीमध्ये खांद्यावर बंदुका घेऊन फिरत आहेत. यावरून हा राष्ट्रविरोधी विचार आणि नक्षलवाद आपल्या अतिशय जवळ आलेला आहे. या अर्बन नक्षलवादाचे स्वरूप जे आहे, ते आज सामान्यांपर्यंत पोचलेले नाही. जसे जिहादी भरती करतात, तशी नक्षलवादामध्येही भरती केली जाते. या विषयावर महाराष्ट्रामध्ये दिवंगत रा.रा. पाटील गृहमंत्री असतांना गुप्तचर विभागाचा एक अहवाल प्रकाशित झाला होता. ज्यामध्ये ‘महाराष्ट्रात काम करणार्‍या सामाजिक संघटना नक्षलवाद्यांचे समर्थन करायचे काम करतात किंवा नक्षलवाद्यांना साहाय्य करतात’, असे म्हटले होते. हा अहवाल वर्ष २०११ चा, म्हणजे जवळपास १२ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामध्ये त्यांनी ५० संघटनांची नावे दिलेली आहेत. नक्षलवाद महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये पोचला आहे, हे त्या काळामध्ये उघड झाले होते.

आम्ही नुकतेच भीमाशंकरला गेलो होतो. त्या ठिकाणी काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची बैठक होती. तिथे काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांनी सांगितले की, स्थानिक पोलीस अधिकार्‍यांचे असे म्हणणे आहे की, गडचिरोलीमधील जो नक्षलवाद आहे, त्याचा प्रचार सध्या भीमाशंकरच्या जंगलामध्ये चालू आहे आणि येत्या ५ वर्षांत तुम्हाला भीमाशंकरला यायचे असेल, तर नक्षलवाद्यांची अनुमती घेऊन यावे लागेल. याचाच अर्थ आपल्या एका तीर्थक्षेत्राच्या जवळ नक्षलवादाचा प्रचार चालू आहे. काही दिवसांपूर्वी मी सांगली जिल्ह्यातील विटा या भागामध्ये गेलो असतांना त्या ठिकाणी स्थानिकांनी मला आश्चर्यजनक अशी माहिती दिली की, आमच्या गावातून ७ जण हे कबीर कला मंचमध्ये सहभागी झाले आणि आज त्यांचा ठावठिकाणा नाही. बहुतांश ते नक्षलवादी बनण्यासाठी बाहेर पडले आहेत. कबीर कला मंचचे सगळे सदस्य हे उच्चशिक्षित आहेत. ते या सगळ्या व्यवस्थेचा कणा म्हणून काम करत आहेत. या मंचच्या सदस्यांचे शिबिर कुणी घेतले, तर मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के यांनी ! भारत सरकारने मिलिंद तेलतुंबडे याला भारतातील सगळ्यात ‘धोकादायक नक्षलवादी’ म्हणून घोषित केले होते आणि त्याचा नुकताच चकमकीत (एन्काऊंटर) मृत्यू झाला. मिलिंद तेलतुंबडेचा सख्खा भाऊ आनंद तेलतुंबडे हा कोरेगाव-भीमाच्या दंगलीमध्ये आरोपी आहे आणि तो गोवा ‘आयआयटी’चा (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चा) प्राध्यापक आहे, म्हणजे जर अशा विचारांचे लोक शिक्षण संस्थेत असतील, तर नेमके काय होईल ? सुधा भारद्वाज जिला पंतप्रधानांची हत्या करण्याच्या कटाच्या प्रकरणामध्ये आरोपी बनवले, ती ‘आयआयटीची प्रथम आलेली विद्यार्थिनी होती; परंतु अशी विद्यार्थिनी जर या प्रकारची हिंसक विचारधारा पसरवण्याचे काम करत असेल, तर नेमके काय होईल ?

याच दृष्टीकोनातून साम्यवादी विचारांचे पत्रकार, संपादक असोत कि आणखी कुणी असोत; परंतु या सगळ्यांचा चेहरा वेगळा आहे. कुणाचा मानवतावादी, पर्यावरणवादी, तर कुणी पत्रकारितेमध्ये आहे; परंतु उद्देश मात्र सगळ्यांचा एकच आहे, तो म्हणजे नक्षलवाद्यांचे समर्थन आणि त्यांना पाठिंबा. यासंबंधीचा अहवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात बनवला असेल, तर आपण ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे.

७. नक्षलवादाशी संबंध असलेली अंनिस ही सरकारची साहाय्यक !

काँग्रेस सरकारच्या काळात शहरी नक्षलवादाचा जो अहवाल प्रकाशित झाला, त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव होते. ही समिती महाराष्ट्र सरकारच्या वतीने शाळा-महाविद्यालयांत वैज्ञानिक जाणिवांचा प्रचार करणारे कार्यक्रम घेते. ज्या समितीवर मुळात नक्षलवादाशी संबंध असल्याचा आरोप आहे, त्यांचा नरेश बनसोड नावाचा कार्यकर्ता जो गोंदिया जिल्ह्याचा प्रमुख होता, तो नक्षलवाद्यांसह कारवाईमध्ये सापडलेला आहे, अशा संघटनेला जर महाराष्ट्र सरकार सध्या वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पामध्ये सहभागी करून घेऊन त्यांच्यासह काम करत असेल, तर हे गंभीर आहे. ४ मासांपूर्वीच डॉ. दाभोलकरांचा स्मृती दिवस झाला आणि त्या दिवशी त्यांनी असे घोषित केले की, आम्ही महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये एक जागरण अभियान करणार आहोत. या अभियानात अंनिसला महाराष्ट्र सरकार साहाय्य करत असेल, तर हे अतिशय दुर्दैवी आहे. अंनिसने बनवलेला ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा’ हा महाराष्ट्रात लागू आहे. याला हिंदुत्वनिष्ठांनी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता. त्यामुळे सरकारने ‘आपण नेमके कुणाचे साहाय्य घेत आहोत ? त्यांची विचारधारा कोणती आहे ?’, याचा विचार करायला हवा. त्यांचा सामाजिक मुखवटा वेगळा आहे आणि तो अधिक प्रभावी आहे; परंतु या मुखवट्याच्या मागचे खरे स्वरूप शोधणे, हे सरकारचे काम आहे. आज गौतम नवलखा वगैरे या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कोरेगाव-भीमा दंगलीच्या मागचे ‘नक्षलवादी चेहरे’ किंवा ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून उघड केले असेल, तर माझी अपेक्षा आहे की, सरकार आपलेच आहे, तर मग अशा वेळी त्यांनी या सगळ्या बाकीच्या ५० संघटना कोण आहेत की, ज्यांचा नक्षलवादाशी संबंध आहे, त्या जनतेला कळू द्या. ते आज सरकारने घोषित करणे फार महत्त्वाचे आहे.

८. सुषमा अंधारे हिंदुत्वनिष्ठ पक्षामध्ये अराजक निर्माण करणार्‍या संधीसाधू ?

शहरी नक्षलवाद्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत, हे नक्षलवादी वेगवेगळ्या चेहर्‍यांनी संधीचा अपलाभ उचलतात. कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणामध्ये त्या काळामध्ये पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात जी तक्रार प्रविष्ट झाली, ती करणार्‍या अनिता साळवे अन् अंजना गायकवाड या दोघी होत्या. त्यानंतर पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याच विरोधात आणखी एक गुन्हा ३ जानेवारीला नोंदवला गेला अन् त्या तक्रार करणार्‍या महिलेचे नाव सुषमा दगडू अंधारे होते. त्यांनीही त्या काळात सांगितले, ‘‘हिंदुत्वनिष्ठांनीच ही दंगल भडकवली आहे. या दंगलीमागे संभाजीराव भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे आहेत.’’ प्रत्यक्षात याविषयी न्यायालयीन आयोग नेमला गेला आणि या आयोगाच्या पुढे स्पष्ट झाले की, त्या दिवशी पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे पुण्यात नव्हतेच. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जयंत पाटील यांना मातृशोक झाला असल्याने तिथे सांगलीत ईश्वरपूर येथे उपस्थित होते. याच्या बातम्या छायाचित्रासह प्रसिद्ध झाल्या होत्या.

ही माहिती असतांनाही अशा प्रकारची खोटी तक्रार करून हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी आणि दंगलखोर असे दाखवून हिंदुत्वनिष्ठ अन् दलित समाज यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचे काम त्या काळामध्ये या लोकांनी केले. त्यामध्ये सुषमा अंधारे हे प्रथम नाव आहे. अशी तक्रार नोंदवणार्‍या सुषमा अंधारे आज हिंदुत्वनिष्ठ पक्षात फूट पडल्यावर लगेचच प्रवेश करते. राजकीय अराजकाच्या काळात शहरी नक्षलवाद्यांनी घेतलेली ही संधी आहे. राजकीय पक्षातील नेते अधिक सूज्ञ असतात. मला असे वाटते की, या दृष्टीकोनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निश्चितपणे अधिक माहिती असणार; परंतु आज राजकीय पक्षांमध्ये वैचारिक भेदच राहिलेला नाही; कारण हिंदुत्वनिष्ठांसह निधर्मीवादी सरकार बनवत आहेत आणि निधर्मीवाद्यांसह साम्यवादी घुसखोरी करत आहेत. शहरी नक्षलवाद्यांना ही चांगली संधी आहे. जर हिंदुत्वाला विरोध करणार्‍या व्यक्ती हिंदुत्वनिष्ठ पक्षांमध्ये येऊन काम करायला प्रारंभ करत असतील, तर त्या आपल्या हिंदुत्वनिष्ठ विचारधारेचा उपयोग स्वार्थासाठी करून घेणार आहेत आणि भविष्यामध्ये अशी व्यक्ती हिंदुत्वनिष्ठ विचारांना फार घातक असणार आहे. आज सुषमा अंधारे सगळ्या व्यासपिठांवरून हिंदुत्वाची भूमिका मांडतात. ज्या व्यक्तीची हिंदुत्वविरोधी विचारांची पार्श्वभूमी आहे, अशा व्यक्तीकडे हिंदुत्वाची भूमिका मांडण्याचा खरेच अधिकार आहे का ? नैतिकता म्हणून त्यांनी याकडे पहायला हवे. म्हणून मला असे वाटते की, या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनीही आत्मपरीक्षण केले पाहिजे. राजकीय पक्षांमध्ये भेद होत असतात. काही वेळा पक्षाचे कार्यकर्ते बाजूला जाऊन तुकडे होतात; मात्र तेच परत आल्यावर पक्ष पुन्हा जोडलेही जातात; परंतु एकदा जर हिंदुत्वाचा विचार गमावला, तर मग पुन्हा एकत्र कसे आणणार ?

‘नक्षलवाद हा अराजकाच्याच माध्यमातून फोफावू शकतो. काल-परवापर्यंत सुषमा अंधारे हिंदु धर्मातील भेद, वर्णवर्चस्ववाद, ब्राह्मण्यवाद, देवतांचे अनुष्ठान, अंधश्रद्धा, अशा अनेक गोष्टी मांडत होत्या. आज त्याच सुषमा अंधारे यांनी त्यांच्या या मूळ विचारांना तिलांजली दिली आहे कि त्यांना त्यांची विचारधारा हिंदुत्वनिष्ठ पक्षामध्ये घुसवून हिंदुत्वनिष्ठांमध्ये अराजक निर्माण करावयाचे आहे ?’, याचा निश्चितपणे अभ्यास करायला हवा. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा आज राजकीय पक्षांचे नेते फार मोठे आहेत, त्यांनीच याचा विचार करायला हवा की, आपण आपल्या पक्षांमध्ये ज्यांना घेत आहोत, ते केवळ संधी म्हणून परिस्थितीचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे येत आहेत कि ते काही विशिष्ट उद्देश ठेवून आपल्याकडे येत आहेत ? ज्या वेळी देशामध्ये अराजक माजलेले असते, त्याच वेळी देशविरोधी किंवा राष्ट्रविघातक शक्ती देशात प्रवेश करत असतात. त्यामुळे जशी राष्ट्राची सीमा सुरक्षित असणे आवश्यक आहे, तसेच पक्षांच्या सीमाही सुरक्षित असायला हव्यात आणि त्या दृष्टीनेही जागरूकता निश्चित असायला हवी, अन्यथा साम्यवादी व्यक्ती हिंदुत्वनिष्ठांमध्ये प्रवेश करून अराजक माजवू शकतात.

(समाप्त)

(साभार : साप्ताहिक ‘हिंदुस्थान पोस्ट, मराठी’)

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रासह देशभरात शहरी नक्षलवादाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी अन्वेषण यंत्रणा आणि सरकार यांनी त्याचा वेळीच बीमोड करणे आवश्यक !