राजकीय पक्षांमध्ये शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ?

काँग्रेसने नेहरू, इंदिरा गांधी यांच्यापासून नक्षली विचारांना प्रोत्साहन दिले. आता राहुल गांधी जी वक्तव्ये करत आहेत, त्यांवरून पंतप्रधान मोदी यांनी ‘काँग्रेस शहरी नक्षलवादाची विचारसरणी ‘आऊटसोर्स’ (बाह्यस्रोत) करत आहे’, असे वक्तव्य केले. ‘सध्या राजकीय पक्षांत शहरी नक्षलवाद्यांची घुसखोरी ही अराजकतेची चाहूल आहे’, असे परखड मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी मांडले. ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक श्री. स्वप्नील सावरकर यांनी श्री. शिंदे यांची ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर विशेष मुलाखत घेतली.

डावीकडून श्री. स्वप्नील सावरकर आणि श्री. रमेश शिंदे

१. काँग्रेसचे नेते आणि इंदिरा गांधी यांची साम्यवाद्यांशी जवळीक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये काँग्रेसविषयी केलेले वरील वक्तव्य हे ‘केवळ निवडणूक प्रचारातील वक्तव्य आहे’, असे आपण समजू नये. हे सगळ्यात महत्त्वाचे सूत्र आहे; कारण अनेकदा असे वाटते की, निवडणूक काळातील प्रचारामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केवळ प्रसिद्धीसाठी बोलल्या जातात; परंतु काँग्रेसचा इतिहास जरी आपण बघितला, तरीसुद्धा पूर्वीच्या इतिहासापासून काँग्रेसने साम्यवादी विचारसरणीशी नेहमीच मैत्री ठेवली आहे. नेहरूंच्या काळामध्ये ‘हिंदी-चिनी भाई भाई’, अशी वर्ष १९६२ च्या भारत-चीन युद्धापर्यंत आपल्या देशात ते प्रचार करत होते. ‘साम्यवादी विचारांचा चीन आपला मित्र आहे. तो कधीच भारतावर आक्रमण करणार नाही’, असा समज त्यांनी करून ठेवला होता. प्रत्यक्षात चीनच्या माओने भारतावर आक्रमण करून त्यांना स्वप्नातून खाडकन जागे केले. त्यानंतर इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी लागू केली आणि त्यानंतर त्यांना पुढच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पराभव पत्करावा लागला. पराभव पत्करल्यानंतर त्यांनी त्या काळामधील साम्यवाद्यांशी वैचारिक जवळीक साधली. त्यांनी साम्यवादी विचारांना मान्यता दिली. इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात राज्यघटनेमध्ये पालट, म्हणजेच ४२ वी सुधारणा म्हणून ‘सेक्युलरवाद’ (धर्मनिरपेक्षतावाद) आणि ‘समाजवाद’ भारतावर लादला. राज्यघटनेत साम्यवाद थेट आणता येत नव्हता म्हणून त्यांनी समाजवाद आणला. वास्तविक पहाता समाजवाद आणि साम्यवाद यांमध्ये पुष्कळ काही भेद नाहीच. आणीबाणीच्या काळानंतर पुन्हा विजय मिळवल्यानंतर इंदिरा गांधींनी देहलीतील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालय (जे.एन्.यू.) हे साम्यवाद्यांना आंदण म्हणूनच देऊन टाकले. त्यामुळे काँग्रेस आणि साम्यवादी विचारसरणीचे पक्ष अन् संघटना यांची वैचारिक जवळीक ही स्पष्टपणे दिसतेच.

२. नक्षलवाद हा आतंकवादच !

 

श्री. रमेश शिंदे

राजकीय पक्ष किंवा संघटना यांच्याशी वैचारिक जवळीक असणे, हा भाग वेगळा आहे; परंतु राहुल गांधींच्या विदेशातील वक्तव्यांनंतर आता मा. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदी असतांना काँग्रेसवर केलेला आरोप पुष्कळ गंभीर विषय आहे; कारण पंतप्रधानांनी असे म्हणणे, याचा अर्थ काँग्रेसकडे आता स्वतःची वैचारिक क्षमता उरलेली नाही. काँग्रेस स्वतःच्या विचारांनी चालत नाही, काँग्रेस ज्या विचारांचा प्रचार पूर्वी करत होती, त्या विचारांना तिने आता तिलांजली दिली आहे. आता त्यांचे विचार आणि धोरणे ‘आऊटसोर्स’ केली जात आहेत. त्यांचे हे विचार साम्यवादी विचारांच्या आधारे लोकशाही उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या शहरी नक्षलवाद्यांचे आहेत. हे जे साम्यवादी विचार आहेत, ते देशातील लोकशाहीला घातक आणि हिंसेच्या मार्गाने चालणार्‍या शहरी नक्षलवाद्यांकडून घेतले जात आहेत. देशातील एक प्रमुख राजकीय पक्ष आता असे विचार आणि धोरणे यांच्या आधारे चालवला जात असेल, तर हे फार गंभीर आहे. हे साम्यवादी विचारांचे विचारवंत आपल्या विद्यापिठांमधून उग्रवाद, नक्षलवाद आणि आतंकवाद यांना नेहमी वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यात जिहादी आतंकवादाला भयंकर दाखवले जाते आणि जिहादी आतंकवादापेक्षाही भयंकर असणार्‍या नक्षलवादाला सौम्य दाखवण्याचा प्रयत्न
केला जातो.

नक्षलवाद्यांचा लढा, म्हणजे जनसामान्यांचा (आदिवासींचा) राजकीय व्यवस्थेच्या विरोधातील लढा आहे, या दृष्टीकोनातून भूमिका मांडली जाते. उग्रवादाच्या संदर्भातही अशाच प्रकारे समर्थन केले जाते. वास्तविक पहाता जिहादी आतंकवाद आणि नक्षलवाद यांच्या अमानवी कृत्यांमध्ये तसा काही भेद आढळत नाही. नक्षलवाद हा केवळ जंगलामधील आदिवासींचा अन्यायाच्या विरोधातील लढा नाही, तर तो लढा एका विशिष्ट उद्देशाने उभा केलेला लढा आहे. त्यांच्या लढ्याच्या मागे निश्‍चित साम्यवादी विचारसरणी आहे. त्यांच्या समर्थनार्थ अनेक साम्यवादी विचारवंत उभे आहेत, मग त्यांच्यामध्ये स्टॅन स्वामी असो, प्रा. साईबाबा असो, वरवरा राव असो, अधिवक्ता अरुण परेरा असो, प्रा. आनंद तेलतुंबडे असोत किंवा नलिनी सुंदर, सुधा भारद्वाज यांच्यासारख्या विद्वान महिला असोत. त्यांची एक प्रचंड मोठी शक्ती आहे. गौतम नवलखापासून निखिल वागळे, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सिद्धार्थ वरदराजन, रवीश कुमार या सगळ्या साम्यवादी विचारांच्या पत्रकारांची विचारसरणी नक्षलवाद्यांचे समर्थनच करते. आज दुर्दैवाने आपल्याला म्हणावे लागते की, ‘द हिंदू’सारखे वर्तमानपत्र ज्या ‘हिंदू’ शब्दाने चालते, तिथेही शहरी नक्षलवादाचा वैचारिक प्रचार मोठ्या प्रमाणात दिसतो. हा प्रचार एक प्रकारे नक्षलवाद्यांच्या हत्याकांडांचे समर्थन करतो. अशा विचारांशी काँग्रेससारख्या राजकीय पक्षाने जवळीक करणे आणि त्यांची राजकीय भूमिका ‘स्वतःची वैचारिक भूमिका’ म्हणून मांडणे, हे फार गंभीर आहे.

३. नक्षलवाद्यांकडून आतंकवाद्यांपेक्षा अधिक हत्या !

श्री. स्वप्नील सावरकर

जेव्हा एखादा राजकीय पक्ष सत्तेमध्ये येतो, तेव्हा त्या पक्षाकडे सर्व यंत्रणा आपोआपच येते आणि कायदा बनवण्याचा अधिकार येतो. त्यांच्याकडे गृहविभाग असतो, त्यामुळे पोलिसांचे सर्व नियंत्रण त्यांच्याकडे असते. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या नावे त्यांना हवे ते करता येते. आपल्याकडे केंद्र आणि राज्य यांच्या दृष्टीकोनातून भिन्न संकल्पना आहेत. केंद्रातील सगळी यंत्रणा ही राज्यांमध्ये वापरली जात नाही, राज्यालाही स्वायत्तता आहे. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेससारख्या पक्षाच्या नेत्यांनी जर या शहरी नक्षलवादाचे साहाय्य घेतले असेल, त्याला ‘आऊटसोर्स’ करून त्यांची विचारसरणी घेतली असेल, तर हे फार गंभीर आहे; कारण नक्षलवाद या देशामध्ये नेमके काय करत आहे, हे जनतेला ठाऊक आहे. या साम्यवादी विचारांच्या नक्षलवादाने सहस्रो सैनिक आणि सामान्य नागरिक यांची हत्या केलेली आहे. आपण असे म्हणू शकतो की, वर्ष २००९ ते २०१९ हा १० वर्षांचा कालावधी बघितला, तर नक्षलवाद्यांनी केलेल्या हत्या या २ सहस्र १९१ आहेत आणि जिहादी आतंकवाद्यांनी त्या काळामध्ये केलेल्या हत्या या ३९९ आहेत. याचा अर्थ जिहादी आतंकवाद्यांच्या तुलनेत नक्षलवाद्यांनी साधारणपणे ५ पटींहून अधिक हत्या केलेल्या आहेत. अशाच प्रकारे सैनिक आणि पोलीस यांच्या हत्यांच्या संदर्भात पाहिल्यास नक्षलवाद्यांनी १ सहस्र ३४२, तर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या हत्या ६७५, म्हणजेच नक्षलवाद्यांनी दुप्पट हत्या केल्या आहेत; परंतु या भयंकर नक्षलवादाची जाणीव आपल्याकडे हे पुरोगामी म्हणवणारे साम्यवादी पत्रकार करून देत नाहीत. एवढ्या प्रचंड प्रमाणात हत्या केल्या जात असतांना हे साम्यवादी पत्रकार नक्षलवादाला ‘स्वातंत्र्याचा लढा आहे’, ‘हा वनातील दीन-दलितांचा लढा आहे’, ‘हा अन्यायी व्यवस्थेच्या विरुद्ध लढा आहे’, असे सांगत रहातात; परंतु ही व्यवस्था कुणी निर्माण केली, तर ती याच देशातील लोकांनी निर्माण केली. या देशातील लोकांनी ती स्वीकारलेली आहे.

काश्मीरमधून निरपराध हिंदूंना अत्याचार करून बाहेर काढण्यात आले; मात्र त्यांनी या अन्यायाच्या विरोधात लढा उभारून हातात बंदुका घेतल्या नाहीत, मग नक्षलवादी न्याय मागण्यासाठी हातात बंदुका घेऊन आतंकवादी कारवाया का करतात ? आणि त्यांचे समर्थक पुरोगामी पत्रकार किंवा अन्य ‘सेक्युलर’वादी मंडळी बनत आहेत, हे अतिशय दुर्दैवी आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकीय स्तरावर या ‘शहरी नक्षलवादा’चा विचार स्वीकारला जाऊ लागला, तर आपल्याला म्हणावे लागेल की, हा नक्षलवाद जो आतापर्यंत दंडकारण्य, भामरागड, बस्तर किंवा गडचिरोलीतपर्यंत मर्यादित होता, तो नक्षलवाद आपल्या अतिशय जवळ यायला वेळ लागणार नाही.

४. राष्ट्र तोडण्याची राहुल गांधींची विचारधारा

राहुल गांधींनी इंग्लंडच्या दौर्‍यामध्ये भाषण केले. ते भाषण करत असतांना त्यांनी सांगितले, ‘भारत हे राष्ट्र नाही, तर भारत हा राज्यांचा संघ आहे’; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी संकल्पना मांडली, त्यात ‘राज्यांचा संघ’ म्हटलेले नाही, तर ‘संघीय दृष्टीकोनातून राज्ये’ म्हटले आहे. त्यामुळे राज्यांना स्वायत्तता देत असतांना राष्ट्र ही संकल्पना त्यांनी मान्य केलेली होती. म्हणूनच त्यांनी फाळणीच्या वेळी सांगितले होते, ‘आपण फाळणी तेव्हाच स्वीकारू, ज्या वेळी या देशातील सर्व मुसलमान पाकिस्तानमध्ये जातील आणि तेथील जो हिंदु आहे, तो हिंदु समाज पूर्णपणे भारतात येईल.’ आता जी संकल्पना राहुल गांधी मांडत आहेत, ती साम्यवादी विचारसरणीच्या आधारे असून त्यांची मनोभूमिका अशी बनलेली आहे की, ‘ब्रिटिशांनी आजच्या भारताची निर्मिती केली. राष्ट्र ही संकल्पना भारतामध्ये ब्रिटिशांनी आणली.’

मला असे वाटते की, एवढ्या मोठ्या नेत्याने अशा मूर्खपणाच्या गोष्टी कराव्यात, याच्यापेक्षा काही मोठे दुर्दैव नाही; कारण आपले ऋग्वेद, अथर्ववेद आदी वेदांमध्येच ‘राष्ट्रा’चा उल्लेख आहे. राष्ट्राची प्रार्थनाही वेदांमध्ये आहे, म्हणजे वैदिक काळापासून जर आपला इतिहास बघितला, तर त्या काळामध्ये राष्ट्र ही संकल्पना आपण मांडलेली आहे. आजही स्वतंत्र भारतात राष्ट्रगान, राष्ट्रभाषा, राष्ट्रगीत हे शब्दही आपल्या प्राचीन राष्ट्र संकल्पनेतूनच आलेले आहे. आर्य चाणक्य यांनीही ‘राष्ट्र निर्माण करायचे आहे’, असे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’ हे या राष्ट्राचेच वेगळे स्वरूप मांडले; परंतु त्यांनीही हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यावर सर्वांत महत्त्वाचे कार्य केले ते, म्हणजे प्रथम आपली कालगणना चालू केली, शब्द व्यवहार कोष निर्माण केला, भाषेचे वेगवेगळे अष्टप्रधान मंत्रीमंडळ निर्माण केले.

भारतातील प्राचीन काळापासूनच्या या सगळ्या गोष्टी बघितल्या, तर राहुल गांधींनी आज पोरकटपणे इंग्लंडसारख्या देशात जाऊन सांगणे की, ‘भारताला राष्ट्र ही संकल्पना ब्रिटिशांनी दिली.’ अर्थात् यातून त्यांची बौद्धिक क्षमता लक्षात येते. त्या वेळी ते असेही म्हणतात की, चीन हे राष्ट्र आहे; कारण का तर चीनमध्ये ‘यल्लो रिव्हर’ (पिवळी नदी) संपूर्ण राष्ट्राला व्यापते, म्हणजे ‘आमच्याकडे गंगा नदी आहे’, याचा त्यांना विसरच पडलेला आहे आणि गंगा नदी फक्त भारताला नाही, तर बांगलादेशाला सुद्धा व्यापते. त्यामुळे या दृष्टीकोनातून जर लक्षात घेतले, तर त्यांचे हे केवळ मूर्खपणाचे वक्तव्य आहे, असे म्हणून चालणार नाही. ही केवळ त्यांच्या डोक्यातून बाहेर पडलेली एक सामान्य संकल्पना नाही, तर हे काही विशिष्ट उद्देशाने केलेले वक्तव्य आहे. अर्बन नक्षलवाद्यांकडून ‘जे.एन्.यू.’मध्ये ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणांद्वारे हीच संकल्पना मांडण्यात आली होती.

याचा साम्यवादी विचारांच्या ‘सोव्हिएत युनियन’शी संबंध आहे. पूर्वी साम्यवादी रशियालाच ‘सोव्हिएत युनियन’ म्हटले जात होते. त्या वेळी या सोव्हिएत संघामध्ये १५ राज्ये समाविष्ट होती आणि या १५ राज्यांतील बहुतांश राज्ये मुसलमान होती. पूर्वीच्या काळी साम्यवादी रशियाची विस्तारवादी सेना ज्या ज्या भागांमध्ये गेली, त्या सगळ्या भूभागांवर त्यांनी नियंत्रण मिळवले. अगदी अफगाणिस्तानपर्यंत त्यांची सेना आली होती. त्यांनी साम्यवाद शक्तीच्या आधारे या राज्यांना कह्यात ठेवले; मात्र त्या ठिकाणी जी मूलभूत परंपरा होती, मग ती ताजिकीस्तान, अझरबैजान, किरगिझीस्तान, तुर्कमेनिस्तान असेल किंवा कझाकिस्तान असेल, त्यांची संस्कृती आणि रशियाची संस्कृती एक नव्हतीच; म्हणून त्यांनी साम्यवादी राजसत्ता कमकुवत झाल्यावर रशियाचे प्रमुख गोर्बाचेव्ह यांच्या उत्तरकाळामध्ये बंड करून ‘आम्हाला स्वतंत्र राष्ट्रे हवी आहेत’, अशी संकल्पना मांडली. त्यांना त्या काळात स्वातंत्र्य मिळाले. साम्यवादी इतिहासातील या घटनांच्या संदर्भात राहुल गांधींच्या वक्तव्याचा संबंध जर आपण घेतला, तर तो अतिशय गंभीर आहे.

राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार ‘भारत हे राष्ट्र नाही, तर केवळ राज्यांचा संघ आहे’, असे म्हटले तर, उद्या खलिस्तानवादी पंजाबचा तुकडा वेगळा करून मागतील, तमिळनाडूतील द्रविडीयन विचारांचे नेते वेगळा देश मागू शकतात. भारताचे शेकडो तुकडे करण्याची ही संकल्पना आहे. भारताचे तुकडे करण्याची ही संकल्पना एकीकडे राहुल गांधी या माध्यमातून विदेशात मांडत आहेत. प्रत्यक्षात राष्ट्र म्हणून भारताचे अस्तित्व प्राचीन काळापासूनच आहे. अगदी एक लहानसे उदाहरण घ्या, आपल्याकडे जी मकरसंक्रांत आहे, ती काश्मीरमध्ये ‘उत्तरायण’, पंजाबमध्ये ‘लोहडी’, हिमाचल प्रदेशात ‘माघी साजी’, आसाम राज्यात ‘माघी बिहु’, मध्य भारतात ‘सुकरात’, ‘संक्रांती’ आणि केरळ राज्यात ‘पोंगल’ म्हणून साजरी केली जाते. याचाच अर्थ असा होतो की, एकच मकरसंक्रांत सण भारताच्या विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि विविध प्रकारे साजरा केला जातो. संपूर्ण भारतात सांस्कृतिकदृष्ट्या ऐक्य असल्याखेरीज हे कसे शक्य आहे ? म्हणून जरी ‘भारतात नावे वेगळी असली, भाषा वेगळी असली, तरी आमचे राष्ट्र एकच आहे’, ही मूळ संकल्पना होती आणि राहुल गांधी ही मूळ संकल्पनाच तोडायला निघाले आहेत अन् याच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काँग्रेसवर शहरी नक्षलवादाचा विचार आंदण घेण्याचा’ विचार मांडला आहे.                              (क्रमशः पुढच्या रविवारी)

(साभार : ‘हिंदुस्थान पोस्ट, मराठी’)

जनहो, देशाच्या अखंडतेला सुरुंग लावणार्‍या शहरी नक्षलवादाला खतपाणी घालणार्‍या राजकीय पक्षांना राजकीय संन्यास घेण्यास भाग पाडा !